एक लेखिका जान्हवी पाटील...दोन अभिव्यक्ती...म्हणून दुसरी कथा तिचीच...
धंदा – जान्हवी पाटील
चालत्या ट्रेन मधून सट्सट उतरत तो पळाला. रेल्वे लायनीच्या समांतर झोपडपट्टीट पाय आपसूक वळले. दाराशी जाऊन पुन्हा उलट दिशेने चालत राहिला.. न सुचल्यासारखा..
पलिकडच्या लायनीवर दोघं तिघं ओळखीची तोंड बसली होती बिड्या सिग्रेटी फुकट.
“ए सुन्या जल्दी आया बे. इधर आ. और तेरा रक्कु किदर गया रे..?”
खिंकाळत एकाने आवाज दिला..गळ्यात आलेला आवंढा गिळून समोर पोहोचला. उभा लांबुडका चेहरा. सडसडित शरीर. चेक्सचे मळके शर्ट. वय तेरा नाहीतर चौदा च्या आतबाहेर. शून्य नजरेने बघत काहीबाही पुटपुटत रूळावर बुड टेकले. डोळ्यातून पाणी आलेले पालथ्या मुठिने पटकन पुसुन घट्ट मूठ दाबून सुन्या बसून राहिला.
'रोता कायकु बे.. बोलेगा? साला औरत जैसा नखरा मत कर' एकजण डाफरला..
'ले..'एकाने सिगारेट पुढे केली.
मानेने घट्ट नकार.
बोल रे सुन्या. टेंशन है क्या? और तेरा वो रक्कु? किदर है?
डोळ्यातुन पाणी सरासर ओघळले. यावेळी सुन्याने थांबवले नाही.
'पुलिसने धंदेका सामान लिया सब. माराबी. पैसा बी लिया सब.'
तिघेही शांत. नेहमीची गोष्ट. नवीन काय..पोलीस येणार, दोन लाफे लगवणार, धंद्याचे सामान घेणार. चार पैसे चीरीमीरी माल मोकळा. यात काये रडण्यासारख तिघांना कळेना.
'दो हजार का माल था. पुलिसने लिया, दिया नई.. मारके निकाला बार. उधरसे निकला रक्कुके पास जाके बोला तो उसनेबी मारा मेरेको. बहुत मारा. सामान फुकट थोडा लिया था उस्से मैं.. बापू से थोडा लेके और कमाके देनेका था उसको. वोहीच बोलने गया था'
'पुलिसने मारा ठीक था. रक्कु ने क्यूं मारा? मेरा दोस्त है न वो.. बोल ना..'
धंद्यात दोस्तीबिस्ती काय नाय हे धंद्यात नव्या आलेल्या सुन्याला कसं समजावावं ते न कळून तिघंही सिग्रेटी पायाखाली चुरडत बसले..