नुक्कड लेखन कार्यशाळा म्हणजे एक जादू आहे...क्षमा ह्या जादूतून खूप काही घेऊन बाहेर पडली...आणि ही कथा...मी खुश झालो ही कथा वाचून...आपण सहा तास जीव तोडून बोलतो...त्यातून हे निष्पन्न होत असेल तर आणखी काय हवं?
बागायतदार – क्षमा शेलार
तर मंडळी!
गोष्ट तेव्हाची आहे जेंव्हा घरोघरीच्या अण्णा, आबा, नाना ह्या इरसाल म्हातार्यांची पारावर मैफल रंगायची.विषय नेहमीचेच,पाऊस का पडत न्हाई? पाटाला पानी कदी येनार? शेतकरी कदी सुखी व्हनार?सरकार कसं बारा बोड्याचं हाये? वगैरे वगैरे...
बऱ्याच वेळा नाथाचाही विषय रंगात येई. सगळ्या गावात नाथाला चिरगूट चघळ्या म्हणत. तो होताच तसा कंजूष. आख्ख्या गावात त्याने कधी कुणाला चहा देखील पाजला नाही. अर्थात धोंडुभाऊ रोज कुणाकुणाला चहा पाजे पण त्यालाही त्याच्या पाठीमागे नावे ठेवली जातच.
धोंडुभाऊ आणि नाथा सख्खे शेजारी पण त्यांच्यात कधी विस्तव गेला नाही. धोंडुभाऊ चार जणांना स्वतःच्या खिशातून चहा पाजे आणि चवीचवीने नाथाच्या कंजुषपणाच्या गोष्टी चघळत चघळत मोठेपणा करी.
कधीकधी धोंडुभाऊचा आवाज अगदी टिपेला पोहोचे.
"नाथाने यवढी प्रॉपट्टी कमवली पन् काय उप्योग? कदी कोनला चार घास खाऊ घातले? बरं खान्यापिन्याचं बी जाऊं द्या मी म्हंतो. कोनला चा पाजाया तरी त्यानी दमडी खराचली का?"
त्यावर एखाद्या जख्ख म्हाताऱ्याची मान हलायची (तशी त्याची मान नेहमीच डुगडुग करत असे) मग तिलाच सोयिस्कर उजवी समजून धोंडुभाऊ पुढे बोले,
"माझं काय म्हननं हाय...निस्त्या बँका भरून काय उप्योग हाये का? पोटाला ना व्हटाला.."
बाकी मंडळी फुकटच्या चहाला जागत आणि होय होय म्हणत. मग धोंडु भाऊला अजून चेव येई. तो पुढे सुरु होई,
"मी काय म्हंतो, यवढ्या म्हतारपनी नवसानी पोरगा झालाय. त्याला तरी एखाद्या बापानी धार्जिनं असावं. प्वार रगात आटवून शिकतंय. त्याला एखादी सायकल नै घेऊन देता येत? आसा कसा बाप?"
आणि एखाद्या दिवशी ह्या गावगप्पा ऐन रंगात आलेल्या असतांना साक्षात नाथा पाटील मागून घसा खाकरत येत आणि जोरात हाकारा देत,
"कोनाची माय व्याली रे माझ्या पोराची काळजी करायला? पोरगं माझ्याच पोटचं हाये का तुमच्यापैकी कोनी आलं होतं माझ्या घरी वस्तीला? माझ्या पोटचं म्हनल्यावर मलाबी थोडशीक काळजी करूंद्या.
आँथ्थूsss.."
नाथा पाटील पिंक टाकेपर्यंत धोंडुभाऊ पाटील ओढ्याच्या वाटेवर पसार होत. इकडे नाथा पाटील गुरगूर सुरू ठेवत,
"माझ्या मरायची वाट प्हातो हा धोंडा. २० एकर वावर काय तुझ्या बापाने ठिवलं व्हतं. आपन सोत्ता कमवलय. माझ्या पोराला टॉपचा शेतकरी बन्नावनार आपन. बघतच रहा तुमी समदे. माझ्या पोराची काळजी करत्यात उंडगे."
नाथा पाटलाची ही असली जीभ. त्यामुळे आख्ख्या गावात कुणी त्याच्या नादी लागत नसायचे. बायको बिचारी गरीबाघरची. नाथा तरुणपणी पैलवानकी करायचा त्यामुळे ती बिचारी जिवंत असेतोवर त्याला वचकूनच राहिली. चंद्या तिसरीतच होता आणि साप चावल्याचं निमित्त होऊन पटकन मरुनही गेली.
चंद्या पोरका झाला. तो ही हळवा, नाजूक चणीचा. आई गेल्यानंतर अजूनच समजुतदार झाला. कसला हट्ट करणे त्याला जणू माहितीच नव्हते. आपण भले आणि आपला अभ्यास भला असे त्याचे धोरण होते. अकरावी बोर्डात तो गावात पहिला आला. तेव्हा मात्र नाथाने आठाण्याचे पेढे म्हादेवाच्या देवळात ठेवले होते. चंद्याला शिक्षक व्हायचं होतं. पण नाथाला त्याला बागायतदार बनवायचं होतं.
"शेती कर गुमान. यवढी २० एकर शेती काय फुकून टाकायची का? झालं तेवढं शिक्षेन रग्गड झालं. माझ्याकडं फुकाट घालवायला पैसे न्हाईत."
चंद्या हिरमुसला. तापाने फणफणला. डॉक्टरलाही त्याने पैसे लागू दिले नाहीत. एखाद्या किडामुंगी सारखा फटदिशी मरून गेला. नाथाला नेमकं काय वाटलं? नाथा का रडला नाही हे कुणाला कळलं नाही.
पण—पाटीलमळ्या पासून तर गावच्या मसनवटी पर्यंत नाथा जवळ होते- नव्हते तेवढे पैसे उधळत गेला. त्यानंतर नाथाला कुणीही पाहिले नाही. सुन्या झालेल्या पारावर धोंडुभाऊ एकटाच बसलेला असतो. आणि २० एकर जमिनीत आता भूतं नाचतात.....