असे पंधरा तास कधी ना कधी आपल्यापैकी प्रत्येकाच्या वाट्याला येतात आणि अनोळखी जग काही क्षणापुरते ओळखीचे होते...
विक्रम
ते पंधरा तास- मेघा निकम
मुंबई ते पुणे प्रवास… घराच्या ओढीने, आप्तेष्टांच्या काळजीपोटी आणि प्रेमापोटी हजारो लोक पुणे - मुंबई प्रवास दररोज करत असतात. "प्रवाशांच्या सेवेसाठी" राज्य परिवहन बसेस रोज या मार्गावर धावत असतात. मध्य रेल्वेमुळे तर हा प्रवास खूप सुखकर, आरामदायी आणि जलद झाला आहे. मुंबईहून निघालो, खिडकीजवळची सीट पकडली आणि मराठी/ हिंदी गाण्यांची playlist सुरु केली की कधी कर्जत, खंडाळा, लोणावळा ओलांडून पुण्यात पोहोचलो हे कळतसुद्धा नाही. असा हा नेहमीचा प्रवास मात्र परवाच्या दिवशी खूप वेगळा अनुभव देऊन गेला. एरवी चातकासारखी पावसाची वाट पाहणारे आम्ही त्यादिवशी फक्त पाऊस थांबावा म्हणून मनातल्या मनात देवाचा धावा करत होतो. हवाहवासा वाटणारा पाऊस कधी रौद्ररूप धारण करेल सांगता येत नाही.
गौरी-गणपतीच्या सणासाठी मी घरी निघाले होते. मुंबई पुणे सिंहगड एक्सप्रेस दुपारी ३ वाजता ठाण्यातून पकडली. बरं झालं, reservation करून ठेवलं होतं असं मनातल्या मनात म्हटलं आणि माझ्या खिडकीजवळच्या सीटवर जाऊन बसले. दोन दिवसाची सुट्टी, काय काय करायचं याचे मनाशी आडाखे बांधत आणि मागच्या आठवड्याची उजळणी करत चालले होते. आपल्या आजूबाजूला कोण बसलंय याच्याशी काही देणं घेणं नव्हतंच. तरीपण उगाचच चहुबाजूने एक नजर फिरवली आणि लक्ष पुन्हा खिडकीतून बाहेर. नजर बाहेर असली तरी डोक्यात विचारचक्र सुरु असल्याने खरेतर मी बाहेर काय पाहत होते हे मलाही सांगता येणार नाही. गाडी थांबली, मी एकवेळ घड्याळ पाहिलं. ४:१५ वाजले होते. कर्जत स्टेशन….वडापाव, इडली-वडा, भेळ आणि चहा-कॉफी विकणारे खिडकीशी येऊन ओरडत होते. भूक लागलीच तर असावे म्हणून मी सफरचंद आणले होते सोबत आणि नेहमीप्रमाणे ५-६ chocolates होते. त्यामुळे त्या विक्रेत्यांकडेही मी थोडंसं दुर्लक्षच केलं. अजून दोन तास आणि मी पुण्यात… गाडी वेळेवर आहे का हे पाहण्यासाठी एकदा timetable तपासले. ५-१० मि. उशिरा पोहोचणार असं वाटलं. पण गाडी कर्जत स्टेशनवरच रेंगाळली हे लक्षात आल्यावर मी पुस्तक बाहेर काढले. 'यक्षांची देणगी' मधील एक कथा वाचली आणि पुन्हा बाहेर पाहिले तरी मी कर्जतमध्येच होते. मग जरा आजूबाजूच्या लोकांच्या चर्चेकडे कान दिला. गाडी का थांबली आहे याची पुसटशीदेखील कल्पना नव्हती मला. कोणीतरी म्हणाले, पावसामुळे कामशेतजवळ रेल्वे रुळावर पाणी आले आहे. तेवढं ओसरलं की मार्ग मोकळा होईल. आणि ५ च्या दरम्यान गाडी निघाली. लोकांनी एक नि:श्वास टाकला. कोणीतरी हळूच गणपती बाप्पा मोरया म्हटलं.
या एक तासात माझ्या आजूबाजूला बसलेल्यांनी यावर्षीच्या पावसाबद्दल थोडी चर्चा केली असावी असा मी अंदाज बांधला. कारण आता त्यांच्या बोलण्यात आमची शेती डोंगर उतारावर आहे. थोडी सपाट आहे त्यावर भाजीपाला लावलाय पण आम्हाला काही पाण्याची काळजी नाही वगैरे चालू होते. मग मी या चर्चेचा श्रोता व्हायचं ठरवलं. आतापर्यंत आपल्याच विश्वात असलेले आम्ही सहप्रवासी, आता कोण कुठे कशासाठी निघाले आहे याची विचारपूस करू लागले. आम्ही सहाजण बसलो होतो समोरासमोर. त्यात एकजण गांधी टोपी घातलेले, कपाळावर गंध-बुक्क्याचा टिळा लावलेले ५०-५५ वर्षाचे काका होते. शेतकरीच असावेत, कामशेतचेच रहिवासी होते. ट्रेनच्या त्या डब्यात बसल्या बसल्या आम्ही म्हणजे ते काका, डोंबिवलीचे एक दांपत्य, काळबादेवीचे एक गुजराती दांपत्य आणि मी असे आम्ही आता युरोप, अमेरिका, इस्राईल, चीन या देशांच्या राहणीमान आणि शेतीची सफर करून आलो. तीन वर्षापूर्वी हे शेतकरी काका कृषी विभागातर्फे जगभरातील शेतीची अभ्याससहल करून आलेले आणि हे गुजराती दांपत्य त्यांच्या मुलाकडे अमेरिकेला राहून आलेले. त्यामुळे हा परदेशभ्रमणाचा विषय किमान तास-दीड तास पुरला. आता त्यांचा तो अमेरिकेचा मुलगा तुलनेने जवळ म्हणजे पुण्याला राहायला आला आहे आणि त्याच्या लहान मुलाच्या शाळेतील आजी-आजोबा मेळाव्यासाठी हे दोघे पुण्याला चाललेले. ऐनवेळी जायचे ठरले आणि AC chair car चे ticketमिळाले नाही म्हणून आज ते आमच्या शेजारी होते. दुसरे दोघे गौरीच्या सणासाठी पुण्यात स्थायिक असलेल्या मोठ्या भावाकडे चाललेले.
गाडी नेहमीच्या वेगाने खंडाळा स्टेशनवर येउन थांबली. ६;३० इथेच वाजले. गाडीला एक तास उशीर झालाय हे सर्वांनी आतापर्यंत आपापल्या नातेवाईकांना कळवले होते. पण गाडी या स्टेशनवर सुद्धा आणखी तासभर रेंगाळली. काहीतरी गंभीर आहे याचा अंदाज यायला लागला पण आता माघारी जाणे कठीण झाले होते. कर्जत मध्येच इशारा दिला असता तर आम्ही लोकलने पुन्हा मुंबईला गेलो असतो असे सूर ऐकू येऊ लागले. गुजराती काका काकू खंडाळ्यातून बसने पुण्याला जायचा विचार करू लागले. पण हायवेपर्यंत मी अंधारात आणि पावसात चालत येणार नाही असे काकूंनी सांगितल्यामुळे काकांनी तो पर्याय बाद केला. त्यांच्या संवादावरून मला पु. लं. च्या पेस्तनकाका-काकूंची आठवण झाली. प्रत्येक स्टेशनवर गाडी थांबली की हे काका platform वर जाऊन उभे राहायचे आणि काकू आतूनच come inside , come inside म्हणत काकांना हाका मारायच्या. काकूंना मराठी फारसे येत नव्हते. काका नागपूरला मराठी माध्यमातून शिकल्याने चांगली मराठी बोलत होते. खंडाळ्यात काकांना कळले की कामशेतजवळ रेल्वे रूळाखालची खडी वाहून गेल्यामुळे गाडी पुढे सरकत नाही आणि आपल्या गाडीपुढे एक पुणे-लोणावळा लोकल, एक एक्सप्रेस उभी आहे आणि सर्वजण तो मार्ग मोकळा होण्याची वाट पाहत आहेत. खंडाळ्यातून गाडी सुटल्यावर डब्यातील सर्वांनीच गणपतीबाप्पाचा जयघोष केला. पण दहा- पंधरा मि. नी गाडी पुन्हा थांबली. आता ८ वाजले होते. लोणावळा स्टेशन होते. रात्रीच्या जेवणाची वेळ झाली होती. भूक लागली म्हणून लोकांनी काही ना काही खरेदी करून खाल्ले. मी पण चहा घेतला. लोणावळ्यात कळले की ९ वाजेपर्यंत गाडी निघेल. उशिरा का होईना पण आपण पोहोचू सुखरूप अशी मनाला समजूत घालणे सुरु झाले. एका भेळवाल्याने आपला आमच्या बोगीबाहेर उभा राहून त्याचा धंदा केला. भूक लागलेली असल्याने लोकांनी त्याच्याभोवती गर्दी केली होती. त्याचे चुरमुऱ्यांचे पोते रिकामे झाले आणि तो गेला, पण गाडी काही सुरु झाली नाही. घड्याळाचा काटा जसा १०-१०:३०-११ कडे सरकू लागला तसतसा लोकांनी घरी फोन करून घ्यायला कोणीतरी यावे म्हणून संपर्क सुरु केला. काही जणांनी स्टेशनवरून express way कडे कूच केली, मिळेल त्या वाहनाने पुण्याला जाऊ या उद्देशाने. नातेवाईक कोणी bike तर कोणी चारचाकी घेऊन स्टेशनवर आले. मी घरी फोन करून सांगितले आता काही सकाळपर्यंत लोणावळ्यातून गाडी बाहेर पडेल असे वाटत नाही. तुम्ही निवांत झोपा, मी सकाळी उजाडल्यावर बसने येईन पुण्याला आणि तोपर्यंत ट्रेन निघालीच तर चांगलेच आहे.
एवढ्या वेळात डोंबिवलीच्या काका -काकूंनी मला त्यांच्यासोबत रात्री त्यांच्या घरी यायचे सुचवले. पुण्यात रात्री एवढ्या उशिरा तू एकटी कशी जाणार या काळजीने. गुजराती दांपत्याने तर मला त्यांची बेबी करून टाकले होते. मला हे खा, ते घे म्हणून आग्रह करत होते. लोणावळ्यातच आणखी एका आजीची ओळख झाली. त्यांनाही शिवाजीनगर ला उतरायचे होते आणि सोबत मी असेन म्हणून त्या मला चिकटून राहिल्या. पहिल्यांदाच mobile सोबत घेऊन आलेल्या. त्यातले काही कळत नव्हते पण आज त्याचा त्यांना खूप फायदा झाला. तो नसता तर त्यांच्या घरच्यांची काळजीने काय अवस्था झाली असती देव जाणे!
रेल्वे रुळाचे काम रात्री १२:३० च्या सुमारास झाले असावे. १२:३० वाजता आमच्या पुढे असलेली चेन्नई एक्सप्रेस सुटली आणि एक वाजता आमची ट्रेन. पण पुढे तळेगाव पर्यंत ती प्रत्येक स्टेशनवर थांबेल असे सांगण्यात आले. कदाचित रात्री उशिरा चालली असल्यामुळे प्रवाशांसाठी सोयीसाठी त्यांनी हा निर्णय घेतला असेल असे मला वाटले. पण ट्रेन खूपच मंदगतीने चालली होती. आमच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे योग्यच होते. इतक्या साऱ्या लोकांची जबाबदारी त्या चालकावर होती त्यामुळे त्याने कसलाही धोका न पत्करता हळूहळू जायचे ठरवले असेल. लोणावळा ते पुणे हे एक- सव्वा तासाचे अंतर पार करायला ४ तास लागले आणि पहाटे ५;३० ला मी पुण्यास पोहोचले. शिवाजीनगर स्टेशन वर उतरून बसने घरी गेले.
मागील जन्माचे आपले ऋणानुबंध असतील म्हणूनच आपण एकमेकांना भेटलो आणि १४-१५ तास एकमेकांसोबत राहिलो असे ते काका बोलले. १५ तासात बरेच काही share केले सर्वांनी. पुन्हा असेच कधीतरी भेटू पण "असे" आजच्यासारखे नको असे म्हणून सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला.