आठवणीतील गोष्टी - पुष्प २२वे
उसाचा रस - शशी डंभारे
तो आणि ती उन्हातान्हात, कॉलेज कडून घराकडच्या प्रवासात. एकमेकांसाठी एकमेकांसोबत. सावलीचं झाड टाळत, एकमेकांना सोबतीची सावली पुरवत. शब्दांची खरे तर गरज नसते, पण मग निरवतेचा मार्ग एकांताकड़े नको जायला म्हणून त्याचा एखादा प्रश्न
'उन खुप ना आज?’
साध्याशा या प्रश्नाला नाद किती असावा? की काळजाच्या आत त्याच्यासाठी साचलेलं तळं हिंदळावं आणि ते गोड पाणी तिच्या पापणीशी डचमळावं.
' हं' तिच्या नादमय हुंकाराने तो धुंदावलेला.
कॉलेज ते घर खुप मोठा नसतो प्रवास. पण कॉलेजचा परिसर संपला, वर्दळीचे २ चौक मागे पडले की रेल्वे कॉलोनी कड़े जाणारा रस्ता मोठ्याशा गल्लीसारख्या निर्जन अमराईतुन जातो. जराजरा अंतरावर चार दोन आंब्याची झाडं, ती रुंद गल्ली संपली की टोकावरच उसाच्या रसाची हातगाड़ी असते. तिच्या गु-हाळ्याला घुंगरांचा साज आहे. हा छोटा, कमीच वर्दळीचा चौक संपला की रेल्वे रुळांतूनच चालत जायचं १० मिनिट पलीकडे. मग रेल्वे कॉलनी सुरु होते. हा कॉलनीत मागच्या बाजूने जाण्याचा रस्ता. पुढच्या बाजूने मोठे गेट, साहेबांचे बंगले वगैरे. बंगल्यांची लाईन संपल्यावर वर्ग-३ , वर्ग-४ ची घरे.
उसाच्या गाडीजवळ तो थांबतो. ती नको म्हणते. मनगटावरच्या घड्याळात पाहते. तर गाड़ीवाला भैया ' रुको तो ताई, अब्भी एक मिनट में देता हुँ' म्हणतो. पॉकेट मनी ही संज्ञा अस्तित्वात यायचीय. ताई सासरी जाताना हातात कोम्बुन गेलेली १० ची नोट सुटी करण्याची हीच वेळ मानून तो घुंगरांना स्वत: चालना देतो. बर्फाचा तुकड़ा त्याच्या-तिच्या गळ्यातून आत आत, खोल सरकत जातो तेंव्हा तिच्या इतकाच तोही आरक्त.
त्याच्या कुटुंबाने घर बदलले तेंव्हा ती त्या बर्फासारख्याच शांत नजरेने पाहत होती त्याला. सामान बांधलेली काथ्याची दोरी पुनः पुनः करकचून घेताना, त्याच्या कपाळावरून धावत सुटलेली घामाची रेष सरळ मातीत मिसळताना. बाबांच्या बदलीपेक्षा तो तिच्या बदललेल्या डोळ्यांनी त्रस्त आहे हे समजतेय तिला, मात्र डोळ्यात बर्फ संभाळणं गरजेचे त्यावेळी. त्याच्या बाबांच्या बदलीसाठी तिच्या बाबांनी खुप प्रयत्न केलेत, आई ने संस्कारांचा वास्ता दिलाय आणि मुख्य म्हणजे त्याचेच काय तिचेही घर बदलण्याचे बाबांचे प्रयत्न यशस्वी ठरलेत.
तिला दुसऱ्या घराने पसंत केलेय. हे सगळं त्याला कसे सांगणार? त्याचा बर्फ झालेला कसे पाहणार?
तर, या रेल्वे कॉलनीतल्या अनेक मूली सासरी गेल्या की उसाचा रस आवडत नाही म्हणतात ......!