कलाकाराच्या जीवनात हे अंतर्विरोध असतातच....कालच एक पोस्ट वाचली...ती एक खूप चांगली कलाकार आहे..पण पोटासाठी तिला असे रोल करावे लागतात...ह्या तडजोडी केल्याकी.......पुन्हा एकदा..टॉप २० स्थान मिळाले नहीं...पण आज नुक्कड़वर तुमच्यासमोर आहे.
सुफियाना-मंजुषा अनिल
पंचतारांकित हॉटेलचा तो भव्य हॉल लोकांच्या नाचगाण्याने भरून गेला होता. बिट्स नाव होतं त्या हॉलचं. त्या नावासारखंच प्रत्येक जण आपापल्याच तालात होता. बिट्स भिनवू बघत होता प्रत्येकजण..स्वतःत रमल्यागत. कुठली धुंदी होती कोण जाणे. पण संगीताने तो हॉल भरून गेला होता. सुफी संगीत होतं ते. भारावणं म्हणूनच साहजिक होतं.
गायकाने त्याच्या धुंदीत कार्यक्रम संपवला. धुंदी उतरली तसं त्याने समोरच्या प्रेक्षकांकडे पुन्हा एकदा बघायला सुरुवात केली. संगीत अजूनही सुरूच होतं. एक विशिष्ट लय, नाद त्या अख्ख्या सभागृहात पसरला होता. आणि त्या नादाचं संमोहन त्या जमावावर पसरलं होतं.
त्याने आणखी लक्ष देऊन सभोवार बघायला सुरुवात केली. पंचतारांकित हॉटेलच्या एका सभागृहात तो होता. त्याच्यासमोर त्याच्याच संगीतात धुंद झालेला प्रेक्षकवर्ग होता. सगळेच पंचतारांकित वेषातले प्रेक्षक. त्याला समोर एक बॅनर लावलेला दिसत होता.. एक्सकलुसिव्ह सुफियाना शाम.
तो दचकला.
कसला सुफि..? एका फाईव स्टार हॉटेलमध्ये खुदा को खोजनेवाला सुफि..? त्याने तर भर चौकात, निसरड्या गल्लीत, जंगलाच्या एकांतात मग्न होऊन नाचावं.
त्याने स्वतःकडे पाहिलं. त्याने स्वतःलाच विचारलं..कसला सुफि तू..? डामडौलात रमणारा सुफि तू..?
तो थांबला. विमनस्क झाला. थकला.
संगीत हळूहळू कमी होत गेलं. तोही भानावर येत गेला. त्याच्या टिमकडे त्याचं लक्ष गेलं. मॅनेजरने अंगठा वर करून शो सक्सेसफुलचा इशारा केला.
इशारा समजताच सुफ़ि पुन्हा एकदा पंचतारांकित रिंगणात शिरला.
पंचतारांकित सुफ़ि, पंचतारांकित उबग आणि नाईलाज व्यावसायिकपण हातात हात गुंफून चालत होते.