श्रीपाद जोशीची ही कथा एक खूप सुंदर व्यक्तिचित्रण उभे करते डोळ्यासमोर....
विक्रम
चाचा – श्रीपाद जोशी
ही खूप लहान असतानाची गोष्ट..
मी आमच्या दुकानात संध्याकाळी गिऱ्हाईकांच्या जिनसा देण्यात मग्न असलो की एक जेमतेम उंचीची व्यक्ती क्वचित कधीतरी दारासमोर येई व मोठ्याने गल्लीत आरोळी ठोके..
"ये कल्हई वाले...तांब्याची भांडी, पितळाची भांडी ... ये कल्हईवाले.."
दुकानात गर्दी असेल तर पुढे निघून जाई.. गर्दी नसेल तर जुना घरोबा असल्याने दुकानात येऊन माझ्या आजोबांना "काय मग काका..? काय चाललय..? " अशी विचारपूस करी..
त्यानंतर मग बाबांचा हात कोपरीच्या खिशात जाणार आणि मग दोघेही विडी शिलगावत इकडच्या तिकडच्या गप्पा मारत असत.. भांड्यांना कल्हई करणाऱ्या या माणसाचं मला अप्रूप वाटे.. मी गर्दीतही त्याला निरखत असे.. थोडा मळका सदरा व आखूड पायजमा घातलेला हा बुटका माणूस आरोळी ठोकायचा तेव्हा विलक्षण वाटायचा ...बर याचं वैशिष्ट्य असं की भरदुपारी, सकाळी हा गावी उतरल्याचं कधीच जाणवलं नाही..एकतर संध्याकाळी किंवा रात्रीचं गावात उतरणं व्हायचं..गावच्या मारुती मंदिरालगत विठोबा रखुमाईचं मंदीर आहे त्याच्या पाराला खेटून लिंबाच्या झाडाखाली हा माणूस उतरायचा....पाल वगैरे बिलकुल ठोकायचा नाही..पारावर एका कोपऱ्याला सगळं सामान ठेवून पाराच्या खाली भुईला छोटं खड्ड करून ते ओलं करून कल्हईसाठीचा भाता त्यात रोवला जाई...मग दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा गावात चक्कर मारताना तोच आवाज... "ये कल्हई वाले..तांब्या, पितळाची भांडी ...ये कल्हईवाले.." तोपर्यंत वस्तीवर गावात कल्हईवाला आल्याची बातमी पोहोचायची..जेमतेम ३-४ दिवसांचा मुक्काम असायचा गावात..आणि कुठल्या एका दिवशी दुपारी मंदिराकडे जावं तर बिऱ्हाड हाललेलं असायचं...सगळ मोकळं मोकळं दिसे त्या जागेवर...मागे फक्त भाता रोवलेल्या ठिकाणच्या खुणा राहायच्या ...त्या बोडक्या जागेकडे पाहून माझी रस्त्याकडे लांबवर नजर जायची व विचार यायचा की कुठे गेला असेल आता हा आणि कधी येईल पुन्हा...?
भाईसाब होता...मुसलमान...गावाशी, आमच्या घराशी वर्षानुवर्षे लोभ असलेला हा माणूस...और क्या काका? या ऐवजी मोठ्या लकबीत "हौर क्या काका..?” म्हणायचा. मग बाबांची आणि त्याची हिंदी ऐकत राहायला मजा यायची...
पावसाळ्यात फजिती व्हायची त्याची..त्यावेळी खूप पाऊस पडायचा...इतका की ओढा भरून वाहायचा...त्यानंतर काही वर्षांनी पाऊस हळहळू कमी होत गेला..तर तेव्हाच्या अशा जोराच्या पावसांत कल्हईवाला चाचा मारुती मंदिराच्या ओट्यावर आडोशाला सायकल लावी व मंदिरात सगळं बाड बिस्तार टाकी...आमच्या आसपासच्या एक दोन गल्लीत संध्याकाळी चक्कर टाकली की भाकरी, भाजी, ठेचा असं काही एक दोन घरातून मिळायचं.. मग भात्यावरदेखील थोड करायचा खाण्यासाठी.... मला त्याने भात्यावर केलेला फोडणीचा भात खूप आवडे.. फोडणी देताना तडातड होणारा आवाज ऐकत पुढे दोन घास शून्य नजरेत बघत खाणाऱ्या चाचाला एकटं बघून मला कसंनुसं व्हायचं...रस्त्यावर जगणाऱ्याचं जीवन असून असून यापलीकडे असणार तरी काय म्हणा..? मी चाचाशी मराठीत तर कधी तोडक्या मोडक्या हिंदीत गप्पा मारायचो..मी एकदा विचारलं की 'चाचा और कौन रहता है तुम्हारे साथ...?' तर म्हणे दोन पोर आहेत... शकील आणि अकिल... आणि "बायको?" असं विचारताच काही न बोलता खाली मान घालून त्याने आपलं काम सुरु केलं... मग मी पुन्हा कधीच विषय घेतला नाही...
मोठ्या मुलाचं नाव शकील तर लहान्याचं नाव अकिल... मग पुढे कधीतरी शकील-अकिलदेखील यायचे चाचासोबत.. कधी एकच जण यायचा... शकील खुपदा यायचा...त्याची आणि माझी चांगली गट्टी जमली होती... शकीलला सायकल सजवायचा भारी नाद होता... त्याच्या चेहऱ्यावर कायम निसर्गदत्त हसू असे..सर्कशीत खेळतात तशी गोलाकार सायकल चालवायचा शक्या...मजा यायची...तो मला ४-६ वर्षांनी मोठा असेल...तेव्हा तो कदाचित १६-१८ वर्षांचा असावा...
दरवर्षी चाचा दोन तीनदा गावात यायचा...पुढे एकटाच यायला लागला...मी विचारलं..."शकील किधर है चाचा... क्यू नही आता....?" तर म्हणे, "अब क्यू आयेगा ओ..? बडा जो हुआ है..." अस्वस्थ तरीही निराकार उद्गार होते ते... पुढे शक्याने ड्रायवर म्हणून काम सुरु केलं..नव्या कोऱ्या हूड नसलेल्या कंपनीत नुकत्याच तयार झालेल्या चासी गाड्या चालवायचा तो... एकदा गावातून पण कोरीखट्ट गाडी घेऊन जाताना थांबला होता तो...मग आम्ही चहा पिलो गावातल्या हॉटेलात...बरच बदललं होतं. तो, मी, काळ, वेळ...सगळच...जगणं मागे पडत जाताना धावणं हाती येतं..
पुढे खुपदा थकलेला चाचा एकटाच यायचा गावात... खूप खोकायचा... दारू कधीच पिला नाही... पण विडी खूप प्यायचा...सगळी कामं आटोपून जेवण झालं की स्वत:ची पथारी टाकून भिंतीला मान टेकवत पायावर एक तिढी टाकत आपल्याकडे पाहत दोन वाक्यं बोलणार आणि तेवढयात शून्यात बघणार... त्याच्या शुन्यात बघण्याचे अर्थ मला कधीच कळायचे नाहीत... त्याला शून्यात बघताना मी निरखायचो तेव्हा मला तो भणंग फकीर, साधू, पीर वाटायचा...
चाचाच मला बोलला एकदा अचानक .. "तुहा दोस्त शक्या ...! त्याला आता माह्यावाली गरज राह्य्ली न्हाही... लगीन केलं..डायवरकी करतो आता...मला साधा इचारत पण नाही...लहाना बी आता कामावर जाया लागला... ह्यो बी सोडून जाईन का कधी मला...?' " चाचा हे सगळं असं एका दमात बोलून गेला की मला काहीच बोलता आलं नाही... अनोळखी प्रश्नांना आश्वस्थ उत्तरे द्यायची तरी कशी..? दुसऱ्या दिवशी सकाळी मंदिराकडे गेलो तर चाचा दुसऱ्या गावाकडे निघूनही गेला होता... भात्यासाठी केलेल्या खड्ड्याची निशाणी तेवढी मागे उरली होती... पुढे ना कधी चाचा दिसला ना शकील...