मला ह्या कथेच्या शेवटाने जिंकले!
परी-उमेश पटवर्धन
एक होती परी. एकदा तिचे पंख हरवले. शोध शोध शोधले, सापडेना. मग तिने नाद सोडून दिला.
एकदा ती गेली माहेरी. खूप खूप गप्पा मारल्या आई बरोबर. मैत्रिणींना भेटली.. त्यांच्या बरोबर खूप खूप फिरली..डोळ्यातून पाणी येउस्तवर हसली. आई बाबांनी तिचे पूर्वीसारखे खूप खूप लाड केले.
आणि ती हवेत उडू लागली. अचानक आपण कसे उडू लागलो ते तिला समजेना. तिने पाठीशी हात लावले तर काय? तिला परत पंख फुटले होते.. पण मग नंतर तिची जायची वेळ झाली. डोळ्यात पाणी तरळले.. आईने ते पुसले.
तिने हळूच पंख काढून आईकडे दिले आणि हलकेच म्हणाली..
'हे जपून ठेव. मी परत येईन..'