किती खरी आहे ही फिरस्ती....स्वाती फडणीस जियो....दिवसाची मस्त सुरुवात!!
विक्रम
कुणी घर देता का घर ? - स्वाती फडणीस
एखाद्या पहाडाप्रमाणे अभेद्य 'ती' त्याच्या पाठीशी अखंड उभी होती. तीच होती त्याच्या घराची भक्कम भिंत. चारी दिशांना भटकताना त्याची पावलं थकून जात. तेव्हा त्या वाट चुकल्या पावलांचं स्वागत करत तीच सामोरी येत असे त्याला. दोन्ही बाहू पसरून कवेत घेण्यासाठी. करणं तीच होती त्याच्या अंगणातली स्वागतशील रांगोळी, तीच होती अगत्यच तोरण.. तो घरात नसताना चिमण्या पाखरांना पंखाखाली घेणारी, उबदार गोधडी तीच होती. तीच होती त्यांच्या, त्याच्या डोक्यावरच आश्वासक छप्पर. धर्म, काम, अर्थाच्या तिन्ही आघाड्यांवर "नतिचरामी..!" चं व्रत घेऊन कायम साथ देणारी तीच होती. त्याची 'धर्मपत्नी'..!
ती चिमण्या पाखरांना वाढवत असताना.. तो स्वच्छंदपणे भटकत होता. भटकंतीत कधीमधी वाट चुकणं अपरिहार्य असल्याप्रमाणे तो मोडतच होता एक एक वचन. तो यश, कीर्ती, सन्मानाच्या पायऱ्या चढत असताना त्याच्या वाट्याला येणाऱ्या टाळ्यांच्या आवाजात तिचा एकटेपणा सदैव गुंजत राहिला. अगदी त्याने पंख मिटून आता कायमचे तिच्या पदराच्या आसऱ्याला यायचं ठरवलं तेव्हापर्यंत. त्याच्या निर्णयाने ती सुखावली. त्याच्या आधाराने निवांत, निश्चिंत होण्याची स्वप्ने पाहू लागली. पण नाही..
आतापर्यंत अनेकदा चुकलेला तो याही वेळेला तिला गृहीत धरायला चुकला नाही. तिच्या पदरात त्याने जसं स्वतःच दान टाकलं तसंच.. आजवर स्वतःच म्हणून बाळगलेलं काहीबाही वाटत गेला.. ज्या चार भिंतींना तिने घरपण दिलं ते घरं.. तिने पै-पै वाचवताना जमलेली पुंजी.. तिने कित्येक वर्ष संयमाने गोठवलेली सगळी स्वप्न त्याची एकट्याची मिळकत समजून चौफेर उधळून टाकताना याही वेळेला त्याला तिला विचारावं, सांगावं असं नाहीच वाटलं. तो शेवटचा अन्याय ही तिने सवयीने पचवला.
पण त्यानंतर एक वेगळीच मालिका सुरू झाली स्वतःवर अन्याय ओढवून घेण्याची मालिका. इथे तो ही हतबल झाला. कारण तीच होती त्याची शक्ती. जे तो वाक्या दर वाक्याला खुशीत बोलूनही दाखवायचा. पण कृती करताना..
ज्याच्यावर भिस्त ठेवून तिने या खडतर प्रवासाला सुरुवात केली. ज्याच्यावर भिस्त ठेवून ती "नतिचरामी..!" चं वचन प्राणपणाने जगली. त्यानेच जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर तिचा विश्वास घात केला.. हा शेवटचा घात ज्यानंतर तिचा धीर सुटला. ती सैरभैर झाली. तो तिच्या सोबत जाऊ लागला.. गावं, छपरं, माणसं बदलली. आयुष्य भराच्या प्रतारणेनं खचलेली ती. तो गाफील असताना पुढे निघून गेली. त्याच्या डोक्यावरचं 'छत' हरपलं..! आधारच भक्कम 'भिंती' कोसळल्या..! तो निराधार झाला..! विलाप करू लागला..
"कोणी घर देता का घर...!"
तेव्हा, निदान तेव्हा तरी त्याला समजलं असेल का? की तीच त्याच घर होती.
माहीत नाही. पण तो मागतंच राहिला.. जे तिला कधीच मिळालं नाही. अगदी निर्थकपणे..
कारण कुठल्याही घरात आता त्याला त्याच घरपण मिळणारच नव्हतं.