किती सहजतेने दांभिकपणा मांडला आहे ह्या कथेत...
पिचकारी – अभिषेक पाटील
त्या दिवशी जरा उशीरच झाला होता. धावत धावत स्टॉपवर समोर आली तीच बस पकडली. आत गेल्यावर कळालं स्टेशनची बस आहे. बरं झालं म्हंटल वेळेवर चढलो.
एकदम मागच्या कोपऱ्यातली सिट मिळाली होती. गर्दीच्या वेळी बस मध्ये जागा मिळणं खूप सुख असत. कधी कधी पुढच्या सेकंदाला काय होईल काही सांगता येत नाही. असच काहीस घडलं.. ड्रायव्हर ने कचकन ब्रेक मारला.
"काय झालं",
"च्यायला येडाय का हा ड्रायव्हर किती जोरात ब्रेक मारला"
अशी प्रवाशांमध्ये बडबड सुरु झाली . मी खिडकीतून बाहेर डोकावलोतर कुणीतरी दुचाकी-बुलेट बस समोर आडवी घातली होती. काही क्षणातच तो दुचाकी स्वार बस मध्ये चढला . त्याच्या पांढऱ्या शुभ्र कपड्यावर लाल रंगाचे शिंतोडे पडले होते. त्याने तावातावात येवून माझ्या पुढच्या सिटवर बसलेल्या एका माणसाच्या जोरात कानाखाली ओढली . त्या माणसाच्या तोडातून गुटखा आणि रक्त मिश्रित चिखल बाहेर पडला होता. ते त्याच्या शर्टवर ओघळत होतं.
सगळे लोक तो प्रसंग नुसता पाहत होते. अचानक काही असं घडेल कुणालाच वाटले नसावे. पण मनातून बरं वाटलं. अशा अस्वच्छता पसरवणाऱ्या लोकांच्या कानाखाली मारण्यासाठी कुणाला तरी कारण मिळालं.
काही वेळातच तो बुलेटवाला तसाच शिव्या देत मागच्या दरवाजाने खाली उतरला. त्याने बुलेटची किक जोरात मारुन जाता जाता पानतंबाखूची एक पिचकारी रस्त्यावर मारली. तो बुलेटचा आवाज , पान तंबाखूची पिचकारी ,खिडकीतून बाहेर थुंकून बुलेटवाल्याचा शर्ट घाण करणारा माणूस आणि त्यामुळे त्याला बसलेली कानाखाली हे सारं नेहमीच आठवत राहणार.