माझं असे ठाम मत आहे की लेखकाने नेहमीच आपली पूर्ण मोडतोड करून आपल्यातला नवा लेखक शोधायला हवा..हा नवा संजन आहे.
कळ – संजन मोरे
जिवन एक स्वप्न आहे. माझा डावा हात प्रचंड सुजलाय. त्या सुजलेल्या हातावर मी तूझं कोरलेलं ओलं नाव. त्या कोरलेल्या नावात आता पाणी झालंय. म्हणजे ब्लेडने चिरलेल्या प्रत्येक खाचेत पाणी साचलंय. तूझं नाव म्हणजे माझ्या शरिराला झालेली एक प्रचंड जखम आहे. या जखमेत तू मला दिसतेस, तूला पाहायचं झालं की मी हाताचं दु:ख बघत बसतो. * दु:खाच्या वेलांटीच्या गोल बांधावर एक प्रचंड गोम पसरलीय, हजार पायाची. तूला हे असं समजणार नाही. मी ज्यावेळी हातावरलं तूझं सुजलेलं नाव पाहत होतो, तेंव्हा पाहता पाहता मी त्यात बुडून गेलो. तूझं नाव म्हणजे एक प्रचंड शेत झालं. तूझ्या वेलांटीच्या गोलावर बांध आडवून एखादी गोम पसरावी तशी माझ्या कातडीची काळी रेषा भिजलेल्या मांसात सुस्तपणे पसरली होती. मी पाहत होतो, रक्ताळलेल्या गाळात तूला शोधत होतो. पाहता पाहता पाण्याची खोली कमी झाली. मग मी दु:खाच्या खाचेत उतरून खेकडे शोधू लागलो. पण एकही दगड नव्हता, मला एकही खेकडा दिसला नाही.मी दु:ख हळूच कापसाने पुसून घेतलं पण थोड्याच वेळात त्यातून पुन्हा पाणी झिरपू लागलं. तू माझ्या उन्हाळी आयुष्यातली पायाखालची थंडगार वाळू. होरपळल्या पायांनी तूझ्या पाण्यात भिजलेल्या वाळूवर पाय ठेवला की तूझा भिजलेल्या वाळूचा स..ऽऽऽ… असा येणारा आवाज तू सोडलेल्या निश्वासासारखा वाटतो. * माझ्यासाठी बच्चन रडत होता. आता हेही तूला समजावून सांगावं लागेल. देवदास होवून तूझ्या वियोगात जेंव्हा मी रडत होतो, अगदी खराखूरा. सर्व काही विसरून मी रडत होतो तेंव्हा त्याला शराबी मधला “ चली गयी मेरी मीना .. “ चा शॉट करायचा होता, त्यासाठी तो खराखूरा प्रेमी शोधत होता. माझं मन त्याला खरंखूरं कसं रडायचं ते समजावून सांगू लागलं. मी म्हणजे बच्चन झालो, बच्चन म्हणजे मी झालो. जीव तोडून मीच तो शॉट करून दिला. त्याच्या आयुष्यातला तो मास्टरपीस होता. या एकमेव शॉटसाठी बच्चन मला मानतो. * कुणीतरी माझ्या कानात ओतलं.
“ जेवढं प्रेम पेराल तेवढं उगवेल. “ मी औतं घेवून तूझ्या सासरच्या वाटेने प्रेम पेरत चाललोय. प्रेम उगवून आलंय, उगवून आलेल्या पानापानात मला तू दिसतेयस. तूला मला हरवायची नाही. मी सगळी पाने गोळा करतोय. दिवस कधीच पसार झालाय. रात्र आपलं काळ्या आंधाराचं जाळं घेवून आलीय. रात्रीच्या राहुट्या ठोकल्या जात आहेत. तीच्या प्रचंड काळ्या तंबूखाली मी आहे. मी तूझी पानं गोळा करतोय. अंधारात पानापानाला लगडलेले तूझे डोळे चमकताहेत. तूझे चमचमणारे डोळे माझ्या झोळीत पडताहेत.
अचानक मी पेरलेलं सगळं पीक संपलं. सगळं शेत मी व्यवस्थित गोळा केलं होतं. तूझ्या पानांचा मी ढीग लावलाय. रात्र खूप झालीय. घरी जाता येणार नाही. तूला इथं ठेवून तर नाहीच. या माळरानावर मला आता रात्र काढावी लागणार आहे. तू माझी वाट बघत कधीची थांबली आहेस. मी माझं काम आटोपून तूझ्याकडे येतो. तू म्हणजे एक प्रचंड ढीग आहेस. मी तूझ्या ढीगावर डोकं टेकवून पडलोय. तू तूझ्या हातांनी माझं मस्तक कुरवाळत आहेस. मी तूला म्हणलं होतं ना ? अशी एक रात्र येईल की संपूर्ण रात्रभर तू माझ्या मिठीत पहुडलेली असशील ! आज ती रात्र आलीय. तूला हासताना पाहून किती काळ लोटलाय. * ही माळावरची ओबडधोबड जमिन एकदम मैदानासारखी सपाट का होवू लागलीय? या जमिनीवर तूझ्या नावाची प्रचंड अक्षरे कुणी काढलीत ? तूझा काळा ढीग अंधारात विलीन झालाय. तूझ्या नावाची पृथ्वी झालीय.प्रचंड अक्षरांची पृथ्वी. तू एक लालभडक जमिन आहेस ज्यात तूला मी शोधतोय. * प्रेम एक युद्धभूमी ! होय युद्धभूमीच. तूझ्या नावाची युद्धभूमी झालीय. तूझ्या नावाची अक्षरे म्हणजे आखून दिलेली युद्धभूमीच. पृथ्वी अन त्यावरची युद्धभूमी मी पाहतोय. मी पाहतोय महायुद्धातले प्रचंड रणगाडे. प्राचिन काळातील महाप्रचंड रथ.
युद्धभूमी सुनसान आहे. पण हे पाणी कुठून वाहतंय ? हे रक्त नाही ...निवळशंख पाणी आहे.युद्धभूमीवर कोण रडतंय ? हे कर्णाच्या डोळ्यातून ओघळणारं पाणी आहे काय ? कर्ण मला खूप जवळचा वाटतो. कधी कधी मीच कर्ण आहे असं वाटतं. मी रडतोय ..माझ्या डोळ्यातून पाणी वाहतंय. त्याने युद्धभूमीत चिखल झालाय...लालभडक.
ओल्या युद्धभूमीत कर्णाचा रथ चिकटून बसलाय. सुनसान युद्धभूमीवर फक्त एकटा कर्ण आणि त्याचा तो रथ रात्रभर ! कर्ण रथचक्र उपसायला धडपडतोय. उद्या सकाळी युद्ध सुरू होईल तेंव्हा रथ चालू पाहिजे. पण हा रथ हालत का नाही ? कर्णा ...मी तूला मदत करू का ? पण माझी पावले भूमीला का चिकटून बसलीत ? कर्ण लाचार आहे, मीही ! उद्या युद्ध सुरू झाले म्हणजे कर्णाला निदान हालता तरी येईल ..पण मला तर हालताही येत नाही. युद्धात मी एक जिवंत पुतळा असेन, फक्त डोळ्यांची हालचाल करत युद्ध पाहणारा. पंचासारखा तटस्थ. खेळात पंचावर मारा करायचा नसतो पण चूकून एखादा बाण माझ्या दिशेने तर येणार नाही ना ? हे भूमे ...मला कर्णाला मदत करू दे ! अगं कर्ण म्हणजे मीच आहे, शापात तळमळणारा. पण कर्ण ही आता चक्राला डोके टेकवून वैतागून झोपलाय बिनधास्त ! मृत्यूच्या मांडीवर सर्व विसरून. दोन कर्ण आहेत. एक, रात्रभर रथचक्र उपसण्यासाठी धडपडणारा, अन निघत नाही म्हणून मग रथचक्राला टेकून वैतागून झोपणारा. अन दुसरा,यशवंतराव चव्हाण ज्युनिअर कॉलेजातला मी ! कर्णाच्या तोंडावर युद्ध आलंय ! माझ्याही तोंडावर अशीच परिक्षा आली होती तेंव्हाही मी असाच सुस्तावलो होतो. * सकाळी युद्धाला सर्वजण जमलेत. कर्ण आज हरणार आहे. चक्र निघेना म्हणून तो मरणाची वाट बघतोय. युद्ध सुरू होण्याची वाट बघतोय.कर्ण खुप पराक्रमी होता.त्याच्या पराक्रमाला तोड नव्हती.मीही खूप हुशार होतो पण कर्ण युद्धभूमीत हरला मी नापास झालो. दोघांनाही शाप भोवले प्रेमाचे ! * तू म्हणजे काळजातून उठणारी शेवटची कळ आहेस ! तू माझ्या आयुष्याच्या कथेचा अकाली झालेला शेवट आहेस !!!