Quantcast
Channel: BookHungama
Viewing all articles
Browse latest Browse all 1118

खेकडा - सुचिता घोरपडे

$
0
0

कायच्या काय आहे ही सुचीताची कथा...लई ब्येस्त....

विक्रम

खेकडा - सुचिता घोरपडे

“रव्या अरं काल पक्यानं मायंदळ खेकडं आणलेती पकडून.एक हा असा तळहाता येवढा मोठा हायं. तुला सांगतो गडया काकीनं काय फक्कड रस्सा केलता म्हणून. नुस्ताच व्हरपला.”

“माझी आयं बी लई भारी करतीया खेकडयाच कालवणं. आपुनबी जायचं का रातीला.” रव्या म्हणाला. “परं रव्या येवढया रातीचं आपून दोघचं जाण्याबिगरं सगळ्यांसनीच घेवूया, खेकडयाचा रस्सा म्हटल्यावर तयार व्हतील बग सगळी.”

“नाम्या मीबी माझ्या दोस्तास्नी सांगून ठेवतो. रातीच तयार रायला.”

ठरलेल्या ठिकाणी रात्री सगळी फौज तयार होवून आली. खेकडा पकडण्यासाठीची सगळी जय्यत तयारी करून सगळे उत्साहाने जायला निघाले नाम्या म्हणाला की,

“आपण वाघजाईच्या डोंगरात जावू.तिथ लई खेकडं मिळत्याती.”

काही पोरं तयार होत नव्हती. पण तिथेच जायला लागणार होते. त्याला कारणही तसे होते. वाघजाईच्या डोंगरात एक भरपूर मोठा पाण्याचा डोह होता, ज्याला रानझुंड डोह म्हणतात. त्याच्या आजूबाजूला गर्द झाडी होती. त्या झाडीतून आणि खाचाखळग्यातून त्या डोहाचे पाणी पाझरत होते, ते पाझरलेले पाणी ओढयासारख्या प्रवाहामार्फत दगड धोंडयातून वाहत खाली येत होते आणि त्याच्या आजूबाजूला झाडांच्या भल्या मोठया पारंब्या त्याची मुळे पाण्यात शिरलेली होती. त्या झाडांच्या खाली दगडात त्या झाडाच्या मुळांची जाळी होती, नेमके त्याच्याखालीच मोठ मोठाले खेकडे मिळत होते. काहीजण तर पाण्याच्या बाजूला असणा-या दगडाच्या खालच्या कपारीत हात घालून देखील खेकडे काढायचे. अश्या या भयाण भुलभुलैया दरीत दिवसा माणूस जाण्यासाठी तयार होत नाही तिथे ही पोरं रात्री कशी तयार होतील.

“नाम्या ह्यो बेत रद्द कर बाबा, आपून दुसरीकडे बगूया.” “ते काय बी नाय संज्या, पोरगी हायीस व्हयं लेकाच्या; मर्द गडी असूनबी पोरीगतं भितोयास. चल लेका आमी हायं सगळी,तुला काय बी नायं व्हणारं.”

काही पोरं घाबरली होती, पण जर आपण आता गेलो तर बाकीची पोरं आपल्याला चिडवतील म्हणून तिही त्यांच्या मागोमाग चालू लागली. कुणी काहीही बोलत नव्हते. अगदी काळोखी रात्र होती. बोलल्याशिवाय बाजूला कोण चालत आहे याचा पत्ता पण लागत नव्हता. एका मुलाच्या हातात दिवटी होती पेटवलेली आणि बाकी दोघा तिघांक़डे बॅट-या होत्या. त्याच्या प्रकाशातच सगळी चालू लागली. डोंगराच्या पायथ्याशी आली. थोडे अंतर चालून पार केल्यावर ते डोहाच्या जवळपास पोहचले. इतक्यात रवी थांबला. पाण्याचा पाझर वहात असलेल्या खळग्याच्या बाजूला त्याला वेडया वाकडया कपारी दिसल्या. कदाचीत त्याच्या आत खेकडा मिळेल असे त्याला वाटले आणि त्याने नाम्याला बॅटरीचा प्रकाश टाकायला सागितले. खरेच तिथे खेकडा मिळाला. अगदी हळूवार जवळ जात त्याने गचकन खेकडयाला पकडले आणि आपल्या जवळील टिक्यात टाकले. खेकडा मिळाल्यामुळे सगळ्यांनाच जोम चढला आणि ते पुढे चालू लागले. आता गर्द झाडी चालू झाली होती. मध्ये मध्ये काही खेकडे पण मिळत होते. “ये रव्या आता बास रं मायंदळ खेकडं मिळालेती, आता माघारी फिरूया.”

“का रं लेका, घाबरलासं व्हयं. सगळ्यांस्नी चार चार खेकडं तर यायला नगं का?”

“तस नव्ह रव्या, रात बी लै झालीया तवा काय वंगाळ नगं व्हायला.” “थाब रं लेका,काय बी नायं व्हणार,अजून थोडी गावूदयात मग जावूया.”

सगळ्यांनी होकार दिला कारण आता एवढया रात्री आणि एवढी मेहनत केल्यावर सगळ्यांनाच खेकडयाची हाव सुटली होती. तेवढयात त्यातील एकाला डोंगराच्या वरच्या भागात काही दिवटया दिसल्या पेटलेल्या. त्याने त्या सर्वांना दाखवल्या.

“बगा म्या म्हटंल नव्हतं,आपल्या परीस लै माणसं येत्याती हिकडं खेकडं पकडाया अनं त्यांच्याकडबी दिवटया हायीत्या.”

आता सगळ्यांनाच धीर आला.आपल्यासारखे कुणीतरी आहेत आजूबाजूला म्हटंल्यावर.मग ते वरच्या बाजूला जावू लागले कारण त्या माणसांच्या पुढे गेल्याशिवाय ह्यांना जास्त खेकडे मिळणार नाहीत.पण ही सगळी पोरं जस जशी पुढे जात होती, तस तश्या त्या दिवटया त्यांच्या आणखीन पुढे जात होत्या. “ये लेकाच्यावो चला की बिगी बिगी नायतरं एकबी नाय मिळणारं.” सगळे जात असता, एका पोराला आठवले की आज त्याची आई त्याच्या बहीणीवरून लिंबू उतरून टाकायला त्याच्या बाला सांगत होती.

“रव्या अरं आज अमोश्या हाय रं, माजी आयं बाला म्हणत व्हती की संगी वरन उतरून टिकटीला टाका लिंबू. आठवडाभरास्न संगीचा ताप उतरना तवा आजच टाका अमोश्याबी लागलीया.”

तेव्हा कुठे सगळ्यांच्या लक्षात आले की आज अमावस्या आहे ते आणि म्हणूनच आज आभाळात एकही चांदणी दिसत नव्हती. सगळा काळाकुटट अंधार पसरला होता. आता जे घाबरले नव्हते त्यांनाही भितीने घाम फुटू लागला. तेही आता लगेच इथूनच परत फिरूया असे म्हणू लागले आणि सगळ्यांना ते पटलेही. सगळे माघारी फिरण्यासाठी राजी झाले. त्यांनी वर पाहिले तर त्या दिवटया आता त्यांच्या जवळ येत आहेत असे वाटू लागले. सगळे खुप दमलेही होते, आणि अचानक वरच्या दिवटया ठेका धरून नाचू लागल्या. एक प्रकारचा विचित्र ध्वनी आता ऎकू आला. सगळे खुप घाबरले.पायाखालची जमीन आता सरकते आहे की काय असे वाटू लागले. नाम्या मागे मागे सरकत असता अचानक त्याचा पाय व्हळीतील झाडाच्या मुळात अडकला. त्याला तो पाय बाहेरच काढता येईना.

“ र... र... रव्या, रव्या म.... म... माझा पा... पा.. पाय.”

रव्याने घाबरत घाबरत त्याला वर ओढले आणि अचानक एक मोठा प्रकाश झाला. सगळ्यांचेच डोळे दिपले. काय होत आहे कोणाला काहीच कळेना. अंगाचा थरकाप उडाला होता. आता इतक्या वेळ दिसणा-या त्या चमत्कारीक दिवटयाही गायब झाल्या होत्या. अचानक जोरदार वारा वाहू लागला. कुणाला धड उभेही रहाता येईना, एकमेकाला सावरत तर होते पण भयाने काकडून एक सारखे देवाचे नाव घेवू लागले.

“ना...ना... नाम्या गावलो रं आपून कचाटयात.आता नाय आपली सुटका.”

“ना...नाय रव्या इ..इ..इथं योक सेकंद पण नाय थरायचं, च..च...चला रं पळा रं इथनं.

एक पाय माघारी टाकणार, इतक्यात डोंगरावरून एक जोरदार किंकाळी ऎकू आली .रव्यानं तर घाबरून तिथेच टिक्के टाकले. थरथरतच तो टिक्के उचलणार इतक्यात आणि एक गुढ आवाज वातावरणामध्ये भरून गेला. सगळ्यांची बोबडी वळली. सगळ्यांनी तिथून धूम ठोकत पळ काढला. परत वरच्या बाजूने भयाणक आवाज आला.

“लेकांनो सुटलासां रं.”

त्या आवाजासरशी पोरांनी जोरदार बोंब ठोकत गाव गाठला.


Viewing all articles
Browse latest Browse all 1118


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>