चित्तथरारक कथेचा दहावा भाग....
पद्मालय – आसावरी देशपांडे
भाग १०
मनवा
शारदा अंगणात हौदाजवळ उभी होती,तिचा चेहेरा घामाने डबडबला होता, नजर शून्यात होती,पण तिच्या चेहऱ्यावरून जाणवत होते की तिने काहीतरी भयाण पाहिले असावे, मी हौदात वाकून पाहिले काहीच वावगं दिसलं नाही.मग शारदाच्या चेहेऱ्याचा रंग कशामुळे उडाला असेल?पुन्हा एकदा धीर करून हौदात पाहिले.
आई ग.......
हौदात एक रक्ताळलेला डोळा दिसला,त्याक्षणी पोटात डचमळलं, ते वर उचंबळून आलं,अजून वर गळ्यापाशी, तितक्यात तोंड दाबून मी बाजूला गेले भडभडून उलटी झाली..मी मटकन खालीच बसले. क्षणभर वाटलं आपल्या डोळ्यातून रक्त उसळ्या मारतंय की काय? मी वेड्यासारखे दोन-तीन-चार वेळा डोळे धुतले, मागे वळून पहाते तर काय शारदा पुन्हा हौदाजवळ जाऊ लागली...आता मात्र ती काहीतरी बडबडत होती...
"मनवा ताई, सायब अडचनीत हायेत मला मगाशी हितूनच आवाज आलता सायबांचा. मी तुम्हास्नी येकदा म्हनलं व्हतं न , बंगल्यासनी तळघर हाय. ह्यो बगा हितूनच तळघराचा रस्ता हाय"
मला आठवला तो दिवस, त्या दिवशी पौर्णिमा होती काळ्याकुट्ट आकाशात गोल गरगरीत चांदीचा गोळा दिमाखात विराजमान झाला होता... तेच ते सोनचाफ्याचे अत्तर, तोच उग्र, मादक सुगंध आणि सोबत घुगरांचा आवाज..मी त्या आवाजाच्या दिशेने जाऊ लागले, इतक्यात शारदाच्या आवाजाने मी भानावर आले, मी बंगल्याच्या गेट जवळ उभी होते, म्हणजे शारदाची किंकाळी कानावर पडली नसती तर मी या अवस्थेतून बाहेर आलेच नसते, याचा अर्थ दरवेळेस शारदाने माझा जीव वाचवला आहे.नक्कीच माझ्या जीवाला धोका आहे इथे.....त्यादिवशी तिच्या किंकाळीच्या दिशेने मी गेले आणि अजून एक गूढ माझ्यासमोर उभे राहिले, शारदा सांगत होती या घराला तळघर आहे, का कुणास ठाऊक पण माझा या गोष्टीवर विश्वासच बसत नव्हता.
शारदा जीवाच्या आकांताने मला सांगण्याचा प्रयत्न करत होती,
"नाय हो मनवा ताय ते सपान न्हवतं जी, हितच ह्या फरशीला बगा मी हाताची थाप मारली फरशीवर, आन आक्षी तशीच थाप खालून पन आली व्हती. आसं बगा तीन चार वक्ताला झालं, म्हनून मी ओरडून पुसलं, कोन हाय? तर खालून आवाज आला 'मी हाय',त्याच्या तोंडून एक संस्कृत भाषेमंदला शोलोक बी ऐकू आला "
त्यावेळेस मी शारदाला खूप हसले, तिला वेड्यात काढले, पण आता मलाच वेड लागणार की काय भीती वाटत होती.
त्यादिवशी देखील शारदा घाबरून म्हणाली, "कायतरी ईपरीत हाय हितं, ह्या जागेचं मला लय भ्या वाटतं बगा"
हो,हीच ती वाट असेल का तळघराकडे जाणारी,पण खरंच नेमकं काय असेल इथे? शारदा म्हणते त्याप्रमाणे हा तोच संस्कृत श्लोक असेल का जो मला स्वप्नात मिहिरच्या हातावर लिहिलेला दिसला...पण याचा अर्थ मिहीर तळघरात आहे..छे शक्यच नाही
पाठमोरी असतानाच मला पाणी उसळून बाहेर आल्याचा आवाज आला मी क्षणाचा देखील विलंब न करता मागे वळून पाहते तर काय शारदा हौदात उतरली हौदातले पाणी गायब झाले, हौद कोरडा झाला, आता हौदाच्या अरुंद पायऱ्या दिसत होत्या, एका चिंचोळ्या वाटेनेशारदा एक एक पायरी उतरून खाली जाऊ लागली, मी तिला आवाज देत होते, अगदी जीवाच्या आकांताने..पण माझा आवाज मलाच ऐकू येत नव्हता, आता शारदा दिसेनाशी झाली...मी हौदाजवळ बसून शारदाला आवाज देत होते, पण तिच्याकडून काहीच प्रतिसाद नव्हता आता पाणी हळूहळू माझ्या दिशेने येत होतं मी बाजूला झाले , हौद पाण्याने भरला, कित्ती मोहक वाटत होता हौद! मला मात्र स्वतःची शरम वाटत होती, शारदाने आपला प्रत्येकवेळेस जीव वाचवला आणि तिचा अंत आपण उघड्या डोळ्यांनी पाहिला याची बोचणी मनात घर करत होती आणि काळजात धस्स झालं,कारण
हौदात कमळं पहुडली होती पण
यावेळेस हौदात तीन कमळं होती....
क्रमशः