सचिन मणेरीकरचे नुक्कड वर स्वागत...आणि एक उत्तम कथा घेऊन तो आला आहे..विचार करायला लावला त्याने...
विक्रम
स्वप्न – सचिन मणेरीकर
“कसली माल दिसते ना ही, एक रात्र भेटली तर काय मजा येईल यार” तो पम्याला बोलला.
पण पम्याला त्याच अस मुलींना बघून शेरेबाजी करण कधीच आवडत नसे.
“साल्या तुला कुठल्या मुलीबद्दल सरळ बोलताच येत नाही का? कधी कोणाबद्दल तरी चांगल बोल”
खर तर त्याला मुलींकडे फक्त वासनेच्याच नजरेने बघता यायचं. मुलींशी मैत्री करणे, त्यांच्याशी गप्पा मारणे हे त्याला पटत नसे, कोणी असा मुलीशी बोलताना दिसला की
“असला फुकटचा टाईमपास करणारी पोरगी काय कामाची, पोरीने फक्त एकच प्रश्न विचारायला हवा, लाईट लावून करायचं की लाईट काढून?”
असल काहीतरी बोलून मग तो गुटखा खाऊन लाल,पिवळे झालेले दात दाखवत ठसका लागेपर्यंत हसायचा. कॉलेजची तीन वर्ष त्याने अशीच आशाळभूत नजरेने प्रत्येक मुलीकडे बघत घालवली. वर्गातल्या एकाही मुलीशी तो कधी बोलला नाही. कोणताही मुलगा एखाद्या मुलीशी हसत खेळात बोलताना दिसला की त्याला वाटायचं त्याचं नक्की कायतरी सुरु आहे. मुलांशी हसून बोलणारी मुलगी चालूच असते हे तो अगदी शपथेवर सांगायचा. समवयीन स्त्री पुरुष यामध्ये फक्त सेक्स हे एकच नात असत हे त्याच ठाम मत होत. घरी तो आणि दोन भाऊ राहायचे. आई त्याच्या लहानपणीच वारली होती त्यामुळे तसा त्याचा स्त्रीशी कधी संबंधच आला नव्हता.
यथावकाश त्याच लग्न ठरलं. मुलगी बघायला गेल्यावर सुद्धा त्याने फक्त मुलीला बघितल इतर कोणत्याच गोष्टीत त्याला स्वारस्य नव्हतेच. मुलगी अगदी त्याला हवी तशीच होती. तो खूप खुश होता.
त्यांचं लग्न झाल. लग्नानंतरच्या पूजेपर्यंत सुद्धा त्याला धीर धरवत नव्हता. कधी एकदा पहिली रात्र येते अस त्याला झाल होत. या एका रात्रीच्या स्वप्नात त्याने आतापर्यंतच सगळ आयुष्य घालवल होत. त्यांची पहिली रात्र अगदी त्याने पाहिलेल्या स्वप्नांसारखीच गेली. तो खुश झाला होता. पण तिचे काय? तिच्यातली मैत्रीण त्याच्यात एक मित्र शोधात होती, तिच्यातली आई त्याच्यात एक लहान मुल शोधात होती. त्याला हव ते तिने दिल होत आता ती वाट बघत होती तिला हव ते त्याच्याकडून मिळण्याची. पण त्याच्यातल्या नराला फक्त एक मादी हवी होती जीत्याला मिळाली होती.
पण काही दिवसातच त्याला सुद्धा कळून चुकले की त्याने पाहिलेले स्वप्न खोटे होते. ज्या सुखाला तो जीवनाचे परमोच्च सुख समजत होता ते क्षणभंगुर होते. ती आपल्या भावी संसाराची स्वप्न बघण्यात मग्न होती आणि तो? तो खरतर मनातून खूप खचला होता. लग्न म्हणजे त्याला एका स्त्रीशी रोज संभोग करण्याचे लायसन मिळवून देणारा कार्यक्रम वाटायचा. पण जसजसा तो तिच्यासोबत दिवस घालवू लागला, त्याला जाणवू लागले की तो आतापर्यंत चुकला होता. तिला त्याला खूप काही सांगायचे असायचे पण तो कधी कोणत्याही स्त्रीशी बोललाच नव्हता. तिला हवा असलेला मित्र तिला त्याच्यात मिळेनासा झाला. तिचा आनंद हळूहळू मावळू लागला. तीच हे उदास असण त्यालासुद्धा जाणवू लागल.
तिच्या उदासीने सुद्धा त्याचा पुरुषी अहंकार दुखावला जाऊ लागला. आपल्या बायकोला जे हव ते आपण देऊ शकत नाही याची त्याला जाणीव झाली. त्याचे सगळेच अंदाज चुकत होते. लग्नानंतर बायकोला काय हवे असेल हेच त्याला माहित नव्हते. स्वतःला जे हवे तेच बायकोला सुद्धा लागेल असे त्याने ठरवले होते आणि त्याला जे हवे होते त्याने तरी तो कुठे खुश होता? चार दिवसात तो त्या सुखाला सुद्धा कंटाळला. संसारात सेक्स सोडून इतर सुद्धा गोष्टी असतात हे त्याला नव्याने समजत होते पण याला आता उशीर झाला होता. त्याने पाहिलेलं स्वप्न क्षणभंगुर होते आणि ते सोडून त्याच्याकडे दुसरे कोणतेच स्वप्न नव्हते.
शेवटी त्याचा मृतदेह घरच्यांना अडगळीच्या खोलीत गळफास लावलेला सापडला.