डॉ. माधवी वैद्य ह्यांची ही कथा मी त्यांच्या कडूनच ऐकली आणि स्तब्ध झालो होतो. लेखक अचानक त्याच्या नकळत काय लिहून जातो..असे लिहिणे हे घडणे असते..ठरवून नाही लिहिता येत.
डोहाळतुली - माधवी वैद्य
‘ए मनू! ... ए मनू! ’ आतेची हाक आली. मनूच्या अंगावर सर्रकन काटाच आला. हल्ली असंच व्हायचं. आतेनं हाक दिली की अंगावर काटाच यायचा. मनावर दडपण यायचं... कसली तरी विचित्र भीती वाटायची. आत्या रागावेल वगैरे म्हणून नाही, तर ती काही तरी विचित्र मागणी करेल म्हणून. काय झालं आहे हे आपल्या आतेचं... कसं सहन करणार आपण हे सारं? पूर्वी कशी होती आत्या आणि आज?
मनूला आपली पूर्वीची आत्या आठवली. शांत स्वभावाची. निमूट सोसणारी. सदैव हसरी. कोणतंही काम उत्साहानं करणारी. सदैव कसल्या ना कसल्या तरी कामात आत्याचे हात गुंतलेले असत. रिकामपण कसं ते ठाऊकच नव्हतं तिला. मनूची आणि आत्याची तर फारच गट्टी होती. खूप जपायची ती मनूला. तिची खूप काळजी घ्यायची. तिच्याच तर अंगाखांद्यावर मोठी झाली होती मनू. फक्त काही धार्मिक कार्यक्रम घरात असला की मनातून आक्रसून जायची आते. कारण तिला कोणी कसल्याही कामाला हात लावू देत नसत. तिची जागा कोपर्या त ठरलेली असे. तिथून तिनं जास्त पुढे यायचं नाही. मंदिरात गेल्यावर तर गाभार्या त प्रवेश करायचाच नाही, असा दंडक गुरुजींनी घालून दिला होता. कारण आत्या बालविधवा होती. तिच्या नशिबी लाल आलवणच लिहिलेलं होतं. तिचा काहीही दोष नसताना तिला हे विधवापण आलेलं होतं. मुंडनही केलं होतं डोक्याचं. आतेनं हे सारं मिटल्या ओठानं निमूट सोसलंही होतं. या सार्या च भूतकाळाविषयी घरात फार चर्चा होत नसे. कानावर येतील तितक्याच गोष्टी मनूला माहीत होत्या. पण लग्नानंतर काहीच काळात आतेला वैधव्य आलं आणि पांढऱ्या पायाची, अपशकुनी म्हणून सासरच्या लोकांनी आतेला माहेरी आणून सोडली. तेव्हापासून आत्याचा मुक्काम मनूच्याच घरी पडला होता. तिला कोणी त्रास द्यायचा नाही म्हणून मनूच्या बाबांची सक्त ताकीद होती. सगळं घरदार तिला खूप जपायचं.
‘मनू! ए मनू!’ आतेची पुन्हा हाक आली. सुट्टीसाठी घरात भावंडांचा गोतावळा जमला होता. मनूची आई गरम गरम भजी तळत होती. त्याचा समाचार घेऊनच मग आतेकडे जावं या विचारानं मनू स्वयंपाकघराकडे वळली मात्र तिला वाटलं आधी आतेकडेच जावं. तिला विचारावं की तुला काय हवं आहे म्हणून. ती आतेकडे गेली. आत्या बिचारी मन रमवायला कसली तरी पोथी वाचत बसली होती. त्या वाचनात तिचं लक्ष नाहीये हे अगदी उघड उघड दिसतच होतं. हे हल्ली असं रोजचंच होत असे. लहान मुलाच्या वर आतेचं चाललेलं असे. एक काम धड नाही की कशात मन रमत नाही अशी तिची स्थिती होई. आता मनूचंही लग्न होऊन तिला पाचवा महिना लागला होता. आतेही वयानं झुकली होती. मनू आतेकडे गेली, आत्या तिला म्हणाली, ‘मनू शहाणी माझी ती. किती गुणाची पोर आहे माझी मनू!’ आत्याचं हे असं बोलणं सुरू झालं की मनूला वाटे झालं, आता आते आपल्याकडे काहीतरी मागणं मागणार. आत्या म्हणाली, ‘मनू! आज काय चाललंय ग घरात? अगदी खमंग वास येतोय स्वयंपाकघरातून! वहिनी काय भजी बिजी तळते आहे की काय? नाही म्हणजे मला खायची नाहीत, हे ठावूक आहे मला. पण मनू! खरं सांगू का ? मला आज खावीशी वाटतंयत ग गरम गरम भजी! मन अगदी आवरत नाही बघ.’ मनू हबकलीच. काय उत्तर द्यावं आता आतेला? असंच हल्ली काही ना काही मागत असते आपल्याकडे. द्यायचीही पंचाईत, नाही म्हणायचीही पंचाईत. मनूला सारं सारं समजत होतं. पण काही आणून दिलं गुपचुप तिला, तर ते तिला आताशा पचतच नव्हतं. परत कोणाला कळलं तर घरच्यांचा ओरडा खावा लागणार ते वेगळंच. ती विचारात पडली.
पूर्वी हीच आत्या किती समंजस होती. ‘माझ्या नशिबाचे भोग आहेत ग हे! जाऊ दे ना! तुम्ही नका विचार करू. ज्याचे भोग त्यानेच भोगावे लागतात. तुम्ही मजा करता आहात ना! त्यातच मलाही आनंद वाटतो. जा, जा, मजा करा. तुमच्या आनंदात माझा आनंद.’ असे म्हणून पहाडाएवढं दु:ख मागे टाकून आनंदी राहायची बिचारी. लहानपणची गोष्ट. एकदा मनूनं तिला विचारलंही होतं. ‘आते! तू का नाही ग खात कांदा, लसूण घातलेले पदार्थ? काय चमचमीत लागतात.’ तर म्हणाली होती, ‘तुला जर मी सांगितलं की आज चपला घातल्याशिवायच जा शाळेला तर जाशील का? नाही ना! तसंच आहे हे. अग, कांदा, लसूण खाल्लं तर पाप केल्यागत वाटतं. आता अंगवळणी पडलंय माझ्या बिगर कांदा लसणाचं खाणं.’ तिचं हे उत्तर ऐकून मनूला खूप वाईट वाटलं होतं. तरी माहेरच्या घरी आल्यामुळे, रोजच्या जगण्यातले काटेकोर नियम खूपच सुसह्य झाले होते तिला. आत्याची परत एकदा आर्जवी हाक आली. ‘मनू! मनू! काय म्हणते मी! अग फार नकोत मला भजी. फक्त दोन चारच दे ना आणून. कोपर्यालत बसून खाईन मी. कोणाला कळणारही नाही. मला तरी मेलीला काय झालंय काय की! असं काही बाही खावंसंच वाटायला लागलंय मला. डोहाळतुली सारखं. तुला नाही वाटत का ग?’ मला आतेची फार कीव आली. तिचा काहीही दोष नसताना घडलेल्या त्या एका गोष्टीमुळे सारं आयुष्य वाळवंट झालं होतं तिचं. मला तिची कीव आली. मी चटकन स्वयंपाकघरात गेले. पदराआड चार भजी लपवली आणि आतेला दिली. बराच दिवस दुष्काळ असलेल्या भागातून आलेल्या माणसासमोर जर अन्नाचं ताट ठेवलं, तर तो जसा वखवखल्यासारखा खाईल ना! तशीच आत्या त्या भज्यांवर तुटून पडली. मनूला तिथं थांबवेना. चक्क पळच काढला मनूनं तिथून.
काही दिवस गेले. आत्या हल्ली फार कोणाशी बोलेनाशी झाली होती. आपल्या आपल्यातच मग्न असे. मधून मधून आपली आपल्याशीच हसे. आपल्याशीच बडबडे. पण खुशीत असल्यासारखी वाटायची. मधेच मला बोलावे म्हणे ‘मनू! काय असतं नाही ग गर्भारपणाचं सुख ! कोणालाच सांगता येणार नाही बघ आणि काय देवाची किमया ही! इवलासा जीव आपल्या कुडीत घालतो काय, तो आपण वाढवतो काय ! आणि त्याचा शेवट त्या सुंदरशा मातृत्वाच्या भावनेत होतो काय! सारंच अजब आहे बाई! सारंच अजब!’ तिचं बोलणं ऐकून मी अवाक् झाले. मला काहीतरी वेगळाच प्रकार वाटायला लागला तो. पण ही माझ्याच मनाची काही तरी विचित्र शंका असेल म्हणून मी गप्प राहिले.
मला हे खावंसं वाटतंय, ते खावंसं वाटतंय असले आत्याचे हट्ट माझ्याकडे चालूच होते. एकदा मला म्हणाली, ‘अग! मनू! किती लहान होते मी. मलाही वाटायचं ग. माझ्याच वयाच्या इतर मैत्रिणींसारखं नटावं, मुरडावं. जर माझं मुंडन केलं नसतं तर माझेही केस कदाचित मोठ्ठे झाले असते, त्यांच्याचसारखे. मग मीही पाठीवर लांबलचक मोठ्ठाच्या मोठ्ठा शेपटा सोडला असता. त्याच्यावर टपोर मोगर्याोच्या कळ्यांचा गजरा घातला असता. त्यांच्यासारखे दागदागिने घालून मिरवावं असं तर कैकदा मनात येई माझ्या. पण अंगावरचं हे लाल आलवण बघितलं की एकदम स्वप्नातून जाग येऊन जमिनीवर आदळल्यासारखं होई मला. त्या वेळी काही काही विधवांचीही लग्न झाल्याचं कानावर येई माझ्या. मला वाटे माझा भाऊ मला विचारेल कधीतरी, ‘काय ग? तुझ्यासाठी बघू का एखादा बिजवर मुलगा?’ पण ना कोणी विचारलं, ना मी माझ्या मनातलं कोणाला सांगितलं. सारं दु:ख मनाच्या तळघरात कोंडून कोंडून जगत राहिले.’ मनुला आतेची करुण कहाणी ऐकून खूप खूप वाईटही वाटायचं. पण आता काही उपयोग नव्हता. पुलाखालून खूप पाणी वाहून गेलं होतं. समुद्राची वाळू मुठीतून निसटून गेली होती.
मनूच्या डोहाळ जेवणाचे बेत घरात जोरात चालले होते. नातेवाईकांचं येणं जाणंही सुरू झालं होतं. या गोंधळात आतेची हाक कानावर आली. ‘मनू! ए मनू! काही तरी आंबट चिंबट आणून दे ग खायला मला.’ मनू पार हादरून गेले. मध्यंतरी मनुकडे तिची सारी विचारणा करून झाली होती. ‘मनू! फार त्रास नाही ना ग होत तुला? म्हणजे सकाळी सकाळी वांत्या? मळमळ?’ मग थोडे दिवसांनी मनूला म्हणाली होती, ‘काय झालंय काय की. पण सकाळी सकाळी आंबट चिंबट वांत्याच होतात मला, अलीकडे.’ मग आणखी काही दिवसांनी मनूच्या पोटावर हात ठेऊन म्हणाली होती ‘मने! चांगला गुंडोबा होणार बरं का तुझा लेक! बघ बघ! तुला कसा लाथा हाणतोय ते! मज्जा वाटत असेल ना ही ग तुला? कसं सहन करतेस, काय की! मला नाही हो सहन व्हायचं हे!’ आतेचं हे बोलणं ऐकलं मात्र, मनूला दरदरून घाम फुटला होता तेव्हा. म्हणजे मनुला आलेली बारीकशी शंका खरी होती तर! तरीही मनू गप्पच राहिली.
डोहाळजेवणाचा दिवस उजाडला. घरात स्वयंपाक, पै पाहुण्यांची व्यवस्था, मनूच्या सासरच्या लोकांची सरबराई, अशा विविध पातळ्यांवर कामांची दंगल उडाली होती. मनू नवीन साडी घेऊन बदलायला म्हणून आतेच्या खोलीत गेली. आत्याचा चेहेरा काही नीट वाटला नाही तिला. आपल्या ओटीपोटावरून हात फिरवण्यात आत्या दंग होती. मनूला तिनं हाक मारली, ‘मनू! ए मनू! ये इकडे तुला म्हणून एक गुपित सांगते हं. कोणाला कोण्णाला म्हणून सांगायचं नाही हं. नाही ना सांगणार? हे बघ! माझ्या पोटावर हात ठेऊन तर बघ! जाणवतंय का काही तुला? तुझ्यासारखाच माझा गुंडोबाही मला कसा लाथा झाडतोय बघ! आता थोडेच दिवसात माझंही तुझ्यासारखंच डोहाळजेवण करावं लागणार भाऊला आणि वहिनीला. पावसातलं.. चांदण्यातलं.. झोपाळ्यावरचं..’ आते स्वत:शीच खुदूखुदू हसत होती. मनूला काही सुचेना...
इतके दिवस दडवून ठेवलेली गोष्ट मनूनं घरात सांगितली. सांगावीच लागली तिला. सध्या आत्याला स्वप्नांच्या दुनियेतून बाहेर काढण्यात आणि वास्तवाचं भान तिला कसं येईल यासाठी उपचार करण्यात निष्णात मनोवैज्ञानिक गढले आहेत. आयुष्यभर आतेनं जे मुकाटपणे सहन केलं ते तिला अशा अवस्थेपर्यंत घेऊन आलं आहे. मनूच्या मनात एकच प्रश्न वारंवार येत होता. आतेच्या या स्थितीला जबाबदार कोण?