आज योगिनी प्रभुदेसाई ह्यांची नवी भूतबंगला कथा सुरु करीत अहोत...मी वाचली..आणि मस्त काटा आला अंगावर..चार भागात ही कथा तुमच्यापर्यंत येणार आहे.
विक्रम
शिळा – योगिनी प्रभुदेसाई
विजांचा कडकडाट,घोंगावणारा वारा आणि त्या सोबत कोसळणारा पाऊस....अचानक मिट्ट काळोख पसरला डोळ्यापुढे ...ठेच लागून धाडदिशी कोसळले..उठून रक्ताळलेल्या अंगठ्याला हातात होता त्याच ओल्या किच्च रुमालाची चिंधी बांधत कशीबशी घरी आले.
लाईट गेलेले....आजी हातात कंदील घेऊन दरवाजातच उभी होती.
“अग सांगितलेलं ना सानू तुला ...नको जाऊस एवढ्या अंधारात कुठंतरी, लाईट पण गेले बघ कसे"
सूर रागावणारा असला तरी सुरकुतलेल्या आणि पिचपिच्या पिंगट डोळ्यात मात्र काळजी ओतप्रोत भरलेली दिसत होती. थरथरत्या हातातला कंदील भिंती वरच्या कोनाड्यात ठेऊन तिनं माझं डोकं सडसडून पुसलं.
" तुम्हा शहरी माणसांना नाही पटायचं, पण पोरी गावात तिन्ही सांजेनंतर काही ठिकाणांपाशी अजिबात फिरकायचाही नाही..."
तेवढ्यात झुणका, झणझणीत मिरचीचा ठेचा आणि गरमागरम भाकऱ्या घेऊन मामी आली...ताट मांडलेलीच होती ...हातपाय धुवायला गेले आणि सणकन कळ गेली डोक्यात...पाणी लागल्यावर मगाशी लागलेली ठेच चांगलीच जाणवली ...
" अगो बाई !!! हे कधी लागलं?? कित्ती रक्त आलाय गं अंगठ्यातून,सांगायचास तरी सानू ...कुठं गेलेलीस तू धडपडायला ??"
“आजी काही नाही लागलंय एवढं..मगाशी परसावात गेलेले चक्कर मारायला तेव्हाच नेमके लाईट गेले, एकदम अंधार झाला म्हणून अडखळले आणि ठेच लागली”
" परसावात गेलेलीस तू??? सुमे नारळ आण आधी आणि ओवाळून टाक हिच्यावरून"
मामी ने लगेच एक नारळ ओवाळून नाम्याला बोलावलं आणि तो नारळ त्याच्या सुपूर्त केला. नाम्या आमचा घरगडी, अतिशय विश्वासू आणि प्रेमळ....त्यांनीही बजावलं
"सानिका ताई परत जाऊ नका तिथं....जागा लै वाईट बघा ती"
एवढं म्हणत घराबाहेर पडला नाम्या...
देवघरा समोरच्या एका पुडीतून अंगारा काढीत आजीने माझ्या कपाळाला लावला. आजीनं हातापायावर परत पाणी घ्यायला लावलं पानावर जेवायला बसलो....नाम्या ही आला तसं मामी ने त्याला ताट वाढून दिलं अंगणात...जेवण उरकून शतपावली करायला अंगणात आले.
मनात विचार घोळतच होता ..तो विषय परत आजीजवळ काढला.
“आजी अग..मगाशी बोलता बोलता विचारायचं राहून गेलं ...तुम्ही सगळे परसावात जाऊ नको असं का म्हणत होता? ती जागा वाईट आहे असं नाम्या ही म्हणाला”
“हो खरं आहे ...आपल्या परसावात एक शिळा आहे...म्हणजे ती आधी तिथं न्हवती. पण....”
“पण काय आजी??”
“कोणीतरी नंतर आणून ठेवलेय तिला तिथे”
“ठीके ना मग...दगड तो दगड...त्यात काय ती नुसती शिळा नाही पोरी...अतृप्त आत्मा आहे त्यात”
हसू आवरलच नाही मला. हसतच म्हटलं,
“आत्मा आणि त्या दगडात?? मला नाही हे असलं पटत. खोटं असतं हे सगळं....एक कोणीतरी कथा रचतो, मग दुसऱ्याला सांगताना मीठ मसाला लावून सांगतो....मग काय राईचा पर्वत व्हायला वेळ नाही लागत”
माझं म्हणणं ऐकून मामी एकदम ओरडली ...
" कोणी कथा बिथा नाही रचलेय...या या उघड्या डोळ्यांनी पाहिलंय सारं...त्या...त्या....रात्री ......"
मामी एकदम झोपाळ्यावर थबकली, तिचा अचानक पांढरा फटक पडलेला चेहरा पाहुन माझं हसू कधीच विरून गेलं...सारं स्तब्ध झालं, त्या सन्नाट्यात खूप रितेपण भरलेला जाणवला...आजीचा सूर पण खालावला..डोळ्याच्या कडा पाणावल्या.
"तुझा मामा गेला गं सोडून, कसा गेला माहीत आहे का तुला?"
“हो...आई ने सांगितलं मला, ओढ्याजवळ कपडे धूत असताना अचानक सिव्हिअर हार्ट अटॅक आला आणि गेला...डॉक्टर आले तेव्हा त्यांनीच सांगितलं तसं”
माझं एवढं वाक्य पुर्ण होतंय न होतंय तोच दाबून ठेवलेली सगळी घुसमट ...असह्य वेदना मामीच्या हुंदक्यांनी तोडली. मी गेले सावरायला पण आजीनं खुणावलं...रडू दे तिला. होऊ दे एकदाचं मोकळं अंत्या गेल्यापासून गप्प गप्प असते खूप...बांध आता तुटलाच आहे तर ओसंडूदेत तिचे अश्रू.”
इतका वेळ घामानं डबडबलेला मामीचा चेहरा आता अश्रुंनी धुऊन निघाला. मामीला आजी खोलीत घेऊन गेली. मी एकटीच होते अंगणात...त्या हलणाऱ्या झोपाळ्या कडे नजर होती पण मन मात्र हरवलेलं कुठेतरी. कानांमध्ये वाऱ्याची शीळ, भिंतीवर खेळणाऱ्या पारंब्यांच्या सावल्या, पन्हाळी मधून खालच्या दोणी मध्ये टपटपणारे थेंब, रातकिड्यांची किर्रकिर्र...सगळंच भयाण !!!
एकदम बॅटरी चा फोकस डोळ्यावर आला...शेजारचे बर्वे काका आपल्या मुला बरोबर गप्पा मारत. हातातल्या काठीचा आवाज करत जात होते तेव्हा त्यांच्या पायरवाने भानावर आले. आजी पण बाहेर आली. झोपाळ्यावर बसली.
“लागलेय आता शांत झोप तिला.
"अंत्याचा जीव हार्ट अट्याकने नाही गेलाय, त्या रात्री काही वेगळंच घडलेलं सानू"
“म्हणजे? नीट सांग मला सगळं ...”
“त्या रात्री मी, सुमा आणि अंत्या जेवणं आटपून असंच अंगणात येउन बसलो..रेडिओ वर तुझा मामा नेहमीच गाणी ऐकायचा..अगदी न चुकता...पण त्या रात्री मात्र नुसता येरझाऱ्या घालत होता अस्वस्थपणाने...मी विचारलंही त्याला काय झालय? पण उ नाहीं की चू नाही. कसली काळजी खात होती देवच जाणे. कधी पान न चुकवणारा, पान न खाताच लवकर झोपायला गेला. आम्ही दोघीही सगळं आवरून झोपलो...कधी डोळा लागला कळलंच नाही....अचानक मध्यरात्री माडीवर खुडबूड झाली ...जाग आली पण दुर्लक्ष करीत कूस बदलून परत झोपले...सुमा हाक मारत धावत आली आई , चला लवकर ...हे परसावात गेलेत आम्ही लगेच धांवत गेलो तर अंत्या फावडे आणि कुदळ घेऊन त्या शिळेच्या आजूबाजूला खोदत होता. मी त्याला अडवायला पुढे सरसावले...तेवढ्यात त्याने एक हात वर करून येऊ नकोस असं खुणावलं. अंत्या खोदण्याची घाई करत होता ...अचानक जोरात ओरडला..ही शिळा हलवायलाच हवी इथून, नाहीतर अख्य्या घराला गिळेल ही एक दिवस. मला हे आजच करायला हवं..आणि अचानक ...अचानक ...कर्कश्य किंकाळ्या आणि घुबडांचे घुत्कार कान बंद करायला भाग पाडत होते. एकदम दाट धुकं पसरल्यागत झालं आणि अचानक गायब झालं..सुमा किंचाळली...समोर बघतोय तो एक लाल साडीतली बाई अंत्याच्या मागे उभी होती, पिंजारलेले लांबसडक केस...भयावह वटारलेले डोळे...ओरडून सांगण्याचा प्रयत्न केला त्याला की बाबा नीघ तिथून...पण एका अमानवी शक्तीने त्याच्या मानगुटीला पकडून भिरकावून दिलं ओढ्यात...एका क्षणात संपलेलं गं सगळं! माझ्या पोराला निपचित पडलेलं पाहिलं मी या या डोळ्यांनी”
माझी धीट आजी पार तुटलेली दिसली मला....आधारासाठी खांद्यावर हात ठेवला खरा पण माझ्याही ह्रदयाचे ठोक वाढलेलेच होते.
स्वतःला सावरत विचारलं
"पण ती लाल साडीतली बाई?"