सुनीत काकडे काय भन्नाट लिखाण आहे...खूप खूप आवडले...सुनितचा भविष्यकाळ उज्वल आहे!!
विक्रम
अवसान – सुनीत काकडे
पार्वतीबाईनी लुगड्याचा शेव हातात धरून खिळ्यांनी खिळखिळ्या झालेल्या वाहनाचा पाय ट्रकच्या फाळक्यावर ठेवला. दुसऱ्या हातानं साखळी धरून, पायावर जोर देऊन पार्वताबाई ट्रकवर चढली.... जिवाची घालमेल, चेहऱ्यावरच्या झुरयांमधे स्पष्ट दिसत होती. चेहऱ्यावरून ओघळणारे घामाचे थेंब कपाळावरच्या जुन्या रूपयाच्या आकारा एवढ्या कुंकवातुन नाकापर्यंत पोहचले होते.
मालकाला किडुक चावुन तासभर तरी झाला होता. अंग निळ पडाया लागलेल. वाडीतल्या लोकांनी म्हाताऱ्या वरून लिंबु ऊतरवुन टाकला, काहींनी सदुबाचा अंगारा आणून म्हतारयाच्या कपाळाला लावला आणि सुतकी चेहरे घेऊन कुजबुजत म्हाताऱ्याला कोंडाळ करून बसली.
गावच्या दवाखान्यातला डाक्टर संध्याकाळीच घरी गेलेला. गावात एकचं गाडी जन्याची, तो दुपारपासुन ढोसत, सदुबाच्या चींचीखाली पडलेला. वाट पाहन्या शिवाय हातात काही नव्हतं. कुश्या म्हातारं किसन पाटलाच्या कानाला लागुन बोल्ल, 'पाटील आता व कसं करायचं, म्हातारं काही दम काढत नाय'.
किसन पाटील बाब्याकडं तोंड करून म्हणाला, 'लवकर म्हाताऱ्याच्या लेकीला निरोप धाडा, जादा वखत दौडऊ नका.”
सपराच्या भिंतीला टेकलेल्या पार्वताबाईनी किसन पाटलाचं बोलणं ऐकलं, तशी 'तुहा मुर्दा बसीवला, भाड्या' अश्या शिव्यांचा पट्टा चालु करून म्हातारी ऊठली. आजुबाजुचं कोंडाळं हाकलुन लावलं, लोकास्नी वाटलं, म्हातारी घावानं बिथरलीया. पण तोंडी लागन्यापेक्षा म्हातार गेल्यावर येऊ म्हनुन मंडळी ऊठु लागली.
गर्दी कमी झाल्यावर म्हतारीनं ट्रंकतल धोतर काढलं आणि म्हाताऱ्याला त्याच्यावर टाकलं. जनाई आणि तिची सुन म्हतारीला मदत करीत होत्या. म्हातारी ऊभी राहीली आणि जनाईला म्हणाली, 'वाईच जोर लावा, म्या ऊभा राहतु, म्हातारयाला पाठकुळीवर नीट बांधुन द्या.'
सगळ्या हालचालींना गती आली होती. म्हाताऱ्याला पाठीशी बांधुन पार्वताबाई रस्त्याला लागली. पाठीवरच्या वजनाने पायातल्या भेगांची रूंदी वाढली, तिच्याच श्वासाचे आवाज रानातली शांतता भेदत होते. पाठीवरच्या ओझ्यावर चाळीस वर्षाच प्रेम भारी पडत होत. पायांना आता गती मिळाली होती. पार्वताबाईच्या माग जनाईची सुन दोघांना आधार देतं पळत होती. हमरस्त्याला लागणाऱ्या फाट्यावर पोहचुन म्हतारी गाडीची वाट बघु लागली.
रस्त्यावरच्या मंद ऊजेडाने म्हतारीला आतुन ढुसन्या दिल्या आणि ती आडवी ऊभी राहीली. काऽऽकुऽऽ करत ते अवजड वाहन ऊभ राहीलं. परिस्थीतीचं गांभीर्य लक्षात घेऊन ट्रकवाल्यानी ट्रक वळवला, सगळ्यांनी मिळुन म्हाताऱ्याला ट्रकमधी टाकला... सरकारी दवाखान्याच्या आवारात ट्रक ऊभा राहीला, म्हाताऱ्याला झोळीत घेऊन सगळीजन पळत सुटली.
डाक्टरनं म्हाताऱ्याला तपासला, नाका तोंडातुन नळ्या टाकल्या. नर्सनं अंगावर खेकसुन पार्वतीबाईला बाहेर बाकड्यावर बसायला सांगीतलं.
थोड्यावेळानं डाक्टर बाहेर आला आणि म्हणाला 'बर केलं आई गडबड केली, नाहीतर वाचवता नसंत आलं, आता सगळं ठिक होईलं. सकाळपर्यंत आराम पडेल.'
आतापर्यंत आणलेल ऊसनं अवसान गळुन पडलं आन् म्हातारीच्या डोळ्याला धार लागली....