मोनाली - महाराष्ट्र टाईम्सच्या लेखन कार्यशाळेत सापडली...तिने पहिल्यांदा लेखणी उचलली आहे...ती म्हणाली एरवी मी तुम्हाला वाचायला सुद्धा दिली नसती...आणि आता तिची कथा आपल्या सर्वांसमोर येत आहे...आपण तिचे कौतुक करूया...शाब्बास मोनाली...
विक्रम
ती – मोनाली आवताडे
“मला तुमाला एक सांगायचं होत.”
“काय, बोल ना.”
“तुमाला माझा राग तर नाय ना आला ?“
“का ग ? कशाबद्दल ?”
“काय आहे ना, नवरा बोर्डर कड निघाला की बायका फुसफुस करत रडायला लागतात. मी तर अस काय करत नाहीये ना. अन मला ते जमणार बी नाय. कारण मला लवकर रडायलाच येत नाय. मी जरा दगडच आहे.” अस म्हणत ती हलकेच हसली.
तिच बोलण ऐकत असताना त्याच्या चेहऱ्यावर पण हलकस हसू उमटत होत. त्याला तिचा हा मनमोकळा स्वभाव आवडला होता. पण अजून काही बोलता येईल इतका वेळ आता त्याच्याकडे उरला नव्हता. आता त्याची निघायची वेळ झाली होती. त्याचे साथीदार गाडीमध्ये बसून त्याची वाट पाहत होते. “सगळ्यांची काळजी घे. चल, निघतो मी आता.“ अस सांगून तिचा चेहरा एकदा निरखत त्याने तिचा निरोप घेतला.
गाडी रस्त्याच्या पलीकडे उभी होती. तो दोन्ही बाजूंनी गाड्या नाहीत हे पाहून रस्ता ओलांडत होता. तेवढ्यात लांबून एक दुचाकी वेगात त्याच्याजवळ येऊ लागली. तो रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला पोचतो न पोचतो तोच ती त्याला हलकेच धडकून पुढे जाऊन घसरली. त्याच्या हाताला जोरात धक्का बसल्यामुळे त्याचा तोल गेला. त्या गाडीवरची तीन तरुण पोर पण रस्त्यावर पडली.
लोक गर्दी करून आरडओरड करू लागल्यावर लोकांचा चोप बसू नये म्हणून ते पळून जायचा प्रयत्न करू लागले. त्याचे मित्र त्याच्याजवळ पोचले आणि त्यांनी त्याला उठवून उभे केले. त्याची नजर तिला शोधत होती. पण ती तिथे नव्हती. ती बहुतेक निघून गेली असावी अस त्याला वाटल. तेवढ्यात समोरून एक ओळखीचा आवाज त्या पोरांना शिव्या देत असल्याचा त्याला ऐकू आल. तो आणि त्याचे मित्र समोरच पाहायला लागले आणि त्यांनी जे पाहिलं ते बघून ते सगळेच अचंबित झाले.
ती त्या तिघातल्या दोघांना हाताचा चांगलाच प्रसाद देत होती. त्यांच्यातला तिसरा एक पळून गेला होता. दोघांचही थोबाड ती चेचून काढात होती. तो आणि त्याचे साथीदार बघतच राहिले. याआधी कधीही त्यांनी एयर फोर्स ऑफिसरची अशी बायको पहिली नव्हती. ऑफिसर्सच्या बायका नाजूक, सुंदर आणि शालीन असतात. चारचौघात हळू बोलण, हळू चालण असाच वावर त्यांनी आजवर बघितला होता. हीच मात्र अस बिनधास्तपणे त्या पोरांना धोपटण त्यांच्यापैकी कुणालाच अपेक्षित नव्हत.
थोड्या वेळानंतर सगळ काही शांत झाल. त्या पोरांनी त्याची माफी मागितली आणि हळूहळू जमलेली लोक पण आपापल्या मार्गाने निघून गेली. ती त्याच्याजवळ पोचली. त्याला कुठे लागलय ते बघू लागली.
“लय लागल का व तुमाला? चला आपण डॉक्टरकड जाऊ.“
“नाही, नाही मी ठीक आहे. फक्त जरा हिसका बसला हाताला.”
“आओ, नाय नाय कस. लागलय तुमाला. अन त्यात येवढ लांब जायचंय. तरास हुईन ना. एकदा डॉक्टरला दाखवू. थोडा आराम करा. मग जा. नाहीतर उद्याच जा.”
“अग, नाही जमणार मला. तू काळजी करू नकोस आणि मित्र आहेतच ना माझ्या सोबत. मला काहीही होणार नाही. माझी फ्लाईट आहे. मला जावच लागेल आणि अजून एयरपोर्ट गाठायचाआहे. वेळ लागेल आम्हाला पोचायला. मला आता निघायलाच हव.”
“पण काळजी घ्या. अन पोचल्यावर फोन करा मला.”
तो तिच्या तांबूस गौर चेहऱ्याकड पाहत गाडीत बसला. ड्रायव्हरने गाडी सुरु केली. हळूहळू ते एकमेकांच्या नजरेपासून दूर होऊ लागले. तो मनात तिचाच विचार करत होता. थोड्याच वेळात मित्रांबरोबर गप्पांचा प्रवास सुरु झाला.
एकजण म्हणाला, “तुझी बायको बरीच धाडसी दिसते.” त्याला प्रतिसाद देत दुसरा म्हणाला,
“हो रे, चांगली मजबूत बायको मिळाली आहे बर का तुला!” त्यावर पुढच्या सीटवर बसलेला एक मित्र म्हणाला, “आजवर पाहिलेल्या ऑफिसर्सच्या बायका म्हणजे अगदी सोज्वळ, सुंदर, नाजूक अशाच होत्या, तुझी मात्र या सर्वांच्या अगदी उलटच आहे, नाही का रे.”
तो मात्र शांतच होता. त्याला काहीही बोलू वाटत नव्हत. मित्र त्याला हिणवत होते. तिच तस वागण त्यालाही अनपेक्षित होत आणि सगळ्यांसमोर ती अस काही वागेल अस त्याला वाटल नव्हत. तिच ते बिनधास्तपणे त्या पोरांना बदडण, शिव्या देण त्याच्या डोळ्यासमोर येत होत. त्याला ना ते खटकल होत, ना ते आवडल होत. त्यात मित्र हिणवायला लागल्यावर त्याला थोड संकोचल्या सारख वाटायला लागल.
इतर मित्रांची अशी हिणवाहिणवी चाललेली असतानाच, त्यांच्यापेक्षा वयाने थोडा मोठा असलेला एक मित्र त्याला म्हणाला,
“खरच यार, तू खूप नशीबवान आहेस, की तुला अशी बायको मिळाली. आपल्या सर्कल मध्ये अशा पोरी नाहीत.”
बाकीच्या मित्रांना त्याच्या बोलण्याच थोड आश्चर्य वाटल. इतर मित्रांना हिणवण्यात तो साथ देत नव्हता. म्हणून त्यांच्यातला एकजण म्हणाला,
“हो ना, नाहीच रे अशाच पोरी. तुला मात्र पटलेलं दिसतंय.”
“हो. कारण आजपर्यंत मी फक्त एखाद्या मैत्रिणीला किंवा बायकोला जर कोणी त्रास दिला तर मित्राने किंवा नवऱ्याने चोप दिलेला पाहिलंय. पण बायकोने नवऱ्यासाठी कोणाला बदडलेल पहिल्यांदाच पाहतोय. खरच, खर प्रेम आहे मित्रा तिच तुझ्यावर. त्याशिवाय का तिने अशी हिम्मत केली. तुझी चूक नसताना तुला धक्का देऊन त्या पोरांनी पाडल. तुला त्रास झाला हे तिला सहन झाली नाही. म्हणूनच ती अशी वागली.”
त्याच हे उत्तर एकूण सर्वच गप्प झाले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरून खिल्ली उडवण्याची भावना निघून गेली होती. सगळ्यांचे चेहरे निवळले होते. सगळ्यांना जे समजायचं ते समजल होत.
त्यालाही बर वाटायला लागल होत. आता त्याच्या मनातून मळभ आणि वाटणारी अस्वस्थता पूर्णपणे निघून गेली होती.
एकीकडे तो मनातून आनंदी होता तर दुसरीकडे तिच्यासाठी प्रतिउत्तर न दिल्याच त्याला वाईट वाटत होत. आता त्याला ती नीट कळली होती. आणि तिचा निरोप घेऊन जात असतानाचा तिचा तांबूस गौर रंगाचा चेहरा त्याला आठवत होता.