Quantcast
Channel: BookHungama
Viewing all articles
Browse latest Browse all 1118

- रेल्वे कॉलनीतल्या मुली – शशी डंभारे,

$
0
0

शशी डंभारे काय ताकदीची लेखिका आहे हे जाणून घ्यायचे असेल तर ही फिरस्ती तुम्हाला वाचायलाच लागेल...

विक्रम

- रेल्वे कॉलनीतल्या मुली – शशी डंभारे,

जुळ्या, २ क्वार्टरचा मधल्या कॉमन वॉलचा पिल्लर समोरच्या बाजूने बाहेर आलेला असायचा थोडासा. त्याच्या दोन बाजूंनी दोन मोठे बसके दगड ठेवले की एकमेकींना पाठ लावून २ खुर्च्या तयार होत. कॉलनीत पड़ीक, रिकाम्या, जुळ्या क्वार्टरचे असे पिल्लर शोधून रिकामटेकड़ी मुलं तिथे अड्डा बनवत. पिल्लरच्या २ तयार खुर्च्या-सोबत, २ पत्र्याच्या खुर्च्या ठेवल्या की ४ जणांचा अड्डा तयार होई. आजीवन सदस्य मंडळी या खुर्च्यांचे मालक असायची. बाकी सदस्य खाली चटईवर किंवा सरळ जमिनीवर.

इथे सतत पत्त्यांचा डाव रंगलेला असे. तो मुख्य खेळ बहुदा मोठ्या मुलांचा, पण त्याच्या आजूबाजूने छोटी मुलं ही विटी दांडू , गोट्या, भोवरे असे नियमित खेळ खेळत. शाळकरी मुलं शाळेत येता जाता अड्ड्याला भेट देवूनच पुढे सरकत. जाळी बांधून भोवऱ्याला एक गिरकी दिल्याशिवाय शाळेत जाणे निषिद्धच होते.

शिकलेली, मोठी मुलं नोकरी लागेस्तोवर अड्ड्यावर टाइमपास करत. अड्ड्याची खरी ओळख मात्र कॉलनीतली न शिकणारी, रिकाम टेकड़ी, घराने ओवाळून टाकलेली, कुटुंबाला भार असलेली तरुण मुलंच. ही मुलं दिवस भर अड्ड्यावर पडिक असत. यांचा कॉलनीला काही उपयोग नसे. देशाचे निव्वळ अनुत्पादक घटक. घरी चार घास गीळले की बाकी मुक्काम अड्ड्यावर. मध्यम वयाच्या मुलांचे आई बाप अधेमधे अड्ड्यावर येवून मोठ्या मुलांना तुमच्यामुळे आमची मुलं बिघडली अशा शिव्या घालत आपल्या मुलांना तिथून ओढून नेत. बाकी या अड्ड्यांना काही डिस्टर्बन्स नसे. इथे छोट्या ट्रांज़िस्टर वर मोठ्या आवाजात गाणी वाजत. दुर्री तिर्र्री असे आवाज घुमत. ते अड्ड्यांच्या सदस्यांपुरतेच मर्यादित असत.

हो, कॉलनीतल्या मुली मात्र या रस्त्याने ये-जा करत नसत. या सदस्यांत अनेकींचे भाऊ, काका, मामा असत तरीही. सदस्यच रागवायचे आपल्या घरातल्या मुलींना. कोणती नीतिमत्ता, कोणते नागरी नियम होते या अड्ड्यांचे कुणास ठाऊक, पण कॉलनीतला सगळा टाकावू कचरा इथे जमा असायचा. त्यामुळे कॉलनी स्वच्छ दिसायची इतके खरे. यात अनेक आजीवन सभासद असत. ते लहान असताना वीटीडांडू, गोट्या, भोवरा अशा खेळांत, आरडाओरडयात, भांडणा- बिंडणात प्रावीण्य दाखवून इथे एडमिशन मिळवत व पुढे जुगार, पत्ते , लॉटरी अशी प्रगती करत. त्यास साइड- बाय- साइड बीड़ी, सिगारेट, दारू, चरस, गांजा अशी व्यसनांची ऊंची देत बर्बादीचे अंतिम टोक गाठत. हे अड्डे बदनाम होते ते याच कारणांनी. चांगल्या घरातली मुलं या अड्ड्यांपासून दूर असत. अड्डेही चांगल्या घरांपासून अलिप्त असत. अड्ड्यांचा कॉलनीला त्रास नव्हता. म्हणून हे अड्डे आबाद असत. सदस्य बदलत, 'या'ची जागा 'तो' घेई, अड्डा शाबूत.

अजय या अड्ड्याचा आजीवन सभासद होता. लहानपणी विटी दांडू खेळताना त्याने सुलेमान चाचाच्या छोट्या सलीमच्या डोळ्याला ईजा केली, तेंव्हाच त्याच्या सावत्र आईने हा मुलगा घरात राहण्याच्या लायकीचा नाही असे भाकीत केले होते. ४ थी ५ वीतला अजय तेंव्हापासूनच अड्ड्यांवर वेळ घालवणे सोयीचे मानू लागलेला. कधीतरी रात्री उशिरा त्याचे बाबा त्याला बोलवायला यायचे, त्यांच्या सोबत जाताना दिसायचा. क्वचित कधी बाबा त्याला खांद्यावर उचलून न्यायचे. मग त्याच्या आईची आदळ आपट ऐकू यायची.

१० वीतला अजय आरस्पानी सावळ्या रंगाचा, धारदार नाकाचा, शिडशिडीत उंच बांध्याचा एकदम मोठाच दिसायला लागला. तिच्या वर्गातल्या सगळ्या मुलांपेक्षा देखणा. २-३ वर्षे नापास झाल्याने तो वर्गात सगळ्यात मोठा होताच, पण तिच्या लक्षात आला तो आज शाळेत येताना त्याच्या सायकलने तिला मारलेल्या कटमुळे. मिथुन चक्रवर्तीसारखा लाल रुमालाची रुंद पट्टी कपाळावर बांधलेला अजय पहिल्यांदाच तिच्या लक्षात आला आणि हे ही लक्षात आले की तो पुष्कळच मिथुनसारखा दिसतोय.

वर्गात पहिल्या तासालाच अजय तिला रोखून बघतोय हे समजल्यावर तर तिच्या को-या तरुण मनाला फुलांचे तुरेच लागले. शेवटच्या तासापर्यंत एकदोनदा त्याच्याशी नजरानजर झाली तेंव्हा ती उभी शिरशिरली. काळजाची धड़धड़ जबरदस्तच वाढली. आणि वरून हे सगळं इतकं गोडगोड होतं की तिच्याच्याने मधल्या सुट्टीत टिफ़िन खाणंही झालं नाही. संध्याकाळी शाळेतून घरी परतताना ती अंतर्बाह्य बदललेली होती. चेहराभर गुलालच गुलाल होता.

हे आत्यंतिक वेगळं काही कसंबसं पेलत ती घरात शिरली, पण घरात तर एकदम वेगळंच वातावरण. "इतका उशीर?" दप्तर ठेवल्याबरोब्बर एखाद्या तिरासारखा आईचा प्रश्न आला नी सदर प्रश्न तिला कळायच्या आत, त्यावर तिचे काही उत्तर यायच्या आत, बाबांनी सणकन कानाखालीही लगावली. डोळ्यांसमोर भर दिवसा तारे चमकले तिच्या. नंतर लहान बहिणीकडून कळलेला वृतांत असा की,

सकाळी अजयच्या सायकलने तिला मारलेली कट शेजारच्या रफीकने पहिली होती. त्याने तिच्या घरी जावून तिच्या आईला याची ताबडतोब कल्पना दिली होती. इतकेच नव्हे तर आईने प्रेमाने चहा- खारी समोर ठेवल्यावर तर रफीकने अजय एक महिन्यांपासूनच तिला अशी कट- बिट मारतोय आणि हे आख्ख्या कॉलनीला माहितेय असे पण हातचे जोडून सांगितले होते. कॉलनीतले ते क्वार्टर अत्यंत सुधारणावादी विचारांचे होते. समाजसुधारक वृत्तीची माणसे रहात होती या क्वार्टरमधे. कॉलनीत त्यांना मान होता. सामाजिक चळवळीत अग्रेसर अशी त्या घरातली पुरुष मंडळी अजयच्या अशा वागण्याने पेटून उठली.

तिची आई 'आता तिला कॉलनीत तोंड काढायला जागा उरली नाही ' म्हणत रडत होती. घरातल्या पुरुषांसाठी हे उघड चैलेंज होते. अजयच्या या डेरिंगला, तीही तितकीच कारणीभूत असून तीने हे मोट्ठे प्रकरण घरदारापासून लपवल्याचा गुन्हा केला असल्याचा ठपका तिच्यावर ठेवण्यात आला. त्याची शिक्षा म्हणून आधी तिची ' शाळाच बंद ' असे घोषित करण्यात आले. पण पुढे सुधारवादी घरातल्या मुली शिकल्याही पाहिजेतच म्हणून ही शिक्षा सौम्य करून कुणीतरी घरचे सोबत घेवून तिला शाळेत जाण्याची परवानगी मिळाली.

अजयला मात्र त्याच्या सायकलच्या त्या एका कटची भारी किंमत मोजावी लागली. कॉलनीतल्या त्या वजनदार घरातल्या पुरुषांची पोलिसांत बऱ्यापैकी ओळख होती. अजयला कुठल्यातरी गुन्ह्यात रातोरात अडकवून ३ दिवसाची पोलीस कोठडी झाली. भरपूर पोलिसी चोप खाऊन, ४थ्या दिवशी वडिलांनी कसंबसं सोडवून आणलेल्या अजयला घरात घेण्यास त्याच्या सावत्र आईने पूर्ण नकार दिला. वडीलांनी तिची कशीबशी समजूत काढली पण त्यांच्या घरात बरेच दिवस आदळ आपटीचे आवाज होत राहिले. अजय लवकरच रिकाम्या क्वार्टरच्या आस-याने फॉर्मात असलेल्या अड्ड्याच्या आश्रयाला गेला. पुढे कधी तो शाळेच्या वाटेला गेला नाही उलट बीड़ी -सिगारेट - दारू अशा पायऱ्या ओलांडत लवकरच तो चरस गांजा इत्यादीच्या आहारी गेला.

अड्ड्यावरची मुलं साधारणत: त्यांच्या गरजांसाठी, घरात पैसे मागत. त्यासाठी घरी राडे करत. क्वार्टर मधून अनेकदा असे राडे ऐकू येत. ही मुलं ट्रैन मधे पाकिटमारी करतात अशीही चर्चा असायची कॉलनीत. अजयने मात्र त्याच्या घरी कधीच राडा केलेला कुणाला दिसला नाही. कित्येकदा तर तो रात्रीही चटईवर अंगाच मुळकुटं करून अड्ड्यावरच झोपलेला असायचा. कालांतराने सुधारणावादी घराला अजयच्या आणि तिच्या लवस्टोरीचा विसर पडला. तिनेही त्यानंतर ' नो चुका - नो शिक्षा' या तत्वांवर आपले पुढचे शिक्षण सुरु ठेवले.

उन्हाळयात कॉलनीतल्या नळांना कमी पाणी येई. घरातल्या नळांना तर येतच नसे. फ़क्त पड़ीक क्वार्टरच्या चौकात असलेल्या सार्वजानिक नळाला रात्री उशिरा पाणी येई. त्याच नळावरून मग कॉलनीतल्या मुली- बायका रात्री उशिरा पाणी भरत. त्यात 'ती' पण असे. तिच्या घरचा पिंप भरायला तिला १०-१२ हंडे पाणी वहावे लागे. बरोब्बर त्यावेळी, पिल्लर बाहेर येवून तयार झालेल्या दगडी खुर्चीवर कुणालाही दिसणार नाही असा दाट अंधारात अजय बसून असे. उन्हाळ्यातल्या त्या काही रात्री, तिच्या हंडे रिचवण्याच्या त्या १० -१२ फेऱ्या, बस्स इतकाच प्रवास त्या दोघांतल्या नात्याचा.

खंगलेला, जगणं विसरलेला अजय तिलाही संपूर्ण, सुस्पष्ट कमीच दिसला. तिला दिसायचे फ़क्त एक छोटेसे, जळते, लालबुंद बीडीचे टोक. उन्हाळा संपला की धो धो वाहणाऱ्या नळाबरोबर त्यांच्या नात्यातला तो धागाही वाहून जाई. सुधारणवादी क्वार्टरमधली 'ती' घरच्यांच्या अपेक्षेइतके शिक्षण पूर्ण करून, घरच्यांनी योग्य मानलेल्या नोकरीस लागून, घरच्यांनीच ठरवलेल्या मुलाशी लग्न करून दुसऱ्या शहरात गेली.

तेवढ्या काळात 'अजय' नाव धारण केलेला तो देह बर्बादीचे अंतिम टोक गाठून कुठल्याशा टप्प्यावर अनंतात विलीन झाला. आपली छोटीशी लवस्टोरी काळजात ठेवून रेल्वे कॉलनीतली ती मुलगी जगण्याच्या धकाधकीत आता पूर्ण व्यस्त झालीय. मात्र वर्गात त्या दिवशी 'अजय ' या नावाभोवती गोळा झालेला तिचा जीव, आयुष्यात जेंव्हा कधी या नावाशी गाठ पडते, तेंव्हा तेंव्हा तितकाच, तसाच गोळा होतो अजूनही.

रात्र, चांदणं या गोष्टींचा तिला मोह तेंव्हापासूनच. आजही अनेकदा रात्री चांदण्यांच्या गर्दीत ती अंधारात चमकणारा..... तिच्या येरझर्यांना सोबत करणारा ......अजयच्या बीडीचा तो लालबुंद ठिपका शोधत राहते. तिचे मानणे आहे की तिला तो ठिपका दिसतोही.


Viewing all articles
Browse latest Browse all 1118

Trending Articles