प्रेमाचे एक रूप...असे...त्याच्याशिवाय दुसरं कोणी नाहीच...पण तोच नाही...
तूच – अस्मिता देशपांडे
या भर दुपारच्या भगभगत्या उन्हांत झळझळून उठली बघ तुझी आठवण. त्या आपल्या नेहेमीच्या चहाच्या टपरीवरून खच्चून ओरडून हाक मारावीशी वाटली तुला.
“मना..... येरे... ये की... कित्ती छळशील.. बघ त्या झाडांना पण कळतय माझं दु:ख. वाळल्या पानांची आसवंढाळतायत ती माझ्यावर... तुलाच कशी कळत नाहीरे माझी वेदना? तो तुझा लाडका गुलमोहर बघ.. लखलखतोय माझ्याच रक्ताची फुलं लेऊन...तुलाच रे कशी दिसत नाही माझ्या काळजातली भळभळणारीजखम? त्या तेजोनिधी भास्करालाही दिसतयं माझं जळणारं हृदय...त्याची तप्त किरणं समजावतायत बघ मला. तो बघ तो अविरत धावणारा वारा... झाडांच्या शेंडयांमधून धावता धावता बिलगतोय मला येऊन..
तू मात्र येत नाहीस...
फक्त तूच येत नाहीस.