ही कथा एक वेगळे व्यक्तिमत्व आपल्या समोर उभे करते आहे...
विक्रम
"सेंड ऑफ " - अरुण वि. देशपांडे
कार्यालयीन कामकाज संपले आणि चाळीस -पन्नास जणांचा स्टाफ असलेल्या आफिसच्या मिटिंग -हॉल मध्ये सगळेजण जमले, बडे-बाबू म्हणून कार्यरत असलेले मनोहर नांदेडकर ३८ वर्षांच्या नोकरीनंतर आज निवृत्त होत होते. एक मोठा कालखंड आज कार्यपूर्ती करून विश्रांती घेणार होता. मनोहर ज्या काळात नोकरीस लागले त्या काळातील सिनियर्सच्या सहवासाचा परिणाम त्यांचेवर होणे सहाजिकच होते..तेच संस्कार मनोहर आयुष्यभर पाळीत आले, ऑफिस-नोकरी आणि यासाठी दिवस-रात्र ऑफिस एके ऑफिस हे त्यांचे जीवनसूत्र झालेले होते.
तिन्हीत्रिकाळ फक्त माझे काम माझे ऑफिस साहेब साहेबांचे काम ऑफिसचे काम याशिवाय इतर विषय त्यांना जणू काय वर्ज्य होते. याचा परिणाम मनोहर त्यांच्या पारिवारात कधीच मिसळून जाऊ शकले नव्हते परिणामी.. आपली लहान मुले मोठी झालीत हे त्यांनी पाहिले. त्यांच्या मनाला हे कधीच जाणवले नव्हते.
याचा अर्थ असा नव्हता की त्यांचे घरातील आपल्या माणसांवर प्रेम नव्हते, त्यांच्या विषयी माया वाटत नव्हती. हे सगळ असून ही त्यांच्या वागण्यातून बोलण्यातून घरातील कुणालाच न ओलावा जाणवला, ना जिव्हाळा. एकूणच सगळे कर्तव्य पार पाडणे इतकीच मर्यादित भूमिका नसते माणसाची साथ-देणारा प्रेमळ नवरा काळजी करणारा पिता कुटुंबवत्सल प्रमुख यापैकी काहीही होणे मनोहर यांना जमले नव्हते
परिस्थितीने मनोहर खूप शिकून मोठी नोकरी मिळू शकले नव्हते. महत्वाकांक्षी मनोहर यांनी साध्या कारकुनाच्या खुर्ची पासून सुरुवात केली इतक्या वर्षातला बडे-बाबू होण्या पर्यंतचा त्यांचा प्रवास स्वतःच्या स्वार्थसाठीची एक लढाईच होती..जी त्यांनी सतत गनिमी काव्याने लढली. स्वता:चा वरचष्मा रहावा या इच्छेपोटी त्यांनी कायम दुहीचे अस्त्र वापरले स्वतःची प्रतिमा उजळ ठेवीत इतरांना पुढे जाता येणार नाही असे अडथळे निर्माण करून ठेवणे यातच त्यांची शक्ती आणि बुद्धी खर्च होत गेली. कुणाला कधी नाही म्हणयचे नाही आणि होकार तर कधीच नाही. शब्दाने कुणी दुखावणार नाही याची ते सतत काळजी घेत . ऑफिसात त्यांना मिठ्ठी छुरी असेही म्हणत मनोहरबाबू म्हणजे साहेबांचा माणूस हीच ओळख दुसऱ्या शब्दात साहेबांचा चमचा अशीच होती . व्यक्ती पेक्षा खुर्ची श्रेष्ठ या कटू-सत्याला नाकारून चालणार नव्हते. साहेबंनी नाराज होऊ नये म्हणून मग मनोहरबाबूंना खुश ठेवणे सोपे हे सगळ्या स्टाफच्या अंगवळणी पडत गेले. स्टाफच्या मनात आपल्याबद्दल काय सद्भावना आहेत याची चांगलीच कल्पना मनोहरबाबूंना होती.
आणि आज हा स्टाफ त्यांच्या निरोप-समारंभास जमला होता. उद्यापासून मनोह्र्बाबू नसणार, वातावरण नक्कीच वेगळे असणार होते. इतकी वर्षे आपण या सहकार्यंना सुखाने काम करू दिले नाही, जे वागलो ते त्रासदायक वाटावे असेच होते. आजच्या या कार्यक्रमात आपल्या विषयी हे वाईट नाक्कीच बोलणार नाहीत. कारण सेंड ऑफ..निरोप समारंभ प्रसंगी जाणऱ्या व्यक्ती विषयी चांगलेच बोलावे असा सभ्य संकेत सगळेच पाळत असतात.
सरता काळ डोळ्यापासून सर्रकन सरकून गेला..एकाएकी मनोहरबाबूंच्या मनाला विषादाच्या भावनेने ग्रासून टाकले, एका विलक्षण अपराधाच्या भावनेने मनास वेधून टाकले असल्याची तीव्र जाणीव त्यांना होऊ लागली.
निरोप-समारंभ सुरु झाला. प्रास्तविक झाले. आणि मनोहरबाबू मध्येच उठून उभे राहिले ..
“आज माझ्या बद्दल सारेजण छानच बोलणार, कारण तुम्ही चांगली माणसे आहात, पण मी तसा नाही..हे तुम्हाला माहिती आहे. म्हणून प्लीज तुम्ही काही बोलू नका ..जो मी नाहीच आहे,तो आहे हे ऐकणे आता नको. मीच तुम्हा सर्वांचा अपराधी आहे, जे काही वागली त्याबद्दल माफी मागतो. झाले गेले विसरून जाणे सोपे नसते पण मोठ्या मनाने तुम्ही आज या कोत्या मनाच्या तुमच्या सहकार्याला निरोप द्या. इतकेच मागणे मागीन.”
आणि इथेच सेंड-ऑफ पार पडला .