आणि दुसरी कथा...पूर्णपणे वेगळी...बोली भाषेतली...हिच तर नुक्कडची खासियत आहे.
दपतर-सुवर्णा पावडे
"माय वं मल्हं दपतर"...
खोपटी भाईरच्या दगडावर बन्याची माय धुनं आपटंत व्होती, न् बन्यानं दोन तीन दिसापासून ह़्ये येकंच गानं म्हनालं सुर्वात केल्ती.
“माय् काही कामावर नी जाये, कस्काय आनीन ती दप्तर?”
काहीच समजे नी बन्यालं!
मायनं त्याल्हं म्हनलं, "जाय तुह्या बापाल्हं म्हनं यकदा"
बन्या सताड जपेल बापाजोय ग्येला, "बाबा वं.... वं बाबा, मल्हं शायेसाटी दपतर पाह्येल, उटा नं"... बन्यानं बापाल्ह आवाज द्येला, पन् त्यो बिन काई ऊटला नी.
बन्या पुना मायजोय आला....
मा़य बोलली, "काय बोलला तुपला बाबा? घिऊन द्येतो बोल्ला का?"
"बाबा उटलंच नी नं", बन्या.
"बरं,ऊटला का मंग मी बोलती", आसं म्हनून बन्याच्या माय नं धुन्याचे बोये पियले, न् बाजीवर, दोरीवर वायत घातले.
त्ये घरात आली.
तीनं बन्याच्या बापालं आवाज द्येला.
बन्याचा बाबा उठला.
"बाबा मल्हं दपतर पाह्येल शायेत जायाला. समद्या पोर्हाईकडं दपतर हय, मीच वायरची पिवशी घिऊन जातो, मल्हं आता दपतर", बन्यानं बापामांगं त़्याचं रडगानं सुरू क्येलं
"जपमदून उटल्या उटल्या काय लावलं य र्ये ह्ये .... कुठून आनू पैशे तुपलं दपतर आन्याल्हं? चाल व्हय....पैशे मियाले का पाहू!" ...बन्याचा बाबा!
बन्याच्या माय ल्हं काही आवडलं नी त्याच्या बापाचं बोलनं. वाईट बिन वाटलं नं!
"अय बन्याची माय! परसाकडं जावून येतो, मंग आंगुळ करतु, तथलोग भाकर टाक गरम गरम, जेवनंच करून घितो, ११ वाज्यालं गन्या यीन त्याच्या संग जायाचं य शिलँप हय आज"
बन्या पुन्हा बापाजोय आला, "बाबा मलं दपतर पाह्यजे"
बन्याच्या बापानं येकंच ठिवली, त्येच्या होपकाडात, "तुल्हं तिखडं मर सांगलं नं.... काहून सारका सारका मपलं डोखं खायालं यू र्हायला? पैशे नी सांगलं नं येक डाव!"
बन्या लडंत लडंत भायीर ग्येला.
त्याच्या मायनं परात काहाडली, चूल चेटवली. जरमलच्या डब्ब्यातून पसाभर भाकरचं पीट परातीत काहाडलं. बघोनं भरून पानी घ्येतलं ,चूलीवर तवा ठिवला न् भाकर्या रांधालं सुर्वात क्येली. "अय मंदी चालती नं वं सोंग्यालं?" बाजुच्या खुपाट्यातून तिल्हं आवाज आला. नंदी बलवंत व्होतीव, मंदीलं. कामावं जायाला!
भाक्र्या रांधता रांधता, बन्याच्या मायच्या डोख्यात ईच्यार आला.... बन्या शायीत गेल्यावर न् त्याचा बाप कामावं गेल्यावर मल्हं बिन काम मियालं तं!!! त्या पैशातून बन्या लं दपतर आनता यील नं!
ईचार पुढं पुढं जात व्होते नं पोयपाटाचा तबला जोरानं वाजू लागल्ता! भाकर्या थापता, थापता.
बन्याचा बाप परसाकडून आला. हात पाय धोतले न् लगेच बन्याच्या मायला आरडर सोडली, "अय बन्याची माय पानी काहाड,गरम! आंगुळ आटपून घेतो!" पुडी बोलला, "कुढी गेला त्यो बन्या? त्यालं सांग पुन्हा दपतर च नाव नकू काढू. पैशे नी मपल्या जोय".
बन्याच्या मायनं, त्याच्या बापाच्या सगया आद्न्या मानल्या. पानी द्येलं. आंग धून आल्यावं जेवालं वाडून द्येलं. तथलोग आकरा वाजले. बन्याचा बाप शिल्यापच्या कामालं ग्येला.
बन्याच्या मायनं समोरच्या रखमीला आवाज द्येला, "रखमी ,तुपल्या संग कामालं यिऊ देती का? सोंग्यालं! रोज मियाला तं दपतर घिऊन दिल, बन्यालं! त्याचा बाप पैशे नी म्हंतोय"
"संग यिऊन पाहाय, काम मियालं तं करआऩि काय सांगू?" रखमी बोलली.
"थाम बन्यालं सांगती, चप्पल घालती न् लगेत निंगती, तुपल्या संग. देव करो न् मल्हं काम मियो" बन्याच्या मायनं ऱखमीला म्हनलं.
"बन्या शायेतून आल्यावं दारातंच खे जो, मी आज सोंग्यालं जाऊन येती" मायनं बन्या लं सांगलं.
"हाव ,जल्दी ये जो", बन्या बिन मायलं बोल्ला.
बन्याची माय शेतात ग्येली. तिल्हं काम बिन मियालं. दिवसभर मरमर क्येली तिन्हं. सांज झाली ३०० रूप्ये रोज मियला.
आता सांजच्यालं ३०० रुप्याचं तीन हिरव्या पत्त़्याईचं वझं तिनं बराबर पद्राच्या गाटीत बांध्लं.
घराच्या वाटेनं येताना लय खुष व्होती ते!
आनंन झाल्ता.
मनात ईच्यार घड्याळीच्या काट्यापुढं पयत व्होते...
"घरी जाईन,बन्या येल आशीन,चांगली साडी बदलून घीन,बन्या लं घिऊन बज्रात जाईल, नं बन्या लं आवडंल त्ये दपतर वं माय श्याक म्हंतो तो...श्याक घिऊन दिल. त्याच्या बापालं सांगील पाहा आनलं बन्या लं दपतर,आता नी मांगनार त़्यो तुम्हालं. वं माय, मपला बन्या श्याक नील नं रोज शायेत."
त्ये मनाशीच हासली. रखमी बोलली, "जमलं नं वं बन्या ची माय?" बन्याच्या मायलं मोकय हासू आलं. तिचा चेरा च़्यमकला. बस, आता घर गाटायचीच देरी का, आज राती आटच्या पह्यले बन्या लं दपतर....
ईच्यारा ईच्यारातंच त्ये वेटाळाजोय यिऊन पोस ली.
तिच्या घरापुडं लोकाहीची गरदी दिसली. ५-६:बाया मानसं ह्ये कल्ला करू र्हायले व्होते. तिलं काई समजना....तीनं पाय ऊचलले न् बानाच्या येगानं घराच्या आंगनात पोसली. "बरं झालं बन्याची माय जल्दी आली तु.... पोर्हं म्हनू र्हाले का बन्यालं काई डसलं... त्येलं मिरची द्येली खायलं....पन् दावखान्यात ने वं बाई", शेजारीन कासाबाई बोलली . बन्याची माय सुमसाम हून ग्येली. काय बोलावं त्ये सुचं ना. येका फटक्यात बन्याजोय पोस ली. बन्यालं खांद्यावं ऊचललं न् डाकटरच्या घराकडं पयतंच सुटली. बन्या चूपचाप हून जायेल व्होता. डोये बन् करेल व्होते त्यानं.
डाकटर घरीच सापडला...डाकरनं सांगलं का, " सर्कारी दावखान्यात न्या"
तिन्हं संग येल बालूलं आयटो थांबालं, लावली.. आयटोत ते न् रखमा,बालू बन्यालं घिऊन सर्कारी दावखान्यात पोस ले. कागद भरून द्येला, बन्यालं भर्ती क्येलं. तिचा जीव खाल्वर हूं लाग्ला. समजना... काय हू र्हायलं य ते.
डाकटरनं नाका तोंडाईत नया टाकल्या नं सांगलं .... "साप चावलेला आहे. त्याला ठीक करण्याचेल १००टक्के प्रयत्न करतो, काळजी करू नका, पुरुष कोण आलंय, तुमच्यासोबत? बाहेरून हे एक औषध आणावं लागेल, पैसे असतील नं?"
आरध्या घंट्याआदी पैशानं दपतर घ्यायाचं सपन पाह्यनारी बऩ्याची माय.... !!
तिल्हं आतालोग पद्राच्या टोकात बांधून सांभायेल दपतराचे पैशे आटवले...
खस्कन पद्राला बांदेल गाट सोडंत तिन्हं पैशे काहाडले.... न् डाकटरच्या सामने धरंत बोल्ली...."मानूस नाई, पन ह्ये पैशे हायेत नं...ह्येच्यात औषद आनून देती... मपला ल्योक वाचवा... दपतरासाटी परंत जाईल मी ... सोंग्यालं"!