एक वेगळेच क्रूर सत्य घेऊन ही कथा येते आणि मधुसूदन पुराणिक आपल्याला वेगळ्याच दुनियेत घेऊन जातात.
भाकरी – मधुसूदन पुराणिक
“माय, कशाशी खावू वो भाकरी? कालच्या रातीचं चून असंल त देनं.” कोरड्या भाकरीच्या चतकोर तुकड्याकडं पाहात शिप्यानं भाईर कापडं धूत बसलेल्या पार्बतास आवाज देल्ला.
“कोठून आणू आता चून? राती चांगलं चाटून पुसून घेतलं व्हतं नं? गंजच फुटायचा रायला व्हता. माह्यासाठी बी टिवलं न्हाई. मिठ आन कांद्यासोबत खाल्ली भाकरी म्या,” पार्बतानं तेथूनच हेल काढला.
“आवं मंग कांदा-मिठ तरी दे.”
“रायलं त देऊ नं मुडद्या. खाल्ली येक दिस भाकरी कोरडी त जीव न्हाई जात.”
“आवं संपलं त सांगाचं होतं ना? आणलं नसतं का सामान कामावरून येताना.”
“पैकं कोण तुहा वरतं गेला थो बाप देणार? दोन दिसापासून जाऊन ऱ्हायला कामाले त सायबावाणी ऑडर द्याले लागला मले. निंग कामावर आन राती लवकर वापस ये.”
शिप्या काही न बोलता चतकोर भाकरीचा तुकडा पाण्यासोबत गिळून रस्त्याच्या कामावर निंगून गेला आन् हातातलं धुवाचं दानखड हातातच ठेवून पार्बता तेच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत रायली, गेल्या दिसाईचा इचार करत.
सारं काय ब्येस चाललं असतं त ह्याले कायले कामावर जा लागलं असतं. शायेत शिकवला असता. बाबू केला असता. ऐन वक्तास नसिबानं दगा देल्ला. शिप्याचा बाप बिल्डींगच्या कामावर. मी रेजा म्हून. स्लॅपवर पाणी ताकताना चवत्या मजल्यावरून खाली पल्ला आन् जागीच मेला. शिप्या तवा सात मयन्याचा प्वोटात व्हता. मी जवान, येका वर्सातच नव-याची सोबत संपली. ठेकेदारानं पाच हजार काढून देल्ले आन् रेजाचं काम बंद करून घरकामाले ठेवून देल्लं. शिप्या जनमला आन् ठेकेदारानं दोन मयनं सांभायल, काम न करता पैका पुरवला. दोन मयन्यानं दोन वर्सपावतो वसूल करत रायला त्याचा तक्तपोस सजवायले माहा उपेग करून. पोटूशी झाली त्याच्यापासून आन् त्यानं माह्या पोटातला गोळा पाडून टाकवला. बिल्डींगचं काम झालं. ठेकेदार गावाले जाऊन येतो म्हून गेला थो वापस आलाच न्हाई. शिप्या आन् मी दोघंबी भूतावानी थ्या झोपडीत सा मयने राह्यलो. मालकानं झोपडी पाल्ली आन् आम्ही बेवारस मायलेक गावाभाईर ताटव्याईची झोपडी बांधून राह्यलो.
पायता पायता शिप्या खांद्यापरिस मोठा झाला. झोपडीबाजूनं झोपड्या झाल्या. बायामाणसाची वस्ती झाली. गावात सहा-सात ठिकाणचं घरकाम भेटलं. जिंदगी जगून –हायली. शिप्याले बाबू कराचं सपान सपानच –हायलं. गावाभाईर रस्त्याचं काम सुरू झालं. वस्तीतल्या पोट्याईसंग दोन दिस झालं कामाले जाऊन –हायला.
“अबा पार्बते, जात न्हाई का वं कामावर? दानखडच धुत रायणार हाये का?”
बाजूच्या रुक्मीन पार्बतीस हाक देऊन जागवलं. कसंबसं आटपून कामावर गेलं पायजे म्हून पार्बता घाईघाईनं निंगाली. शिप्या चतकोर भाकरी खाऊन कामावर गेल्ता....आज शिदोरी बी न्हाई मागीतली......कोंत्या नादात व्हतो आपून आन् थो बी. का खाईल दुपारच्या वक्ती? .......इचार आन् नुस्ते इचार.....कामाचं घर जवळ आलं.......घर उघडं.....बाई कुठी दिसत न्हाई........मालक घरी काऊन? हातात झाडू घेतला.....आंगण झाडून काल्हं.....मालकानं आवाज देल्ला.....च्या साटी. बाई राती त्याईच्या बापास बरं न्हाई म्हून सकायी सकायीच गावाले गेली......मले झाडू, धुनंभांडं आन् सैपाक करून ठेवाले सांगतलं मालकानं. मालकानं च्या पाजला व्हता सोता करून…..पयल्यांदा. कामं करणं भाग व्हतं.....कामाले लागली....सैपाक करता करता...... मालक........तोंड दाबून धरलं....हातात पाचशे कोंबले. राती शिप्याले मटनाचं जेवन देल्लं......थो खूश.......रोज असं भेटलं पायजे म्हणला....खूप खूप बोलत राह्यला....माहं त्याच्या बोलण्याकडं ध्यान नव्हतं.....तव्यावरची भाकरी जळून राह्यली व्हती.