आज गुरुवार भूतबंगलाचा वार.....वाचा...हे असे भूत सुद्धा असते...
विक्रम
पसारा आवरणार भूत.... श्रद्धा चौधरी-शल्हाळकर
गाड्यांच्या आवाजाने विवेकला जाग आली....क्षणभर त्याचं त्यालाच सुचेना की नेमका तो कुठे आहे? काय होतंय... किलकिले डोळे लख्ख उघडले तेंव्हा त्याला समजले की सकाळ झाली आहे. शेजारच्या टेबलावर ठेवलेले घड्याळ हातात घेऊन त्याने बघितले आणि तो ताडकन उठून बसला. १०.१५ वाजत आले होते. आता मात्र तो टक्क जागा झाला. रात्री घडलेल्या प्रसंगाची आठवण करायला त्याला वेळ तर नव्हताच पण त्याने मनाशी मात्र ठरवले की आज तो यावर कायमचा उपाय मात्र नक्की ठरवेल.
धावतपळत ऑफिसला पोहोचल्यावर त्याला निषादने विचारले “काय रे आज परत उशीर झाला वाटतं? आणि डोळे असे सुजलेले का दिसतायेत? रात्रभर झोपलेला दिसत नाहीयेस...”
निषाद आणि विवेक हे दोघे कॉलेज काळापासून जिवलग मित्र होते त्यामुळे गेले काही दिवस घडणारा आणि काल रात्री घडलेला प्रसंग त्याला सांगावा असे विवेकला क्षणभर वाटले पण दुसऱ्याच क्षणी त्याच्या मनात विचार आला की निषादला कदाचित त्याने सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास बसणार नाही त्यामुळे तो फक्त इतकच म्हणाला
“काही विशेष नाही रे .... पण मला तुझ्याशी एका महत्वाच्या विषयावर बोलायचे आहे... आता माझी एक मीटिंग आहे तेंव्हा जेवताना बोलू“ असे म्हणून विवेक आणि निषाद आपापल्या कामात बुडून गेले.
दुपारी एकत्र जेवताना विवेक निषादला म्हणाला
“तुझ्या ओळखीपैकी कोणाचा एखादा flat रिकामा असेल तर सांग ना... तुझ्या मित्रांसोबत sharing मध्ये असेल तरी चालेल किंवा पेइंग गेस्ट म्हणून जरी कुठे जागा असेल ना तरी मला चालेल पण मला येत्या २-३ दिवसात त्या घरातून समान हलवायचं आहे.”
“२-३ दिवसात? अरे इतक्या लवकर कसं शक्य आहे हे? आणि असं काय झालं की इतकं सुंदर घर तू सोडतोयेस?” निशादने विचारले.
“ते काही फार विशेष नाही तू फक्त मला लवकरात लवकर कुठे जागा आहे का ते सांग.” विवेक म्हणाला.
“विशेष नाही कसं? गेले काही दिवस मी बघतोय तू ऑफिसला उशिरा येतोयेस, कामात तुझं लक्ष नसतं आणि डोळे कायम सुजलेले...असं वाटतं रात्रभर झोपलेला नाहीयेस... कसला एवढा विचार करतोयेस? मला सांग बघू लवकर.....”
निषादने जवळजवळ विवेकला दमच भरला.
“आणि हे काय आता नवीन घर बदलायच खूळ आणि ते पण इतक्या घाईने.... काय गरज आहे? इतकं सुंदर घर का सोडायचं आहे तुला? आठवतं ना ते घर आवडलं म्हणून ठरलेल्या भाड्यापेक्षा २००० रुपये जास्त देत होतास तू ...आणि मग अचानक असं का म्हणतोयेस की २ दिवसात तुला घर बदलायचं आहे? ते काही नाही तुला मला नक्की काय झालंय ते सांगायलाच हवं.....”
“बऱ ... सांगतो... पण इथे नको... चल आपण चहा प्यायला जाऊ... तिकडे सांगतो....” असे बोलून विवेक आणि निषाद चहा प्यायला त्यांच्या नेहमीच्या टपरीवर गेले.
“हा... सांग आता “ स्पेशल चहाचा घोट घेत निषादने विचारले. “ तुला तर माहीतच आहे निषाद मला कामाचा कित्ती कंटाळा आहे. कॉलेजमध्ये असताना देखील आपल्या होस्टेलच्या रूमवर माझाच सगळ्यात जास्त पसारा असायचा.... आणि तो आवरून ठेवण्यासाठी तू कायम मला ओरडत असायचास....” विवेक म्हणाला. “खरय रे बाबा... कित्ती पसारा करत होतास तू? आणि एवढा मोठा ऑफिसर होऊनसुद्धा तुझी तीसवय अजूनतरी काही सुधारलेली दिसत नाहीये...परवाच मी तुझ्या घरी आलो होतो तर मला बसायालासुद्धा जागा नव्हती...सगळीकडे पेपर ... शेवटी मीच जागा करून बसलो....“ निषाद म्हणाला .... “तुला आठवतंय ना निषाद मला हे घर कित्ती आवडलं होतं ते... या घरात एक वेगळीच शांतता होती ... भिंतींची सुंदर रंगसंगती आणि त्यावर शोभणाऱ्या सुरेख अश्या चित्रांनी सजवलेले हे घर आणि खास करून बाल्कनी मध्ये लावलेली आणि योग्य निगा राखलेली विविध फुलझाडे पाहून तर मी तेंव्हाच ठरवलं होतं की मी या घरात कोणालाही सोबतीला घेणार नाही... मला माझ्यासाठी हवी असलेली स्पेस याच घरात मिळेल... आणि म्हणूनच मी ठरलेल्या भाड्यापेक्षा २००० रुपये जास्त देऊन या घराचा एकमेव भाडेकरू झालो....” विवेक आठवणीत रमला होता. “अरे पण मग इतकं सगळं होतं तर अचानक हे घर का सोडायचं म्हणतोयेस? नेमकं झालं तरी काय?” विवेकला आठवणीतून जागे करत निषादने विचारले. “तुला माझी पसाऱ्याची सवय तर माहीतच आहे...“ विवेक म्हणाला.
“हो आणि त्याबद्दल मी तुला कितीतरी वेळेस समजावले आहे प्रसंगी आपले वादही झालेत त्यावरून....” निषाद उत्तरला....
“अरे हो बाबा... आता परत सुरु करू नकोस. आधी मी काय सांगतोय ते ऐकून घे....” विवेक म्हणाला.
“बर.... सांग बघू....” इति निषाद...
“तर झालं असं ... तुला माहितीये ना मी परवा २ दिवसांच्या कॉन्फरन्स साठी मुंबईला गेलो होतो ते?”
“हो त्याचं काय?” निषादने विचारलं.
विवेक म्हणाला “मी मुंबईला गेलो त्या दिवशी घरात खूप पसारा होता. आधीच मला कंटाळा आणि त्यात मला जाताना फार घाई झाली... त्यामुळे मला काहीच पसारा आवरायला वेळ मिळाला नाही .... २ दिवसांनंतर रात्री उशीरा मी घरी आलो आणि झोपण्यापुरती जागा करून झोपलो... सकाळी उठून पाहतो तर काय माझं पूर्ण घर चकचकीत आवरलेलं...सगळ्या वस्तू जागच्या जागी...”
“ अरे काय सांगतोस काय? कसं शक्य आहे हे?“ निषादने आश्चर्यचकित होऊन विचारले.
“अरे तेच तर ना.. सकाळी उठल्यावर मला प्रथम कळलेच नाही की मी नक्की कुठे आहे ते. झोपेतून लख्ख जागे झाल्यावर मला समजलं की मी माझ्याच घरात आहे ते. मला चांगलं आठवत होतं की मी रात्री प्रचंड पसाऱ्यात झोपलो होतो ते आणि सकाळी उठून बघतो तर काय सगळ्या वस्तू जागच्या जागेवर.... मला तर पहिले विश्वसच बसला नाही. परत वाटलं की रात्री झोपेत मीच सगळं आवरून ठेवलं असेल... नंतर कामाच्या घाईत मी हि गोष्ट साफ विसरून गेलो....” विवेकने सांगितले.
“अरे हा ... असच झालं असणार... चला कधीतरी तुम्हाला तुमचा आळशीपणा समजला आणि झोपेत का होईना आपण त्यावर मात केली ... हे मात्र बर झालं ....” निषादने विवेकला चिडवले.
“नाही रे... मलाही असंच वाटलं होतं.... पण माझी पसारा करायची सवय काही मोडली नव्हती... विवेक उत्तरला.
“मग?” निषादने विचारले.
“अरे.. आधी तरी असं क्वचितच होत होतं... पण आता मात्र रोज मी जेंव्हा ऑफिस मधून घरी जातो तेंव्हा घर स्वच्छ आवरलेलं असतं .... सगळ्या वस्तू जागच्या जागेवर असतात... आणि हे सगळं मी करत नाही.... शिवाय या घराची चावी माझ्याशिवाय इतर कोणाकडेही नाहीये आणि घरमालक पण इथे राहत नाहीत.” विवेक म्हणाला.
“मग कोण करतं हे?”......