कथा तत्वाची कविता...असे मी ह्या लेखनाचे वर्णन करेन...उत्कटतेमध्ये पूर्णत्व अनुभवला आले नाही तर जे रितेपण अनुभवाला येते त्याची ही शोकात्म कविता/कथा आहे.
उत्कटता – रश्मी नगरकर
मनाच्या उंच कड्यावरून कोसळणारा वेदनेचा धबधबा....
भावनांच्या पायथ्याशी येउन संथ होतो,
फेसाळतो, उद्वेगात वाहत जातो...कुठल्यातरी ओढीत..
कोणत्यातरी विसाव्याच्या शोधात...
आणि मग ते वळण येत जिथे तू उभा असतोस प्रेम घेउन...
माझी रिकामी ओंजळ भरायला
बहर देउन पुन्हा दुराव्याच वान द्यायला...
कश्या रे कळतात तुला माझ्या प्रवाहाच्या दिशा..?
तरी मी रोखत असते स्वतःला..
समजावते खूपदा की ही केवळ क्षणभराची भुरळ आहे
परावृत्त करायचा प्रयत्न करत असते मनाला..
त्या घोंघावत येणाऱ्या वादळाला माझ्यात सामावण्याची अनुमती देण्यापासून...
पण,
तुला आता सवयीच झालय मला वश करण
तुझ्या श्वासांचा तो सुगंध धुंद करतो मला
जणू संमोहित करतो माझ्या भावनांना...
मग मी बिनविरोध करत जाते तुला हव ते...
माहीत असत हे वादळ उध्वस्त करेल मला तरी मी खेचली जाते.....
तुझ्यापाशी...
तू भरून देतोस मग तुझा प्राजक्त माझ्यात...
मग मी अनाहून वाहत येते मिलनाच्या ओढीने
हे रूढींचे पाश तोडून... ह्या परंपरेच्या बेड्या झिडकारून...
तू हळूवार स्पर्श्यांचे मोरपीस फिरवू लागतोस तस...
मनात खोल घाव करून असलेली एक न एक जखम भरू लागते...
तू दिलेल्या वेदनांच्या जाणीवा क्षमू लागतात, कैफ चढू लागतो...
तू मात्र नेहमीप्रमाणे तुझ्या अंतरीच वादळ शांत करून निघून जातोस...
सोडून जातोस ते अर्धवट गंधित झालेल माझ शरीर...
अन मी भटकत राहते व्याकुळतेने....
हा अपूर्णत्वाचा घाव घेउन...
अश्वथाम्या सारखी....