एक सत्य असते...ते स्वीकारावे लागते...पचवावे लागते...आणि त्यातून जगण्याचा मार्ग शोधावा लागतो.
मै जिंदगीका-भाग्यश्री भोसेकर बिडकर
"ते काचेचं सामान जरा जपून हं ..." मी सामान उतरवणाऱ्या लोकांना सूचना करत होते.एकदा मी ट्रकमधल्या सामानावर नजर फिरवली.शिफ्टींगचं काम बऱ्यापैकी आटोक्यात आलं होतंं. मग पुढचे दोन दिवस सामान लावण्यात गेले.
दुसऱ्या दिवशी मॉर्निंग वॉकला जाताना पाहिलं शेजारच्या बंगल्यात काय सुंदर बाग फुलवली होती. गेटमधून बाहेर डोकावणाऱ्या जाई जुई, दारात फुलांचा सडा टाकणारा पारिजातक, त्याच्याच पुढे हातभर लांबीवर फुललेला बत्तीसमोगरा, गेटच्या दुसऱ्या बाजूला डवरलेली रातराणी...नंतर सोनचाफा, रंगांची उधळण करणारा गुलाब किती नी काय काय. क्षणभर मन हरवूनच गेलं. पूर्ण बाग नुकतीच रंगपंचमीत न्हाहून निघाल्यासारखी दिसत होती आणि सारा आसमंत गंधाळून गेला होता. मला मोह आवरला नाही. देवपूजेसाठी थोडी फुलं घेऊन जाता येतील आणि त्या निमित्ताने शेजाऱ्यांशी ओळख होईल म्हणून मी त्या बंगल्याच्या फाटकच दार उघडलं. फाटकाचा आवाज ऐकून 60-65 वयाच्या एक बाई बाहेर आल्या. त्यांना मी शेजारी नवीन राहायला आल्याचं सांगितलं,बागेची तारीफ केली.
"जरा फुलं मिळतील का?" असंही विचारलं तर त्या बाईंना अगदी उत्साहाच चढला ते ऐकून म्हणाल्या "फुलं तर घेच गं आणि चहा नाश्ता पण करून जा" आणि मग त्यांनी मला आग्रहाने आत ओढून नेलच.मी आत गेले तर पाहिलं एका खोलीची भिंत दिसत होती.त्या भिंतीवर खूप सारे फोटोज कोलाज करून लावले होते. नीटसं दिसलं नाही पण असं पूर्ण भिंतभरून फोटोंच्या कोलाजची आयडिया मला खूपच आवडली.आतल्या कुठल्या तरी खोलीमधून हार्मोनियम वाजवण्याचा आवाज आला .कोणीतरी गातही होतं 'मै जिंदगी का साथ निभाता चला गया...'. तर ते त्या बाईंचे यजमान होते. त्या बाईंनी त्यांना हाक मारली मग ते हाती घेतलेलं कडवं पूर्ण करून, घसा खाकरत बाहेर आले.
"अहो पाहिलंत का? ही नव्याने राहायला आलीय बरं का आपल्या शेजारी...आपली बाग खूपच आवडली तिला" तर त्या बाईंनी आपल्या मंजुळ स्वरात माझी ओळख् त्यांच्या यजमानांशी करून दिली. ते गृहस्थ कसनुस हसले. त्यांना माझं येणं फारसं रूचल नसावं बहुधा त्यांच्या रियाझा मध्ये माझ्यामुळे व्यत्यय आला असावा असं मला वाटलं. मग पुढे चहा पोहे, घरात कोण कोण असतं, तुझे यजमान काय करतात वगैरे वगैरे अघळपघळ गप्पा झाल्या. त्या बाईंचे यजमान सारखे घड्याळाच्या काट्यांकडे पहात होते. आमच्या गप्पा काही थांबेनात असं दिसल्यावर ते म्हणाले
"चला मी आवरतो,बँकेत जायचंय चेक भरायला."
"अगदी आजच करायला हवं असं आहे का? काल तर म्हणत होतात कि पुढच्या 2 महिन्यात कधीही भरला तरी चालेल चेक म्हणून..." बाईंना आमच्या गप्पांची मैफल काही सोडायची नवहती. मग मलाच थोडंस ओशाळल्यासारखं वाटलं.बहुधा मी खूपच वेळ घेतला त्यांचा सकाळचा. मीही कारणं देऊन बाहेर पडले.
पुढे मग विरजण देण्याघेण्याच्या निमित्ताने, पाऊस पडला की कांदाभजी आणि चहा पार्टीच्या निमित्ताने, भाजी आणण्याच्या निमित्ताने, त्यांच्या गोळ्या औषधं संपल्या की ते आणून देण्याच्या निमित्ताने, त्यांच्याकडून 'घरगुती काढा', 'बागेतील झाडांसाठी कोणतं खत वापरावं' वगैरेवगैरे टिप्स घेण्याच्या निमित्ताने आमची ओळख आणि एकमेकांच्या घरातली उठबैस बरीच वाढली. त्यांना 'त्या बाई' ते 'काकू' अशी हाक मारेपर्यंतचा प्रवास आमच्या मैत्रीने केला. आता आमच्या गप्पांच्या मैफिलीचे वेगवेगळे टप्पे असायचे म्हणजे कधी दाराशी, कधी फोटोंच्या भिंतीपाशी(आठवणींच्या रम्य गावात रमत), कधी बागेत, कधी मोगऱ्यापाशी, कधी फाटकाजवळ. आता या गप्पांच्या टप्प्यांशिवाय दिवस पुढे सरकायचा नाही.
तोही दिवस नेहमीसारखाच सामान्य दिवस होता. पण त्या दिवशीचा सूर्य काहीतरी असामान्य घडावं याच उद्देशाने उगवला होता.
माझी दिवसभराची काम आवरली. सूर्य कलायला आला होता, हवेत गारवा होता. अशा वातावरणात एक लांब चक्कर व्हायला हवी अस मला वाटलं. तर फिरायला येणार का अस विचारायला काकूंच्या फाटकापाशी गेले तर काकू बागेतच होत्या. मी फाटकाच दार उघडलं तसं काकू वळल्या, त्यांच्या नजरेत अनोळखी भाव होते. त्यांनी मला विचारलं
"कोण आपण? कोण हवंय आपल्याला?"
...आणि मला काय बोलावं काही समजेना....
घडल्या प्रकारामुळे पुढे आठवडाभर मी काकूंना भेटलेच नाही. मग त्याच घरी आल्या "काय गं मागच्या आठवड्यात अगदीच आलीच नाहीस?" पुन्हा तीच प्रेमळ चौकशी, पुन्हा प्रदीर्घ गप्पा, गप्पांचे टप्पे, पुन्हा आमच्या गप्पांमध्ये पारिजातक फुलला.... आणि या सगळ्यात त्या दिवशी घडलेल्या घटनेचा लवलेशही नाही!!!!! यानंतर साधारण 2-3 महिने गेले असतील.
काकूंना फार आवडतात म्हणून कोथींबीर वड्या द्यायचं निम्मित झालं. पाहिलं तर आज फाटक उघडच होतं आणि घराचं दारही. काका घरात नसावेत. मी काकूंना हाक मारली त्या आतल्या खोलीतून बाहेर आल्या....आणि....आणि...पुन्हा तेच अनोळखी भाव, पुन्हा तोच प्रश्न
"कोण आपण? कोण हवंय आपल्याला?"
यावेळी मात्र माझ्या पायाखालची जमीनच सरकली. साऱ्या शरीरभर मुंग्या वळवळून गेल्या. पुन्हा काही सुचेनास झालं. मग मात्र मी ठरवलं. काकांच्या कानावर घालायचं हे. दुसऱ्या दिवशी काकूंच्या फाटकाचा आवाज आला. काका बाहेर जात असल्याच मी पाहिलं. बहुधा बँकेत जात असावेत कारण नेहमी बँकेत जाताना जी सुटकेस बरोबर घेतात तीच सुटकेस त्यांनी यावेळी सोबत घेतली होती. मी हातातली काम टाकून आधी स्वतःचा अवतार ठीक केला आणि काकांच्या मागे मागे चालत सुटले. सोसायटीच्या बाहेर पडल्यावर मी काकांना हाक मारली. मग मी त्यांना थोडं बाजूला घेऊन घडला प्रकार सांगितला. त्यांनी शांतपणे हे सारं ऐकून घेतलं.मी सगळं सांगितल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर कुठेही आश्चर्याचे भाव नवहते ते पाहून मला खूप खूप आश्चर्य वाटलं. ते शांत स्वरात म्हंटले
"इथे थोड्या अंतरावर बाग आहे. तिथे बसून बोलायचं का? म्हणजे सविस्तर बोलता येईल"
मी काय बोलणार!!! मी काहीतरी महत्वाचं सांगतेय आणि ह्या माणसाला बागेत बसून काय असं सविस्तर बोलायचंय असं वाटून गेलं मला. आम्ही बागेत गेल्यावर काकांनी तितक्याच स्थितप्रज्ञ स्वरात बोलायला सुरुवात केली. त्यानंतर काकांनी जे जे सांगितलं ते ऐकून कानात कोणीतरी गरम तेल ओततय असं वाटलं.
काकू एका अशा आजाराच्या शिकार झाल्या होत्या ज्यामध्ये कोणत्याही वेळी माणसाच्या मेंदूतल्या आठवणींचा भाग पुसला जातो, स्मृतिपटलाची पाटी कोरी होते. अचानक माणूस सगळं विसरतो. बरं हे असं कोणत्याही वेळी होऊ शकतं आणि असा आजार झालेला माणूस पूर्णवेळ त्याच अवस्थेत राहतो असंही नाही. या आजाराला औषधोपचार करता येऊ शकतात पण पूर्ण बरं करणारं कोणतही निदान उपलब्ध नाहीये.तर त्यानुसार काकूंवर उपचार सुरु होते. काका म्हंटले
"मी कधी कधी हिच्या जवळ येऊ पाहणाऱ्या माणसांशी माणूसघाणा वागतो कारण हिच्या कोणी जवळचं झाल आणि उद्या त्या व्यक्तीला हिच्या आजाराविषयी कळलं आणि ती व्यक्ती हिच्यापासून दूर गेली तर काय अशी भीती मला वाटते म्हणून. शिवाय उद्या हिच्या आजारामुळे कोणी हिची हेटाळणी किंवा थट्टा केलेली देखील मी सहन करू शकणार नाही. माझं खूप खूप प्रेम आहे तिच्यावर. तिचा हा आजार चोरपावलांनी कधी आमच्या आयुष्यात आला ते समजलंच नाही. पण साधारण 5 एक वर्षांपूर्वी पहिल्यांदा तिने मला ओळखायला नकार दिला तेव्हा मलादेखील धक्काच बसला होता. आम्ही गाण्याच्या मैफिलित होतो आणि कोणतं गाणं गायलं जात होत माहितीय का? 'मैं जिंदगी का साथ निभाता चला गया' हा मला एक प्रकारचा संकेतच वाटला.
मग मी पण हिच्यासोबत कधी ओळखीच्या जगात कधी अनोळखी जगात जगायला सुरुवात केली. तिला आवडत म्हणून गाणं शिकलो मग तिच्या जगातले आमचे सुरताल जमू लागले. मुद्दाम सगळ्या आठवणी फोटोंमध्ये बंदिस्त करू लागलो म्हणजे निदान ते दाखवून तिच्यासोबत आठवणींच्या रम्य गावात फेरफटका मारता यावा याकरता. तिच्यासाठी तिच्या आवडीच्या फुलांची बाग फुलवली. याच कारणासाठी मी तिला शक्यतो एकटं सोडत नाही. तुला बऱ्याचदा प्रश्न पडला असेल की भाजी बाजारात देखील मी हिच्यासोबत का येतो? तिचा आजार कधी बरा होईल माहित नाही पण जेवढं आयुष्य आहे तेवढं मला भरभरून जगायचंय तिच्या साथीने" काकांचा एकेक शब्द काळीज चिरत गेला. पुन्हा एकदा मी निःशब्द झाले. आम्ही मुकपणाने घराच्या दिशेने चालू लागलो. फाटकात काकू उभ्या होत्या मला म्हंटल्या
"काय गं परवा म्हणाली होतीस ना कोथिंबीर वडी करून पाठवते? फस्त केल्यास की काय एकटीनेच!!!" . ..पुन्हा एकदा कालच्या प्रकाराचा मागमुसदेखील नवहतं
मी हसून उत्तरादाखल म्हंटल
"आजच करते काकू कोथिंम्बीरीच्या वड्या"
मी असं म्हंटल्यावर काकांच्या नजरेत थँक्सचे भाव तरळले आणि काका,ती पूर्ण बाग,त्या फोटोंची भिंत, काकूंच्या खोलीतला हार्मोनियम सगळे मिळून गाणं गातायत असं वाटलं
' मै जिंदगी का साथ निभाता चला गया...'