खूप हृदयस्पर्श केला ह्या कथेने
विक्रम
" सल " - गीताश्री (गीत )
अखेर सोक्ष मोक्ष लावला कोर्टान या नात्याचा जे कधी मनात उतरलच नव्हतं.. उतरणार तरी कसं? मनं कधी जुळलीच नव्हती..मनाने कधीच काडीमोड केला होता या नात्याचा..कोर्ट फक्त औपचारिकता निभवत होत ..
आत केस चालूच होती अन् तेवढ्यात बाहेर पावसाने हजेरी लावली..कदाचीत त्यालाही वाटलं असेल नेहमीप्रमाणे या ही क्षणाचा साक्षीदार व्हावं..बाहेर पाऊस बरसत होता अन् आत मनात पाऊस साठलेला होता...जो झिरपत होता डोळ्याच्या काठावर..पण नव्हतं रे दिसत ते पावश्या कुणाला..शेवटी तुच समजूत घातलीस माझी..अन् आपल्या पक्क्या दोस्तीची जाणीव करून दिलीस..
थँक्स पावश्या यासाठी ... घरी आली...सगळ्या सह्या करून..पण कागदावरच्या त्या सह्या मनावर कोरल्याच की रे... संपल..सगळ खल्लास झालं पण तिरस्काराचे वळ ठेवलेच की तु मागे....पण कशाने खोडायचे हे वळ..सांगितलं नाही तु सह्या करताना...निदान एवढं जरी केलं असतं तु...तुझी सगळी पाप धुवून निघाली असती...रूमच दार बंद केल..डोक्यातल्या वादळाला लोटून लावलं....अन मनाच्या भिंतीवर आदळणारे..विचारांचे सारे दरवाजे बंद केले ..अन् मनात कोंडलेल्या पावसाला वाट मोकळी करून दिली...काळ्या ढगांना मनसोक्त बरसू दिलं...मन स्वच्छ होईपर्यंत..गॅलरीत आली..आभाळाकडे पाहिलं..तेही नितळ झालं होतं माझ्या मनासारखं..अन् सगळं विसरण्याचा एक निष्फळ प्रयत्न करून... एक दीर्घ श्वास घेतला ... पुन्हा जगण्यासाठी...