राजेश लोंढे ह्यांची ही लघुतम गोष्ट मी वाचली आणि दीर्घ काळ शांत बसून राहिलो...असे खंगलेले आणि गांजलेले बाप परिचयाचे आहेत...
खंगलेल्या बापाची गंजलेली कहाणी-राजेश लोंढे
आज शाळेत सोडायला बाबा येणार म्हणून मी खूश झाले. तयारी करायला देखिल बाबांनीच मदत केली. माझे शूज घालताना बाबा खाली बसले. खिडकीतून कोवळ्या उन्हाचा प्रकाश बाबांच्या डोक्यावर पडला, मी आरसा समजून माझा चेहरा व केस ठिकठाक केले. स्कूल कडे जात असताना माझे क्लासमेट केसांवरून हात फिरवू लागले. तसा बाबांनीही फिरवला तेव्हा त्यांच्या हाताला लागलेला घाम पाहून मी मनोमन खंतावले. यापुढे आरसा पाहयला आपण कपाटासमोर उभे राहयचं, असा मी निश्चयच केला.
संध्याकाळी बाबा टि.व्ही. पहात माझा अभ्यास घेत होते. सगळ्या बातम्या मला बाबांच्या डोक्यावर दिसत होत्या. मी अभ्यास बंद करून ओरिजनल टि.व्ही. पाहू लागले. रात्री अचानक जाग आली असता बाबांच्या डोक्यावर फिश फिरताना दिसले. मी लगेच फिश टॅन्कची लाईट बंद करून झोपी गेली.