मुग्धा ही कार्यशाळेतील एक सहकारी. ह्या कथेत तिची पुढील वाटचाल दिसते आहे. मुख्य म्हणजे एक आश्वासन.
दुसरीची गोष्ट – मुग्धा शेवाळकर
‘आज खरेदीला जाऊया?’ एक मैत्रीण दुसऱ्या मैत्रिणीला विचारेल इतक्या सहज विचारलेला प्रश्न. काय वाईट आहे अश्या मैत्रीत..? नातं आहे म्हणून मैत्री नाही? आणि नातं तरी काय आहे.. माझ्या नवऱ्याची मुलगी.. जेमतेम चार पाच वर्षांचा फरक..
‘हो जाऊया, मी ऑफिस नंतर तुला घरी न्यायला येते. बाहेर येऊन थांब मी फोन केला की’
‘मी तुमच्याच घरी असेन तिथेच ये’
तुमच्याच. क्षणभर थबकते मी ह्या शब्दावर..अनैसर्गिक, चूक, घाण अशा शब्दांच्या पलीकडे जाऊन आमचं असं काही असू शकतंय तर..
‘अग तुझी आई? त्यांना चालेल? आवडेल? घरी कधी जाणार मग तू? आज राहशील का मग? रहा ना.. उद्या इथून जा कॉलेजला.. ‘ सगळे प्रश्न गिळते मी, कारण त्यांना अर्थ नसतो.
‘अग ऐकतेस ना? मी आईच्या घरी नाही जाणारे आज, तू मी आणि बाबा जाऊ शॉपिंगला’ मला भानावर आणते ती..
‘अं.. हो..येते मी लवकर’
जिथे एक नातं तोडल्याची सल होती तिथे दोन नाती जुळल्याचं समाधान पण होतं..