वर वर पाहता छोटीशी गोष्ट असते...पण तिने संपूर्ण दिवसाचा आयाम बदलून जातो...
विक्रम
शुभास्ते सन्तु पन्थान: - दिप्ती भोपटकर
पावसाचे थेंब अंगावर आले तशी वसुधा भानावर आली. आता अजुन उशीर होणार ती स्वतःशीच चुटपुटली. आधीच रिक्षा मिळत नसल्या मुळे उशीर झालाय. तस आज उशिरा जाउन काहीही फरक पडत नाही. आज तिचा ऑफीस चा शेवटचा दिवस आहे.
आज ३८ वर्ष काम केल्या नंतर ती रिटायर होतेय बॅंकेतून. ३८ वर्षात अगदी क्वचित ती उशिरा गेली आहे आणि न सांगता तर कधीच नाही. आज अशा शेवटच्या दिवशी होणार्या उशिरान नकळत तिच्या चेहेरया वर नाराजी दाटून येते. आज का बर काहीही सुरळीत होत नाही? मनातल्या मनात ती रामनाम म्हणते. हा तिचा हुकुमि उपाय आहे. ती थोडी जरी अस्वस्थ झाली की लगेच ती नाम स्मरण करते आणि बहुधा तिला मार्ग दिसतोच.
आज मात्र जरा वेगळाच दिवस आहे. रिक्षा दिसत नाहीत फारशा आणि कुणी थांबायलाही तयार नाही. अखेर खूप वेळानि तिला एक रिक्षा दिसते. काहीस साशंकपणे ती त्याला पत्ता सांगते. रिक्षावाला तयार होतो. ती मनोमन त्याला १० रु जास्तीचे द्यायचे ठरवून टाकते. ती अशीच आहे ... तिला जस जमेल तस ती छोट्या छोट्या गोष्टी अप्रिशिएट करते.
रिक्षावाला चांगला आहे. जपून चालवतो आहे. उगाच घाई किंवा बाकी लोकांना नाव ठेवणे अस काही नाही. आणि वायफळ बडबड देखील नाही. वसुधा चा फोन वाजतो. अपेक्षे प्रमाणे मंजू चा फोन आहे.
"वसू कुठे आहेस ? "
" अग रिक्षा मिळत नव्हती."
"फोन का नाही केलास? मी घ्यायला आले असते."
" करणारच होते. पण मिळाली रिक्षा तेवढ्यात. येतेच आहे"
" लौकर आली असतिस तर आपण देवाला जाउन आलो असतो ".
"खरच ग, माझ्या ऑफीस च्या शेवट च्या दिवशी आपण जायला हव होत गणपती ला एकत्र."
"बर आता जास्त वाईट वाटून नको घेऊस . आपण संध्याकाळी जाउ यात."
ती फोन ठेवून देते. आज तिचा शेवटचा दिवस म्हणून मंजू खूप लौकर आली असणार आणि आपण अगदीच उशिरा जातोय तिला वाटून गेल. फोन च्या रिंग च्या आवाजान ती दचकली . रिक्षावाल्याचा फोन वाजतोय . फोन वर देखील तो हळू आणि व्यवस्थित बोलतो. फोन ठेवल्या वर तो तिच्या कडे बघतो.
"मावशी, एक दोन मिनिट थांबल तर चालेल ? माझी मुलगी आहे समोरच्या शाळेत. लागलय तिला चांगलच. शाळेतून फोन होता. "
"मी दुसरी रिक्षा बघू का ? "
"मावशी नाही मिळणार लगेच रिक्षा. दोन मिनिट थांबा. मी आलोच"
आपला भिडस्तपणा नेहमी नडतो तिला वाटून गेल. सोडली असती रिक्षा तरीही चालल असत . उगाच अडकलो ....
तेवढ्यात एका साधारण पहिली दुसरितल्या मुलीला घेऊन रिक्षावाला आला.
मुलीला कपाळावर चांगलच खरचटलेल दिसत होत .. किंचित रडवेली ती मुलगी त्या रिक्षावाल्या शेजारी बसायला गेली तस तिला कस तरीच वाटल.
"मागे बसतेस माझ्या शेजारी ? "
काहीशी घाबरलेली ती छोटी तिच्या शेजारी बसायला आली .
"थॅंक यू " रिक्षावाला म्हणाला.
"खूप लागल ? "
"हो .."
तीन पटकन पर्स मधून तिला श्रीखंडाच्या गोळ्या काढून दिल्या. आता ती छोटी खुशीत आली
"खर म्हणजे इतक नाही लागल .. पण आईसक्रीम पार्टी होती शाळेत ती बुडली. "
किती गोड होती ती मुलगी. तिच्याशी गप्पा मारताना बॅंक कधी आली तिला कळल ही नाही.
ती रिक्षातून उतरली तशी त्या मुलीन तिला बाय केल. रिक्षाचे पैसे देऊन ती बँकेत आली.
आज तिचा डेस्क अगदी आवरलेला होता.
त्या रिकाम्या जागे कडे बघून तिला कस तरी वाटल. कंप्यूटर ऑन करून ती वाट पहात राहिली.
मागची ३८ वर्ष तिच्या डोळ्या समोरून गेली. ह्या ३८ वर्षात तिच्या आयुष्यातल्या प्रत्येक घटने मधे बॅंक होतीच तिच्या सोबत.
तिच्या लग्नासाठी बँकेतल्या सगळ्या मैत्रिणीनि मिळून तिला कुकर दिला होता. आज देखील ती तो कुकर वापरते.
घरी जरी सगळे त्या कुकर ला हसतात तरीही. तिला आठवल घरा साठी लोन चा अर्ज देताना ती किती घाबरली होती.
प्रधान साहेब तिला हसले होते. "मॅडम, मोठ लोन घ्या पण मोठ घर घ्या. ह्या गोष्टी एकदाच होतात आपल्या आयुष्यात. "
आणि खरच तिच मोठ घर झाल होत. जेंव्हा पेढे घेऊन ती आणि तिचा नवरा प्रधान साहेबां कडे गेले होते तेंव्हा एवढे कडक प्रधान साहेब सुद्धा विरघळले होते.
'बर का सतीश, ही तुमची बायको इतकी हुशार आणि कामसू मुलगी आहे. नीट कॅल्क्युलेशन लिहिणार. मीटिंग चे मिनीट्स तर हिने च लिहावेत. " बोलता बोलता आपण तिला एकारार्थी संबोधत आहोत हे त्याना कळल देखील नाही.
सतीश देखील घरी जाताना तीच कौतुक करत राहिला. कधी कधी तर तो तिला चिडवायचा देखील की तुला बॅंकच आवडते माझ्या पेक्षा.
आज मागे बघताना तिला जाणवल की बॅंक ही अशी एकाच जागा होती की जिथे ती केवळ वसुधा होती. सतीश ची बायको किंवा सुबोध ची आई नाही. इथली लोक तिला तिच्या कामा साठी ओळखायची.
विचाराच्या नादात मंजू तिच्या डेस्क वर आलेली तिला समजल देखील नाही.
"तू कधी आलिस?"
"आत्ता तू विचार करत होतीस तेंव्हा. कस वाटतय ?"
"आज जरा दडपण आलय ग "
"ते होणार. ३८ वर्षाची सवय आहे. बर ,आत्ता कार्यक्रम आहे. चल"
इतके निरोप समारंभ पाहिले. आज आपली वेळ आली शेवटी. तिला भरून आल.
हॉल मधले पोहोचल्यावर तीन पाहील की तिच्या साठी प्रधान साहेब आवर्जून आले होते.
तो सगळा कार्यक्रम अगदी दृष्ट लावण्या सारखा झाला. आपल्या विषयी इतक चांगल ऐकून ती अगदी गलबलुन गेली होती.
तिच्या नेहेमीच्या स्वभावा प्रमाणे तीन जास्त बोलण टाळल.
ऑफीस संपल तशी सगळ्यांचा निरोप घेऊन ती बाहेर पडली. आपल्या कडे कोणी बघतय का याची जराही तमा न करता तीन बॅंकेच्या शेवटच्या पायरी ला मन:पूर्वक नमस्कार केला.
बाहेर येऊन रिक्षा शोधणार तोच "मावशी" अशी हाक आली.
सकाळचा रिक्षावाला उभा होता.
"घरी जायच मावशी?"
"अरे, तुम्ही ?"
"तुमचा आज कामाचा शेवटचा दिवस होता ना? आत्ता ह्या बाजूला आलो होतो. म्हटल बघाव तुम्ही दिसता का?"
तिला माहीत नाही का पण तिला नेहमीच अशी चांगली माणस भेटतात.त्यान तिला तीच सामान ,फुल आणि गिफ्ट उचलायला मदत केली.
"मावशी देवळात जायच?"
ती काहीशी चमकली पण हो म्हणाली. आज उत्तम दर्शन झाल. रिक्षात बसून ती घरी आली .रिक्षातून उतरल्या वर तीन त्याला २० रुपये वरती दिले . तो नकोच म्हणत होता पण तीन ऐकल नाही.
ती घरा कडे चालू लागली अन तिला आठवल की गिफ्ट फुल रिक्षात राहिली. ती काहीशी हळहळली.
परत जाउन बघाव का ? ती परत जायला वळली तोच रिक्षा आत येताना दिसली.
"मावशी गिफ्ट राहील की "
तिला एकदम हायस वाटल. त्याला "थॅंक यू" म्हणून ती निघाली.
देवळात गुरुजीनि दिलेला आशीर्वाद तिला आठवला. शुभास्ते सन्तु पन्थान: ...
ती मनोमन तयार झाली एका नवीन प्रवासा साठी ....पुनः एकदा फक्त वसुधा म्हणून .... ह्या वेळेला बॅंके चा हात सोडून...