वामन तावडे हा माझा आवडता लेखक...अर्थात मराठी रंगभूमी त्याने जशी समृद्ध केली तशी फार कमी लेखकांनी केली...त्याची कथा आहे पोस्ट करताना मला खूप आनंद होत आहे.
OLX – वामन तावडे
अडगळीच्या खोलीत हमाल शिरल्या बरोबर ती दोघं तिथनं हळूच सटकली. हॉलमध्ये कुणीच नव्हतं. एकदा आत सभोवार पाहून पटकन घराबाहेर बाहेर पडली. आवाज होऊ न देता म्हाताऱ्यानं दार लोटलं. दोघं मग दबकत दबकत लिफ्टनं खाली आली. संडे असल्यामुळे सोसायटीला अजून जाग नव्हती. कम्पौंड बाहेर दारातच टेम्पो उभा होता. कुणी पहात नाही ना ह्याची खात्री करून टेम्पोत पाठनं आधी म्हातारा चढला. मग त्यानं म्हातारीला कशी बशी आत ओढली. कोपऱ्यातल्या लाकडी कपाटाआड मग दोघही जाऊन बसली. चिडीचीप. डोळे मिटून.
टेम्पो भरत होता नको असलेल्या सामानानं. अर्ध्याएक तासानं टेम्पोची घर घर सुरू झाली नि दोघांच्याही जीवात जीव आला. मग गळ्यांत गहिवर दाटून. म्हातारीला तर अचानक रडूच कोसळलं. तिचा चेहरा ओंजळीत धरून म्हातारा म्हणाला..फसवलं की नाय लेकाला..फुकटात गेलो. त्यावर म्हातारी थरथरत म्हणाली.. चूक..तसं नाहीरे.. उलट सुनबाई खूशच होईल आपण फुकटात गेलो म्हणून.
टेम्पो आता लिंक रोडला लागला होता.
टेम्पोच्या पत्रा कव्हरवर मोठ्ठाली रंगी बेरंगी अक्षरं नाचत होती.. O L X ..