प्रथम नावाबाबत...ह्या कथेचे नाव खूप मोट्ठे होते...पण आपल्या सिस्टमच्या मर्यादेमुळे ते छोटे केले आहे.
चाईल्ड अब्युज हा एक गंभीर प्रश्न आहे......
किशोर – सुचरिता (रमा अतुल नाडगौडा)
“आई, या दिवाळीला मला काय घेणार?”
“काय घेऊया सांग ! फ्रॉक, फटाके..”
“ते सगळं तु घेतेसच ग! पण मला पुस्तक हवंय.”
“कुठलं?”
“मला किशोरचा दिवाळी अंक हवाय.”
“कितीला आहे तो?”
“दोन रुपये.”
“अं... अग मैत्रिणीकडुन आणुन वाच की.”
“नक्को. ती खुप भाव खाते. मुदाम लवकर देत नाही. सारखी फेऱ्या मारायला लावते. शिवाय ती इतकी हळुहळु वाचते. कधी तिचा संपणार आणि कधी ती देणार. यावेळी मला माझा माझा हवाय. एकदा तरी. नवा कोरा.”
“बरं..पण तु मला काय देणार?”
“मी अभ्यास करून मार्क्स चांगले मिळवले तर देशील?”
“देईन”
“पण रिझल्ट तर दिवाळी नंतर लागतो. तोवर थांबायचं?”
“नाही. तु करशील. मला ठाऊक आहे. परीक्षा संपली की आण जा.”
“य्यीय!!” ***
आठवीची सहामाही. तसाही रोजचा गृहपाठ इतका असायचा की फार वेगळा अभ्यास करायला लागत नसे. पेपर छानच गेले. गणोबा नेहमीप्रमाणे थोडीशी धास्ती ठेवुन गेला. पण पुर्ण परीक्षाभर मनात नव्या कोऱ्या किशोरचा वास घमघमत होता! फराळाचा वास त्याच्यापुढे काहीच नाही. कधी तो अंक येतोय आणि कधी तो आणुन वाचतेय असं तीला झालं होतं. चाळीसमोरच्या पत्र्याच्या खोकड्यात पेपरचा स्टॉल होता. तिथे मिळायचे हे अंक. एरवी लांबुन बघत जायचं. उसाच्या गुऱ्हाळात कसं, फक्त एक तारखेलाच रस मिळतो. एरवी नाही. तसंच एरवी ही किशोर, कुमार, चांदोबाची ताजी दुनिया आपल्यासाठी नाही हे तिला पक्क ठाऊक होतं. कुणा भाग्यवंताने विकत घेऊन, त्यांचे वाचुन शिळे झाल्यावर, चुरगळुन, खुप मोठ्ठी मेहेरबानी म्हणुन तुच्छतेने दिलं तर वाचायला मिळणार. ते सगळे आपापसात त्यातल्या गोष्टींवर चर्चा करणार ते आपण पडेल चेहऱ्याने ऐकायचं फक्त.
पण यावेळी आपल्याला पण मिळणार! कोरा कोरा अंक!! ती खुळ्यासारखी दिवसातुन तीन वेळा जाऊन विचारायची
“आजोबा,आला का किशोर?”
कानात सोन्याची बाळी घातलेले गोरे गोरे आजोबा हसुन म्हणायचे,
“नाही ग ! किती वेळा विचारतेस? आला की मी स्वतःच हाक मारीन तुला.”
दिवाळीच्या बाकी कामात आईला मदत करताना मनात फक्त कोरे पुस्तक होते. मनाचेच गोरे कोरे पुस्तक झाले. त्यावर रंगीत चित्रं, कविता, गोष्टी उमटवण्याची कोण घाई झालेली.
फराळाचे डबे भरून झाल्यावर ती पुन्हा भर दुपारची गेली. यावेळी आजोबा लांबुनच म्हणाले,
“आला ग!”
तिच्या उलट पावली धुम पळत सुटली. घरी पोचुन धापा टाकत म्हणाली,
“आई आई दोन रुपये दे पटकन..”
“अग हो हो. घे बाई.”
नोट हातात पडताक्षणीच ते वेडं फुलपाखरू तसंच फडफडत स्टॉलवर पोचलं. ऐन दुपारचं रस्त्यावर कुणीच नव्हतं. दुकानातही. तीने जवळपास नाचत हातातली नोट पुढे केली.
“आजोबा, द्या न.”
त्यांनी डाव्या हातानी किशोरचा अंक उचलला. तिने तो घाईने रिकाम्या हाती पकडला. पण आजोबांनी तीचा नोट धरलेला उजवा हात नोटेसकट पकडला होता. घट्ट. एकीकडे ते तीचा हात दाबत होते, तर दुसरीकडं काहीतरी विचित्रपणे बघत हसत होते. तिला त्या नजरेची भिती वाटली. आई नेहमी जपुन रहायला सांगायची ते हेच का? ती हात सोडवुन घ्यायला धडपडु लागली. डाव्या हातात अंक होता. त्याच्यावर इतका जीव की उजवा हात सोडवायला पण त्यातला अंक सोडवेना. नोट कधीच गळुन पडली होती. नजरेत अनामिक भिती झाकोळली. आजोबा असं काय करताहेत? तिच्या तोंडुन रडवा हुंकार ऐकताच आजोबांनी हात सोडला. वाईट्ट हसले.
अंक घेऊन ती माघारी वळली. पंख छाटलेल्या फुलपाखरासारखी खुरडत घरी आली. आई म्हणाली सुद्धा..
‘काय ग? मिळाला नाही का?'
“हो मिळाला.”
“मग अशी काय दिसतेस?”
“काही नाही ग. येताना पळत आले तर पडले.”
“काय ग वेंधळी तु. लागलं का?”
“नाही.”
किशोरचा कोरा अंक घेऊन ती गॅलरीत आली. तिथल्या जुन्या मोडक्या टायरवर बसली. तिची आवडती जागा. किशोरचा रंग, वास काही आवडेना. अंक मांडीवर ठेवुन ती मलुल बसुन राहिली. विचार करवत नव्हता की काही सुचत नव्हते. आईने बाहेर वाकुन पाहिलं.
“वाचत का नाहीयेस?”
“वाचते न.”
तीने घाईघाईने अंक उघडला. त्याचा हवासा वास नाकात जाताच ती प्रसंग विसरली. हळुहळु पानं पालटु लागली. चित्रं, कविता, विनोद, गाणी...मग एक मोठी गोष्ट होती. चोगल्यांच्या खिनुची. म्हंजे गोखल्यांच्या चिनुची! छोटीशी चिनु आणि तिचे विसरभोळे आजोबा. टॉमी ऐवजीं कपिलेला फिरायला नेणारे आणि टॉमीसमोर वैरण टाकणारे गमतीशीर आजोबा. वाचता वाचता तीला रडुच याय लागलं. घट्ट दाबल्याने लाल होऊन दुखणारा हात तीने आजोबांच्या गोष्टीत लपवला. मग अंक मिटुन घरात आणुन ठेवला .
झाला इतक्यात वाचुन?
“नाही आई. पण खेळायला जाते आता. उरलेला नंतर वाचते.”
“काय बाई ! आणायची घाई आणि आता वेगळंच काही.”
अंक पुस्तकांच्या खणात ठेवुन तिच्या बाहेर गेली. दिवाळी आली. गेली.
आता किशोरच्या निवडक गोष्टींचे भाग मिळतात म्हणे. आणावेत का?
म्हणून काय की तेंव्हापासून कुठलेही आजोबा वाचायचे राहुनच गेले.