एक अप्रतिम नुक्क्कड कथा...हे असे लेखन नुक्कडला खूप समृद्ध करते...दिलीप लिमये नुक्कड तुमचे ऋणी आहे..
विक्रम
साथसंगत – दिलीप लिमये --------------
" हलो S , मी डॉक्टर वाणी बोलतोय.."
माझा आवाज नकळत पडला.दर खेपेला हा विशिष्ट टोन ऐकला की मी नव्या आव्हानाला सामोरा जातो. कुणीतरी फोनकरून कामाला जुंपायचे असा ठरवून फोन करतं, आणि मी बहुतेक वेळी भिडेखातर राबायला लागतो... दर वेळेला ठरवतो, आता हा प्रकार बंद करायचा. एकदाच काय तो सोक्षमोक्ष लावून मोकळं व्हायचं..आणि पुन्हा असल्या फोनवर होणाऱ्या कटकटीला सामोरं जायचं नाही..
तरीपण माझ्या तोंडून नेहमीचं वाक्य फुटतं..
" बोला,डॉक्टर..."
डॉक्टर सांगू लागतात...
" जरा गडबडीत आहे..पण माझं हे काम करा. करा म्हणजे क sरा sच....येत्या तीस तारखेला दवाखान्यात गाण्याचा कार्यक्रम करतोय..वैद्य मराठी हिंदी गाणी गाणार आहेत..तुम्हाला वैद्य माहीत आहेत..आपल्या सपोर्टग्रुपचे.. छान गातात..म्हणजे मी कधी ऐकलं नाही...पण त्यांनी एकदा मोबाईल माझ्या कानाशी वाजवला होता...छानच गातात..आणि पेटी तेच वाजवतात...ते एक बरं झालं. एक गुच्छ वाचला...आपला जोक हंs..तर तुम्ही त्यांना एक तबलेवाला द्या..त्यांचा नेहमीचा तबलेवाला नेमका घसेदुखी झाल्यानं गळाठलाय...तर तीस तारीख. संध्याकाळी सहा वाजता..आधी तासभर बोलवा...ओके..तेवढं बघा..."
मी तोंड उघडेपर्यंत फोन मेला.
-------------------------
तुम्ही एकदा डॉक्टर वाणींना भेटा. त्यांच्याशी बोला..एकदम विरघळून जाल. एकतर त्यांच्या प्रशस्त केबिनच्या बाहेर ते कुणाशी बोलत नाहीत..आणि बाहेर कुणाला भेटतच नाहीत. केबिनमध्ये बसून फोनवर सतत बोलत असतात....तुम्हाला त्यांची स्वागतसुंदरी आधी दहा मिनिटं बसवून ठेवते...मग एक स्मितहास्य. मग दुसरी पोक्त आया चहाचा मग आणून देते....तोवर डॉक्टर दुसऱ्या फोनवर बोलताबोलता तुमच्याकडे काचेतून पाहतात. उजव्या कानातील रिसिव्हर सावरत डाव्या हातानं तुम्हाला याsयाssया अशी खुण करतात.
काचेचा जड दरवाजा ढकलत तुम्ही आत गेलात की फोनवरच्या भिडूला वाक्य ठरलेलं..
"सर, तुम्ही मला वेळ देऊन बोललात..बरं वाटलं..आय विल गिव्ह यु अ टिंकल सम अदर टाइम...आत्ता एक गेस्ट आलेत अचानक..यु मस्ट मीट हिम वन्स..लेखकआहेत.चित्रकार, नट ..आणि व्हॉटनॉट...ओकेओकेओके.." मग तुमच्याकडे पाहून एक मोठ्ठं लांबरुंद हास्य.
" बोला सर, मी तुम्हाला एवढयासाठी बोलावलं की, मतिमंद मुलांसाठी आपण एक कॅम्प घेऊया...तुम्ही चित्रकलेचे धडे द्यायचे..तर.. मतीमंद मुलं आणि त्यांचे आईबाप..त्यांच्यासाठी छोटासा सेमिनार..तो आपले पेंढारकर घेतील ...मुलांची क्रिएटीव्ह एनर्जी कशी डेव्हलप करता येईल वगैरे....चला, आता ठरलं..."
मग डॉक्टर पेंढारकरांच्या फोनवर बोलत राहतात..तारीख ठरते. वेळ ठरते.
मग मंगल कार्यालय नाहीतर हॉल..केटरर...सगळंसगळं ठरतं...
" तुमचा चहा झाला का?"
हा प्रश्न विचारला की तुम्ही समजायचं..लिमये, उठ आता. संपलं तुझं काम..मग तुम्ही एक लेचंपेचं बळेबळे हसू व सोबत निष्प्राण हस्तांदोलन करून उठता...खुर्चीतून उठून, मागे वळून पुन्हा एकदा काचेचा जड दरवाजा ढकलून बाहेर पडताना तुमच्या कानावर एक लहान गडगडाट पडतो आणि एक वाक्य....
" मग लिमये, या तुमची रंगकामाची धोकटी आणि शेरभर हातकागद घेऊन..."
--------
मी जुन्या अनुभवांची उजळणी पुन्हा एकदा केली..आणि निमुटपणे रोजच्या कामात गुंतलो.
दुसऱ्या दिवशी सकाळी बागेत कशाळकर भेटले..ते एका तबला प्रशिक्षण केंद्राचे सेक्रेटरी आहेत..त्यांना नमस्कार करून संभाषण सुरु केलं. तीस तारखेला एक होतकरू, नवशिका तबलजी हवाय वगैरे सांगितलं..आणि उत्तराची वाट बघत थांबलो. मग कशाळकर विचारात पडले. चष्मा काढला. डोक्यावरून तीनदा हात फिरवला..मग दोन परिचितांना हात हलवून झाला...मग अतिशय सावकाश आवाजात बोलू लागले... " लिमये...गंमत म्हणजे नेमकी तीसला आपल्या क्लासची गुरुपौर्णिमा आहे....पण मी काहीतरी सोय करतो...''
--------------------
एकतर एवढ्या अजस्त्र आणि गुंतागुंतीच्या इमारती लोक का बांधतात हे मला पडलेलं प्राचीन कोडं आहे... ' माणिकबागेत कुठंतरी ' आणि "सिंहगड रस्त्यावर कासटच्या समोरच्या गल्लीतील डावीकडची सगळ्यात मोठी बिल्डींग' एवढया पुरेश्या पत्त्यावर अर्धातास सायकलपीट आणि नंतर पंधरा मिनिटं पायपीट करून मी इंजिनिअर पुराणिक यांच्या घरात त्यांच्यासमोर बसलो.
"मला लहानपणापासून हौस आहे. वेळ मिळाला की तबल्याचा रियाझ करत बसतो...कशाळकर मला फोनवर बोलले..तुम्ही मोठं काम करताय..मी नक्की जाईन...मला तशीही मानधनाची अपेक्षा नाहीय..आज संध्याकाळी वैद्य मला फोन करतील.आम्ही आधी दोनदा सराव करू..तुम्ही मला मोठी संधी देताय..."
पुराणिक सज्जन होते. हिंजवडीत कुठेतरी नोकरी करून संपन्न झालेले होते..घरावर जरी सुखाची साय धरलेली असली तरी माणसानं संस्कार जपले होते..भिंतीवर जुना आजोबांचा फोटो होता.
बाकरवडी आणि चहा झाला. मोठया आदराने पुराणिक सोडायला खाली रस्त्यावर आले..
निरोप घेताना पुराणिक थोडे भावूक झाले. ."एक डॉक्टर समाजासाठी किती काम करतात, निस्वार्थपणे काम करणारी अशी स्वार्थपरायण माणसे आहेत, आणि तुम्ही माझी ओळख व्हावी म्हणून इथवर आलात...मला फार बरं वाटलं.."
पुराणिक माणसांचे भुकेले होते. हे त्यांचं निरोपाचं भाषण ऐकताना मी इंचइंच खचत चाललो आहे, आणि निस्वार्थी, सेवाभावी इत्यादी विशेषणांवर माझा एकेकाळी असलेला विश्वास दररोज ढासळत आहे...हे अंतिम सत्य माझ्या डोळ्यांतून कोणत्याही क्षणी कोलमडून जमिनींवर ओघळून पडेल असे वाटल्यानंतर मी मान खाली घातली. त्यांचे दोन्ही हात हातात घेऊन गप्प उभा राहिलो...डोक्यावर ठेवलेल्या मिलिटरी खाकी टोपीची चंद्रकोरी पट्टी घेता येईल इतकी खाली ओढून चेहरा झाकून घेतला.डोळ्यांवर काळा चष्मा चढवला आणि निरोप घेत सायकलवर टांग टाकली.
वाणी डॉक्टर, त्यांची संस्था, त्यांचं हॉस्पिटल कम डे केअर सेंटर कम वृद्धाश्रम, या बद्दल मला काहीएक लिहायची इच्छा नाही..बोलायचीही तर नाहीच नाही..
मला पुराणीकांना चेहरा दाखवावा असं वाटत नव्हतं.पुन्हा भेटावं असंही वाटत नव्हतं. एका सरळसाध्या माणसाला मी फसवतोय याची टोचणी लागून राहिली होती...
------
तीस तारखेच्या संध्याकाळपर्यंत मला वाणी फोन करतील असे वाटत होते.
एक तारखेच्या सकाळी कशाळकरांना फोन केला..त्यांना सांगण्यासाठी की, मी पुराणीकांच्या घरी जाऊन आलो... कशाळकर म्हणाले, "लिमये, बरं झालं तुम्हीच फोन केलात ते.. एकतर ..सॉरी. मी नाही येऊ शकलो..आमचाच कार्यक्रम होता नं..दोन पुराणिकांनी सकाळी मला फोन केला..म्हणाले, काल वैद्यांचा गाण्याचा कार्यक्रम चांगला झाला...त्यांना श्रीफळ फुलांचा बुके देऊन सत्कार झाला...पण तुम्हाला नाही का आला त्यांचा फोन? मला वाटलं, माझ्याआधी तुम्हाला फोन येईल म्हणून...कदाचित तुमचा फोन त्यांना एंगेज लागला असेल...असो. पण तुम्ही मला कशाला फोन करून आभार मानताय?..असं रीतसर वागण्याची काही गरज नाही..असो.उद्या बागेत भेटू.."
-----
मी मुकाट फोन खाली ठेवला..बायकोनं मानेला दिलेला झटका पुरेसा होता...गप्प बसून राहिलो.
आज सकाळी फोनवर फडणीस. सपोर्ट ग्रुपमधला नवा स्वयंसेवक. माझ्यासारखाच. बँकेतून निवृत्त झालेला. सरळ नोकरी करतकरत वयानं वाढलेला...जन्म गेला त्याचा नारायण पेठेत आणि नोकरी झाली बाजीराव रोडवरील बँकेच्या प्रधान कार्यालयात....मागच्या भेटीत मला बँकेत कसा लढलो आणि तळेगाव (काच कारखाना) ची बदली युनियनबाजी करून कशी रद्द करून घेतली मोठ्या अभिमानानं सांगत होता...
" अरे लिमये, तीस तारखेला दिसला नाहीस कुठं? मस्त गायले वैद्य. तुझ्या माणसाचा सत्कारबित्कार केला नं...त्याला शाल द्यायची राहिली...ऐन वेळेला नारळ दिला..आणि बुके. त्या वैद्याला लाज वाटली..म्हणून त्यानं मला एक साध्यातली शाल आणायला लावली. मी काल आणलीय शनिपारापासनं..आता तू गावात आलास की ये माझ्या घरी. घे ती शाल. आणि गुंडाळ तुझ्या तबलजीच्या गळ्यात....पण नंतर जेवण मस्त होतं.आपले मोजके दहाबारा लोक. नेहमीचे...श्रीखंड पुऱ्या गरमगरम. आणि व्हेज पुलाव. अनलिमिटेड....मस्त मजा आली... आणि हो, बरी आठवण झाली...त्या प्रायोजक फार्मा कंपनीवाल्यानं दहा हजाराचा चेक दिलाय देणगी म्हणून.. तो भरायचं विसरलोच होतो.. बरी आठवण झाली..."
-------
आज दोन तारीख. मला पुराणीकांचा फोन नाही...ते सेवा करून कृतकृत्य झाले.
वाणींचा फोन नाही. वैद्यांचा फोन नाही. मीच केला होता, तेव्हा नंतर कशाळकरांचा फोन करण्याचा संबंधच येत नाही.आता या कार्यक्रमाच्या निमित्ताने सपोर्टग्रुप मधला कुणी फोन करेल अशी अपेक्षा मी केली तर तुम्हीच काय कुणीही मला गाढवात काढेल.
---
मी मात्र आज दुपारी पुराणिकांना फोन केला. त्यांच्या घरी गेलो.
ते घरी नव्हते. त्यांच्या बायकोनं आनंदानं माझं स्वागत केलं. त्यांना शाल दिली. 'फुल ना फुलाची पाकळी ' म्हणून सांगून दिली. मी आणलेला नारळ आणि एक गुलाबाची कळी शालीसोबत होती.
तिच्या डोळ्यांत आनंद तरळत होता.
वयानं माझ्या लेकीएवढीच. पण थोडी हडकलेली..एकेकाळच्या रसरशीत चेहऱ्यावर आलेली काळजीची ओढ लपत नव्हती...पण तरीही चेहऱ्यावर शालीच्या मऊ स्पर्शानं आलेली समाधानाची ठसठशीत लाट माझ्या डोळ्यांनी चटकन टिपली.
मी सायकलची किल्ली खिश्यात टाकली आणि म्हणालो.
" अहो, आवडली नं शाल? "
" काका, सुंदरच आहे. मितालीच्या बाबांचा झालेला हा पहिला सत्कार. तबलजी म्हणून..मी हे फुल जपून ठेवीन. सुकलं तरी माझ्या डायरीत जपून ठेवीन" तिनं चटकन पदरानं डोळे पुसले..
तिचा चेहरा विलक्षण समाधानात मंद चमकत होता..मला तो आवडला. मी कॅमेरा काढला आणि म्हणालो,
" आता एक तरी फोटो काढतोच..काढू नं ? "
" काका, एक का? चांगले चार काढा. थांबा. मी आलेच.."
अहो, तुम्ही आहात तश्याच छान फोटोजेनिक आहात..असं म्हणेपर्यंत ती आत पळत गेली. मी हिरमुसलो..आता तो तेजाळ चेहरा मिळणार नाही, म्हणून थोडा निराश झालो.
----
पाच मिनिटांनी साडीच्या चुण्या हातांनी नितळ करून ती आली.
तिच्या कडेवर तिनं मितालीला घेतलं होतं. शाल दोघींच्या खांद्यांवर लपेटलेली होती.
डाव्या कडेवर असलेली मिताली आणि शाल सांभाळत तिनं पोझ दिली. तिचा अभिमानानं तुडुंब भरलेला आणि सावळ्या चेहऱ्यावर समाधान बहरलेला..असा एक अप्रतिम फोटो माझ्या संगणकात बंद आहे.
मी तो कुणालाही दाखवणार नाही.
तिच्या कडेवर असलेली सातआठ वर्षांची मिताली मान टाकून बसलेली आहे. तिच्या ओठांच्या कडांतून लाळ ओघळली आहे.
आणि तिच्या शून्य भकास नजरेतून तिच्या गतिमंदपणाची आणि विकलांगतेची वेदना थेंबथेब करत सगळ्या चित्रावर कभिन्न काळ्या सावलीसारखी पसरत आहे.