माधवीताईनी नुक्कड साहित्य संमेलनाचे उद्घाटन करताना ही कथा वाचून उद्घाटन केले. निर्मिती...एक विशुद्ध आनंद देणारी प्रक्रिया असे ह्या कथेचे स्वरूप आणि ते मांडत असताना त्यांनी वापरलेले रूपक किती मोहक आहे हे वाचल्यावर कळेल. त्या दिवशी विवेक सावंत सर म्हणाले मी कथा ऐकताना ट्रान्स मध्ये गेलो...हाच अनुभव तुम्हाला येईल.
नितळ – माधवी वैद्य
ती झुळुझुळू वाहणार्याा झर्यायकाठी येऊन बसली. किती सहजतेनं वाहात होतं पाणी! खळाळत, हासत, दौडत. वाटेत आलेल्या सर्व अडथळ्यांना लीलया ओलांडत. अडथळ्यांची शर्यत लावली तर याचाच पहिला नंबर यावा. परत वाटेत अडचणी आल्या तर त्याबद्दल रडणं नाही, रागावणं नाही, धुसफुसणं नाही. आपल्याला कोणी प्रदुषित करत आहे, त्याबद्दल चकार शब्द नाही. आपण स्वत:च ते प्रदूषण दूर करत वाहात राहायचं. शक्य तितकं स्वत:ला स्वच्छ करत करत जगायचं. प्रवाहात पडणारी अशुद्धता आपल्याच वाहण्यानं बाजूला सारत वाट कढायची. आपण वाहताना शक्यतोवर दुसर्याअची काळजी वाहायची. बुडणार्याकला तारायचं, तहानलेल्यांना पाणी द्यायचं. दु:खितांना निववायचं. पीडितांना सुखवायचं. असं करत करत नदीला जाऊन मिळायचं. समर्पित व्हायचं. आत्मसमर्पण. खर्या अर्थानं आत्मसमर्पण. मग एकदा असं समर्पित झालं, की मागे वळून पाहायचं नाही. उतायचं नाही, मातायचं नाही. घेतला वसा टाकायचा नाही. ज्या नदीला जाऊन मिळतो त्या नदीला विचारायचं देखील नाही ‘काय ग बाई! कुठे घेऊन जात आहेस मला?’ ती नीटच नेईल आपल्याला हा विश्वास. ती कसं वाईट करेल आपलं? छे! हा प्रश्न सुद्धा मनात आणायचा नाही. सर्वमंगलाचं स्तोत्र गातच वाटचाल करायची. आपल्या वाहण्यानं कोणाचं नुकसान होणार असेल तर स्वत:ला आवरायचं, सावरायचं. प्रसंगी स्वत:ला बांधाच्या बंधनात बांधून देखील घ्यायचं. मनात सच्चेपणा, निर्मळता आणि सर्वांचं भलं करण्याची वृत्ती जोपासायची. आणि हे व्रत आचरणात आणत आणत तपाचरणासारखं झुळुझुळू वाहात राहायचं. सोपी गोष्ट नव्हेच ही... ...
आणि आपलं जगणं! नकोच तो विचार. सारखं खळखळाटानं जगत राहायचं. आपण जगताना आपलंच भलं चिंतत राहायचं. दुसर्यााची गैरसोय कशी होईल? यात आनंद मानत जगायचं. प्रदूषण मनात ठासून भरलेलं. आपलं मन शुद्ध नाही. बाहेर काय स्वच्छता साधणार आपण? तिनं आपलं सारं लेखन त्या नितळ प्रवाहात सोडून दिलं. मनाशी एका गोष्टीचा निर्धार केला आणि ती उठली.
अस्वस्थ होऊन ती सागर किनारी गेली. समोर अथांग सागर पसरलेला होता. याचा तळ सापडण्याच्या नुसत्या इच्छेनंही घाम फुटेल एखाद्याला. तिनं सागराकडे बघितलं. मावळतीच्या सूर्य किरणांनी सागराचं पाणी झळाळून उठलं होतं. या सागरी लाटांचं नर्तन किती काळ चालू आहे, किती काळ चालू राहाणार आहे! अव्याहतपणे लाटा उठतात, एक लाट दुसरीला खो देते, पहिली लाट मूकपणे विरून जाते असं होत होत शेवटच्या लाटेला सागर किनार्याटवर पोहोचण्याचं भाग्य मिळतं. काय अर्थ असेल या लाटांच्या नर्तनाचा? पण शतकानुशतकं हीच लय, हाच दिमाख, हाच वेग आणि हाच आवेग. यात कधीच कोणताच खंड पडत नाही. फक्त फरक पडतो तो भरती ओहोटीच्या आवेगांचा. तरीही लाटा उठतातच. त्यातलं सातत्य कधीही भंग पावत नाही. ओहोटी नंतर भरती येणारच आणि भरती नंतर ओहोटी. सूर्यास्तानंतर सूर्योदय होणारच. हे गृहीतकच असतं या सागरी व्यवहारांचं. सर्व परिस्थिती स्वीकारून आपण आपलं गर्जत राहायचं. आपण आपलं फुटत राहायचं हेच ध्येय. त्या दृष्टीनं सारं सोसणं, भोगणं, हरवणं, धावणं कसं आखीव रेखीवपणे सुरू असतं. कोणीही शास्ता नाही, कोणीही भोक्ता नाही. आपण आपलं कर्म करत राहायचं. निष्कामपणे.
तिनं समोर बघितलं. सांजावून आलं होतं. सूर्य आता क्षितिजाकडे झेपावत होता. जल समाधी घ्यायला उत्सुक असल्यासारखा, दिवसभराच्या श्रमानं काम चोखपणे पार पाडून आता उद्या पुन्हा उगवायचं दमदारपणे. जगाचं भलं करायचं हा एकमेव हेतू. असे सातत्य, असा निष्काम कर्मयोग झेपेल आपल्याला? आपल्याला तर कधीच मावळायचं नसतं, फुटायचं नसतं, प्रकाशाचा इतका सोस, की मावळणे तर मनात येतच नाही. या लयीचं सातत्यही आपल्याला न झेपणारं. याच्या सारखी नर्तनातली सफाई, सातत्य आणि तपश्चर्या न उमगणारी. आपल्या पोटात इतकी रहस्यं दडवत शतकानुशतकं येणार्या भरती ओहोटीला तोंड देत दुसर्याउला आनंद देण्याचं तर दूरच राहो.
विचार करता करता सूर्य क्षितिजी बुडाला सुध्दा. त्याची काही काळापुरती घेतलेली विश्रांतीही किती मोहक. क्षितिजावरून नजर डढळतच नाही आपली. आपल्याच अस्तित्वाचा असा काही काळापुरता होत असलेला अंत किती शांतपणे स्वीकारतो हा! आता सागर किनारी मंद, शीतल वारा वाहू लागला. या वार्यााचंच रिझवणं तर हवं असतं नाही का आपल्याला सूर्यास्तानंतर! जणू म्हणतो आहे तिला, उठा आता बाईसाहेब! निसर्गाला गुरू मानलंत तरी त्याचं शिष्यत्व पत्करणं ‘येरा गबाळाचं काम नाही.’ त्याचे बोल मनात ठेवून ती तिथून उठली. सागर किनार्याणची थोडी वाळू तिनं आपल्या हातात घेतली आणि आपल्या कपाळी लावत म्हणाली, ‘खरं आहे बाबा तुझं. मान्य आहे. अरे पण आहे ती परिस्थिती, जशी आहे तशी स्विकारण्याचं बळ तरी मला याच्याकडून घेता येईल की नाही?’ तिच्या मनात आलं, का बरं आपण निसर्गाचा निर्व्याजपणा घेऊ शकणार नाही? आपणही तर निसर्गाचाच एक भाग आहोत की नाही? प्रयत्न तर करून बघायला काय हरकत आहे?
तिला नेहमीच कुतूहल वाटायचं. फूल कसं उमलतं? मग ती एक दिवस सारी रात्र जाग जाग जागली. तारवटलेल्या डोळ्यांनी पण तरारलेल्या मनानं ती उठली. बागेतल्या, एका वेलीपाशी जाऊन बसली. एक कळी वार्यााबरोबर मंद मंद झुलत हेलकावे घेत होती. तिला वाटलं आपणच झोपाळ्यावर बसून आंदोलित होत आहोत. सुखद आंदोलनं. उमलण्याच्या प्रक्रियेआधीची, मनाची हळवी अवस्था. आता दोघींची ही तीच अवस्था. त्या मुग्ध कलिकेची आणि तिची. हळूहळू वार्यावची लयदार झुळूक आली. मग त्या मागून आणखी एक लयदार झुळूक. मग वार्या च्या मंद सुगंधित लाटांवर लाटा आल्याचा भास. मग त्या पाठोपाठ पडणारे, नाजूक, चमकदार, हिर्यां्प्रमाणे भासणारे दवबिंदू. त्या कळीला खुलवण्यासाठीच जणू आलेले. दवाचा एकेक बिंदू त्या कळीच्या पाकळ्यांवर पडायला लागला. ती मनातून शहारून आली कळीसारखीच. एकेक दवबिंदू अंगावर झेलून घेताना त्या कळीची कळी खुलत होती. हसत होती. डोलत होती. तिच्या समोर आता अद्भुत घडायला सुरुवात झाली होती. कळीचं फूल होतानाचे निर्मिती रहस्य ती आसुसून बघत होती. ती या निसर्ग निर्मितीच्या चमत्कारानी अक्षरश: भारावून गेली. एका शुद्ध, निर्मळ, निर्मिती प्रक्रियेची ती साक्षी होती. हा एक सुखद आणि भारावून टाकणारा अनुभव होता.
अशी निखळ, निर्हेतुक निर्मिती मानवाच्या हातून व्हायला पाहिजे. तिच्या मनात विचार आला. कळीचं फूल होतानाची प्रक्रिया फारच आल्हाददायक, देखणी, मन वेडावून टाकणारी, मनस्वी आणि आनंदाची पखरण करणारी होती हे निर्विवाद. ते बघतानाही एक प्रकारची समाधी लागावी तसंच तिचं झालं. तिचे डोळे आनंदानं आपोआप पाझरू लागले. एक निर्हेतुक कलाकृती तिच्या समोर विनासायास प्रकटत होती. त्यात कुठेही मिरवण्याचा अट्टाहास नाही, फुकटचा दिमाख नाही, कोणाशी स्पर्धा नाही कोणाचं उणदुणं चिंतण्याचा कावेबाजपणा नाही. फक्त उमलण्याचा ध्यास, फुलण्याचा प्रयास,सुगंधित होण्याची आणि इतरांना सुगंध वाटण्याची आस. माझं पुढे काय होईल? मी देवाच्या पायीं वसेन, की कोणाच्या शवावर वाहिली जाईन याची चिंता नाही. फक्त माझ्यासाठी, स्वानंद आणि इतरांसाठी आनंद वाटण्याचीच मनीषा. ही निर्मिती कोणाची म्हणायची? देवाची? की निसर्गाची? जे निसर्गालाच मानतात त्यांनी निसर्गाची समजायला हरकत नाही, जे ईश्वराला मानतात त्यांनी ती ईश्वराची समजायला हरकत नाही. म्हणजे ती त्या निर्मात्यापासूनही मुक्त होती. तिचे अस्तित्वही किती क्षणभंगूर! आनंद देण्याचा काळही किती लहान! पण मग त्यासाठीही कुठे कुरकूर नाही! शाश्वत अशाश्वताचा पसारा नाही. जितका वेळ अस्तित्व तितका वेळ फक्त एकच गोष्ट मनाशी पक्की आणि नक्की बांधलेली. आपण मनसोक्त बहरायचं. ते देखील निजानंदासाठी. निर्हेतुकपणे.
या सार्यात पार्श्वभूमीवर तिला आपल्यातलं खुजेपण फारच ठळकपणे दिसायला लागलं. मी माझ्यासाठी निर्मिती करते का? निर्हेतुक? स्वानंदासाठी? मला वाटतं आहे म्हणून मी व्यक्त होते का? त्या फुलण्यात, व्यक्त होण्यात अपरिहार्यता असते का? निर्भेळ आनंद? तिला तिच्याच नाही, तर तिच्या आसपासच्या सर्वांचीच, कला निर्मितीची धडपड आठवली. कोणा कोणाच्या निर्मिती मागे काय काय हेतू छपलेले असतात, त्याच्या नुसत्या आठवणीनंच तिचं मन सैरभैर झालं, पण निखळ निर्मिती करायला मात्र आसुसलं. तिचे डोळे परत एकदा पाझरू लागले. त्या पाझरण्यामागे व्यथा होती. आपल्या हातून झालेल्या फसगतीची कबुली देत ती उठली. आपल्याला रात्रीचं जागरण वगैरे झालं आहे हे ती विसरली तिच्या हाती जणू मोरपीस होतं. तिनं भुईच्या काळ्याशार मातीवर त्या मोरपिसानं, निर्व्याजपणे अक्षरं गिरवली ‘श्री’.... त्या अक्षरांवर एक टपोरा दवबिंदू पडला, हिर्याेप्रमाणे लकाकणारा... चमकणारा... तीर्थस्वरूप...