हे स्वागत इतके बोलके आहे...आणि त्यातील आंदोलने इतकी मोहक आहेत..ही एक स्त्रीच समजू शकते?
विक्रम
स्वगत – अस्मिता भावे
भाग -१
मी तुझ्या फोनची वाट पाहतेय..टेबलवरचं पेन, रंगांचे ब्रश, पेपर क्राफ्टचे कागद तसे माझी वाट पाहतायत.. पण मी फोन मध्येच गुंतलेली..किती गंमत आहे बघ.. आत्ता तुझ्याशी बोलावं असं खूप वाटतंय, तर पापणी लवायच्या आत तुझ्याशी कधी कधीच बोलू नये असं वाटतंय.. म्हणजे अगदी कट्टी करावी आणि ओठ घट्ट मिटून घेऊन अबोलाच धरावा. कधी मनातलं बोलून सांगावस वाटतं, तर केव्हा केव्हा वाटतं की सगळंच लपवून ठेवावं तुझ्यापासून आणि ठेवाव्यात साऱ्याच गोष्टी दडवून मनाच्या पार तळात. सांगावं तुला, बघ काही सापडतय का? वेड्या मुलीच्या मनात डोकायवाचं की नाही हे तेव्हढं तू ठरवं. पण तुला मी तशीही बोलून किंवा न बोलून मी समजलेलीच आहे म्हणा कायम. शब्द नाही सांगितले तर डोळ्यांमधून नाही तर चेहऱ्यावरूनही तुला समजतं म्हणे.. पण मी डोळे बंद करून घेईन.. तेव्हा मग? मग काय..?
...
रिंग वाजली तेव्हा ‘तुझाच फोन.. तुझाच फोन’ म्हणून धावले तर फोन आयडियाच्या जाहिरातींचा. तुझा नाहीच. अर्थात काल तसे बोललो म्हणा आपण दोघे. पण हल्ली फोन म्हणजे टीकमार्क झालाय.. स्कॉलरशिपच्या परीक्षेतल्या उत्तरांसारखी टीक करायची..नी पुढं जायचं.. छे मला कंटाळा येतो त्याचा. मग वाटतं की एखाद दिवशी सांगीन बहुदा तुला..
‘नको करू फोन. जेव्हा मनापासून बोलायचं असेल तेव्हाच बोल.. ’ इतक्यात पावसाची अवचित सर आली आणि पाठोपाठ तुझा मेसेज. तेव्हाच वारा आणि पावसाचा जोरदार झपाटा आणि आपल्या मेसेज-मेसेजचाही झपाट्याचा खेळ!
‘काय करतेस?’
‘हूं.. इथं ढीगभर कागद पसरून बसलीय.’
‘का?’
‘वेड लागलंय.’
‘नवं नाही.’
‘हो का ?’
‘वाकडं बोलण्याचा मक्ता दिलाय तुला’
‘जन्मजात वारसाहक्काने..’
रिप्लाय-मेसेज-रिप्लाय चक्र सुरूचच.
बास.. बास..बास..
मोबाइल स्विच ऑफ