किती सुंदर लिहीले आहे..मुखवटे चढवूनच जगावे लागावे...धुमसणारी मने...ओंजळीत घेऊन जगावे लागावे....
विक्रम
गर्दीचा मुखवटा - विनया पिंपळे
धावपळ करत कशीबशी साडेदहाची बस गाठून मिळेल त्या जागेवर रेलून बसताना 'आता पुढचा दीड तास निवांत जाणार असा एक आश्वस्त विचार तिच्या मनात डोकावतो. जवळ आलेल्या कंडक्टरला 'पास' नावाच्या कागदाचं एकदा दर्शन करवून दिलं की बसमधला नंतरचा पूर्ण वेळ फक्त तिचा आणि तिचाच असतो. ह्या गर्दीतल्या गोंगाटातही आपण आपली शांतता शोधू शकतो हा शोध तिला कधीचाच लागलाय. ती निवांत बसते. खिडकीजवळची जागा मिळाली तर अधिकच खुश होत; सीटवर रेलून बसत, डोळे मिटून, भरार वारा अंगभर झेलत स्वतःचा एकांत अधिक गडद करून घेते…
...ती खरंच खूप नशीबवान आहे. धुमसणारी मने ओंजळीत घेऊन घरात वावरणारं मौन तिच्यावर फारसं आघात करत नाही. कारण तिला तंद्रीत जगता येतं. तिच्या एकांतात ती स्वतःशी बोलू शकते..पण फक्त दीड तास! ! ...नंतर येणार्या थांब्यावर स्वतःशी चालणारे सगळे संवाद थांबतात...आजूबाजूच्या गडबड, गोंधळात तिचाही स्वर मिसळू लागतो...पण फक्त वरवर!! ... संध्याकाळी परतीच्या वाटेवरील पुन्हा एकदा दीड तासाच्या अवकाशाची वाट बघत ती सद्ध्याच्या गर्दीचा एक मुखवटा चेहर्यावर डकवते ....