सुरेखा मोंडकर ह्यांची कथा एकाच वेळी भयकथा तर आहेच...पण त्याचवेळी ती मनाला हात सुद्धा घालते...
विक्रम
प्लांचेट – सुरेखा मोंडकर
हल्ली ती बऱ्याच वेळा भूतकाळात रमायला लागली होती. तिचं आजोळ, तिच्या आईचं माहेर तिला सारखं आठवायचं. तळ कोकणातील ते निसर्गरम्य पिटकुलं गाव. कच्चे रस्ते, प्रवासाची साधनं मर्यादित, त्या मुळे लग्न करून दूर गेलेल्या सगळ्या माहेरवाशिणी उन्हाळ्याच्या सुट्टीत गावाला यायच्याच.
आधीपासून एसटी ची तिकीट काढून ठेवलेली असायची. परीक्षा संपल्या बरोब्बर दुसऱ्या दिवशी निघायचं आणि शाळा सुरु होण्याच्या आदल्या दिवशी परत यायचं. तिच्या आजोळच् भलं मोठ्ठ घर होतं. मावशीपण तिच्या मुलांना घेऊन यायची. आजूबाजूला पण सगळी चुलतातली घरं. सगळीच एकमेकांची भावंडं! सगळ्याच घरी माहेरवाशिणी पोराबाळांनां घेऊन आलेल्या असायच्या. आयांची उन्हाळ्याची कामं चाललेली असायची आणि पोरांची धम्माल दंगल. काही मामा मावश्या ह्या पोरांपेक्षा वयाने फारशा मोठ्या नसायच्या. ते पण ह्या उच्छादात सामील व्हायचे.
दिवसभर पोरांना मन चाहेल ते करायची मुभा होती. दुपारी दमल्या भागल्या बायका जरा लवंडल्या की मग मात्र त्यांना उन्हातान्हात मोकाट सुटायची बंदी होती. तिच्या मोठ्या वाड्याची माडी पण तशीच भलीमोठी होती. दुपारी सर्व माकडांचा मुक्काम त्यांच्याच माडीवर असायचा.
एका सुट्टीत मुंबईहून आलेल्या एका भावाने प्लांचेट करायला शिकवलं. घरात मोठे थोरले पाट होते. एका बाजूला खडूने एक ते शून्य आकडे लिहायचे आणि उरलेल्या तीन बाजूला ए पासून झेड पर्यंत इंग्लिश मुळाक्षर लिहायची. मध्यभागी तांब्याच्या पैश्यावर फुलवात पेटवायची, त्यावर एक फुलपात्र उपडी घालायचं.
तिघांनी त्यावर एक बोट अलगद ठेवायचं आणि मृतात्म्याला आवाहन करायचं. ते फुलपात्र भराभर पाटावर सरकायला लागायचं. आपण विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर स्पेलिंग मधून..आकड्यां मधून द्यायचं. सगळ्या मुलांचे रिझल्ट लागायचे असायचे; त्या मुळे सगळेच, पास, नापास, मार्क्स; हेच विचारायचे. प्रत्येकवेळी उत्तर वेगळंच यायचं, त्या मुळे अधिरतेने रोज विचारून खात्री करून घेतली जायची.
एक दिवस एक मामा ह्या खेळात सामील झाला. त्याने विचारलं
"माझी भरभराट कधी होणार?" त्याने आपलं एक बोट लावलं मात्र फुलपात्र झिंगल्या सारखं, रेसच्या घोड्या सारखं, पाटावर बेफाट पळायला लागलं. ते काय सांगत होतं ते वाचण पण कठीण जात होतं. बाकीची पोरं तर घाबरून आपापल्या घरी पळाली; पण मामा बरोबर ज्या दोघांनी फुलपात्रावर बोट ठेवलं होतं ती मात्र अडकली पार ढेपाळून गेली.
प्लांचेट सांगत होतं,
'तुझं नशीब तुझ्याकडे चालून येईल. दारात मर्सिडीज उभी राहील; त्यातून काळा कोट घातलेला माणूस उतरेल. तुला घेऊन जाईल. त्या दिवसापासून तुझं नशीब फळफळेल.'
मामा खुश झाला होता. त्या आड गावातून त्याला लवकरात लवकर मुंबईला पळायचं होतं. तो आतुरतेने त्याच्या भविष्या बद्दल प्रश्न विचारत होता आणि प्लांचेट बेफाम होऊन उत्तरं देत होतं. त्या दिवशी मोठ्या मुश्किलीने त्यातून ते बाहेर पडले. सगळ्यांचीच पाचावर धारण बसली होती. त्या नंतर मात्र प्लांचेट बंद झालं. पोरं माडीवर जायला पण घाबरायला लागली.
गावात तेव्हां दिवसातून दोनदा एसटी जायची. एखाद्या खाजगी गाडीचा कधी आवाज आला तर पोरं मामाकडे बघून ओरडायची;
"अरे मर्सिडीज आली रे आली!!" मामा पण आशाळभूत नजरेनं रस्त्याकडे बघायचा.
हळू हळू मुलं मोठी व्हायला लागली. कामाधामाला लागली .आजी आजोबा गेले; त्यांच्याच वाटेनं आईबाबा पण गेले. गावाला जाण मग बंदच झालं. ह्या वर्षी गोव्याला जाताना तिने मुद्दाम तिच्या आजोळच्या गावावरून लेकाला गाडी घ्यायला लावली. आड बाजूचं गाव, मुद्दाम वाट वाकडी करून जावं लागणार होत. लेकाला पण कोकण खूप आवडायचं; त्यामुळे तो लगेच तयार झाला. गाडी गावात शिरली. तिच्या ओळखीचं रवळनाथाच देऊळ, खाडी, कौलं असलेली घरं, ओहळ, ओवळ्याची झाडं, सोनटक्क्याच जंगल मागे जात होतं. तिच्या आजोळच्या घरासमोर तिने गाडी उभी करायला सांगितली.
घर बंद होतं. तिथे आता कोणीच रहात नव्हतं. कौलं उडाली होती. भिंती ढासळायला लागल्या होत्या. अंगणात ढीगभर पाचोरा पडला होता. ती अंगणाच्या पायऱ्या उतरून तुळशी वृंदावनाकडे आली; आणि दचकलीच!
गडग्यावर बसलेली एक कृश, वृद्ध व्यक्ती, होती नव्हती तेव्हढी शक्ती एकवटून तिच्या दिशेने धावली. तिने बचावात्मक पवित्रा घेतला. तिच्याकडे दृष्टी सुद्धा न टाकता ते पाप्याचं पितर रस्त्याकडे धावलं. काय झालं ते बघायला तिचा मुलगा गाडीतून खाली उतरून तिच्या दिशेनेच येत होता. त्याच्या ब्लेझरची बाही पकडून, अंगावरच्या कपड्यांच्या चिंध्या झालेला तो वृद्ध आपल्या बोळक्या तोंडानं ओरडत होता
“आली मर्सिडीज आली .... मर्सिडीज आली!!!"
त्याच्या चेहऱ्यावरच हसू खूप केवीलवाण वाटत होतं. तिच्या डबडबलेल्या डोळ्यांना समोरचं काहीच दिसत नव्हतं !