मेघा पार्डीकर ह्यांची ही कथा..मनाला भिडेल तुमच्या.....
विक्रम
नियती - मेघा पार्डीकर
'कोण जिंकलं? नियती का मी' माईंकडे बघून वाटत होतं स्वतः शीच संवाद सुरू असेल!
मन २५ वर्षे मागे गेलं. सगळ्या घटना आठवत गेल्या.------ माईंनी आज कामाला जरा उशीराच सुरवात केली. पेपर वाचून झाल्यावर घड्याळाकडे बघत काट्यांना जणू म्हणत होत्या,
“मुक्त झाले मी तुमच्या बंधनातून! नोकरीतून निवृत्त होईपर्यंत ह्याच घड्याळाच्या तालावर नाचत होते मी! आता एकुलत्या एका मुलाचं लग्न करून दिलँ की माझे छंद ,समाज कार्य,प्रवास करायला मी मोकळी. त्यांनी कपाटावरचा ट्रान्झीस्टर काढला पुसला! “चला चालू आहे तर!” मनाशीच पुटपुटल्या.. दुसरा चहा घेत माई अन् आप्पा झोपाळ्यावर निवा़ंत गप्पा करीत बसले.
गोंधळ कसला म्हणत माई उठल्या, तर मुलाच्या मित्रांनी बातमी आणली अँक्सिडेंट झालाय! संपल सगळं! कानातून बातमी विजेच्या वेगाने शरीरभर पसरली. गलीतगात्र माई मटकन् खाली बसल्या . शुध्दीवर येताच मनात विचार आला, दुःखाचे आघात सोसतच इथवर आलेलो आपण, पण आप्पांचे काय? आप्पांच्या जाणीवाच नाहीश्या झाल्या होत्या. शून्यात नजर लावून ते बसलेले असत. नजरेतली ओळखच हरवली होती.
वाड्यातली छोटी मुलं, आप्पाशी दंगा मस्ती करायला, खावू मागायला येईनाशी झाली.
“माईईई” ,घरामागे राहाणाऱ्यासीमाने आवाज दिला. माई, मीही आता काही काम पहावं म्हणते! या चार पोरांच एकट्याच्या
कमाईत कसं व्हायच?आज मी निघते गावाला. माई़च्या डोळ्यात विलक्षण चमक आली. सीमाचे हात हातात घेत त्या आर्जवी स्वरात बोलल्या
'सीमा तुझ्या सावळ्याला माझ्याकडे ठेवतेस?” सीमाच्या नजरेत उत्तर शोधत त्यांचे कान अधीर झाले होते ऐकायला.
“माई त्यात काय! राहील तो. अधूनमधून मी येईन भेटायला त्याला.”
माईंना गलबलून आल़. पोटच्या गोळ्याला केवढ्या विश्वासाने स्वाधीन केलं हिने. औषध लागू पडलं. आप्पा हळूहळू सुधारू लागले. त्याचं घर-खेळणी ,कपडे,छोटे सवंगडी यांनी फुलून गेलं. बालगीतं, पाढे मोठ्या बोबाड्या आवाजात ऐकू येवू लागली. भिंती पेन्सिलीने रंगू लागल्या. सावळ्या, आप्पा माईंच्या प्रेम -वर्षावात मोठा होवू लागला.
अशातच एक दिवस आप्पा हे जग सोडून गेले. नंतरही सावळ्याची सगळी जबाबदारी माईंनी पार पाडली. परदेशी शिक्षण घेवून सावळ्या आज त्याच्या माईकडे परत येणार होता. कंबरेतून वाकलेल्या माई काठी टेकत आल्या, गँलरीतल्या खुर्चीवर बसल्या. शांतपणे मावळतीच्या सुर्याकडे नजर लावून बघत राहिल्या. प्रभाकराचं तेज त्यांच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावर, पिकलेल्या केसांवर विलसत होतं. त्यांची लांबचलांब सावली मागे पसरली होती .