मित्रानो ही कथा आज संपते आहे...तुमच्या उत्स्फूर्त प्रतीसादाबद्दल मी ऋणी आहे.
विक्रम
हौदापाठची खोली - गायत्री मुळ्ये
बाई वहीनी खूप घाबर्या घुबर्या झाल्या त्यानी तिला हात जोडून विनवणी केली बाहेर जा म्हणून.
"जाते हो बाई.पण आधी चहा तर घ्या माझ्यासोबत."
कुणाच्या लक्षात येण्याआधी ती इथून निघावी म्हणून बाईनी तिच्या हातातला कप घेतला.घाईनी चहा संपवला.तसाही तो गार झाला होता.हिने पण चहा घेतला.आणि मी दुपारी येते जेवणाचे घेऊन असे सांगतले.बाई वहीनीनी नाही नाही अशी मान हलवत होत्या
"तू जा आधी कुणी बघण्या आधी इथून जा.मी हात जोडते तुला तू परत असे धाडस करू नकोस....जा तू पटक निघ बेटा बाहेर.घरात गहजब होईल कळाले तर.तुला खूप अंगलट येईल छळ होईल तुझा जा तू परत येवू नकोस"
बाई वहीनींच्या तोंडून बेटा ही हाक ऐकून तिला घश्यात दाटल्या सारखे झाले.तिचे डोळे भरून आले.तिने बाईवहीनींकडे पाहीले त्यांच्या डोळ्यातून गालावर थेंब ओघळले होते.तिने ते पुसले आजचा तुमचा नमस्कार राहीलाय अस म्हणत त्याना नमस्कार केला.बाई वहीनी मागे सरकल्या . ती दाराबाहेर पडली बाई वहीनीनी घाई घाईत दार लाऊन घेतले.
ती दोन चार पाऊले चालली असेल तर घरातल्या दारातून सासूबाई, मधली आणि मोठे भासरे मधल्या जागेतून धावत ओकडे येताना तिला दिसले.सासूबाईनी तिला हाताने तिथेच थांबायची खूण केली.हौदातले बादलीभर पाणी काढून तिच्या अंगावर ओतले.त्या थंडगार पाण्याने ती थंडीने कापायला लागली.दोन्ही कप छातीशी घटट धरून ठेवले होते.गडी माणसे खाली माना घालून स्तब्ध उभे होते.तिचे दात कडकड वाजायला लागले.सासूबाई संतापाने लाल झाल्या होत्या.
"तरी मी म्हणत होते ही शहरातली नटमोगरी नको.कसले एकेक अवलक्षण म्हणते मी.माय बाप नाहीत.आत्याच्या लाडाकोडात वाढलेल्या मुलीवर काय संस्कार असणार?पण माझ कोणी ऐकेल ह्या घरात तर शप्पथ.हाडे मसणात जायची वेळ आली माझी एकदाचे नेऊन पेटवा आणि मग करा काय करायचा तो अनर्थ ह्या घरात.जोशी गुरूजीना आवाज द्या रे कुणी हिला शुध्द करून घ्यावी लागेल.शुध्द झाल्याशिवात उंबरठा ओलांडू नकोस सांगून ठेवते.खबरदार परत हे असल काही केलेस तर"
सासूबाईंचा थयथयाट ऐकून ती अवाक झाली.आई वडीलांचा उध्दार आत्या बद्दल अपशब्द ऐकून ती खूप दुखावल्या गेली.ती लाजीरवाणी होऊन उठली.खाली मान घालून पदर सावरत न्हाणीघरात गेली .
कपडे बदलवून बाहेर आली.दाराशी जोशी गुरूजी उभे होते त्याने तोंडाने काही पुटपुटत तिच्या अंगावर दर्भाने गोमूत्र शिंपडले.तिला एका वाटीत पंचगव्य दिले प्यायला.ती मुकात ते प्यायली.आणि उंबरठा ओलांडून घरात आली.
स्वयंपाक घरात प्रत्येकाने वेगवेगळे तोंडसुख घेतले.तिने खाली मान घालून ऐकून घेतले.तिला कुणी कमाला हात लावू देई ना.ती एका कोपर्यात चुपचाप अवघडून बसली राहीली.निग्रह डोळ्यातून सांडायला लागला.आजच्या ह्या घटनेने तिचे जीवन जणू बदलवून टाकले होते.
सगळ्यांचे आटोपल्यावर दोन जण जेवतील एवढे अन्न तिने बाई वहीनींच्या ताटात वाढ्ले.कुळाचार कुळधर्म सांभाळणार्या सात्वीक बाईला इतर जातीय गड्याच्या हाताने दिलेले अन्न कसे चालते ह्या दिवसात हे तिला कळाले नाही.
गड्याच्या मागोमाग ती परत त्या खोलीत गेली.परत तेच सगळे बाई वहीनींची त्रेधातिरपीट भितीने गाळण उडालेली.तिने हात धरून त्याना खाली बसवीले.त्यांच्या सोबत स्वत:ती ताटात जेवली.आपण ह्या खोलीत aसे पर्यंत कुणी आत येणार नाही हे तिला माहीती होते.बाई वहीनीना जेवण जात नव्हते.
"हे सगळ तू का करते आहेस?उगा विस्तवाशी खेळ मांडलास पोरी खूप जड जाईल अश्याने तुला भाऊजी अजीबात साथ देणार नाहीत.एवढेच काय मी सुध्दा असले काही धाडस तुझ्यावेळेस करू शकणार नाही."
ती शांतपणे जेवत होती
"बाई वहीनी ! तुम्ही एकदाही विरोध का केला नाहीत इथे रहायला?माडीवरच्या तुमच्या खोलीत राहूनही रीत पाळता आली असती न?"
"हं.लांब सुस्कारा सोडत बाई वहीनी बोलायला लागल्या.
"माई महीन्याभरात गेल्या.आणि नंतरच्या महीनाभरात मी त्यांची जागा घेतली.त्या अश्या अवस्थेत गेल्याने त्यांची क्रिया सुध्दा करताना शास्त्र चर्चा आधी झाली.सवाष्ण बाई इथे पडली होती हिरवी निळी होऊन...तोंडातून फेस निघालेला.ह्या सगळ्या घटनेवर कहर म्हणजे लगेचच झालेले आमचे लग्न.ताबडतोब ह्या घराने त्यांच्या खूणा पुसल्या.मी त्यांची जागा घेतली.आज जी जाणीव तुला माझ्यासाठी झाली न ती मला त्यांच्यासाठी झाली"
"ती कशी काय?" तिने त्याना विचारले
" माई वहीनी लहान होत्या वयाने 18 वर्षांच्या जेमतेम.त्या किती घाबरल्या असतील इथे येताना? तेंव्हा तर त्या एकट्याच होत्या. त्या किती तडफडल्या असतील? क्रियेपेक्षा शास्त्र चर्चा महत्वाची हे पाहून त्यांचा आत्मा किती तडफडला असेल? लगेच महीनाभरात मी त्यांची जागा घेतली त्याना किती वाईट वाटले असेल? तळमळल्या असतील त्या..घरात त्यांची आठवण म्हणून एकही गोष्ट ह्या घराने सांभाळली नाही. मधली अशीच घाबरली होती तिला मी माहेरी जायची परवानगी मिळवून दिली. तुला हवी असेल तर मी काहीतरी मार्ग काढते...तुला तुझ्या खोलीत वावरता येईल का असे बघते पण मी मात्र इथेच रहाणार. मरताना आणि मरणा नंतर माईंचे हाल झाले...त्यांचे वाटचे सुख मी भोगते आहे.त्यांच अस्तीत्व इथे घुटमळत असेल. मी देणेकरी आहे त्यांची तुझ्यासारखी बंडखोरी करण्यापेक्षा मला इथे रहावस वाटत...तेवढीच माईना सोबत असे मला वाटते...हा चार दिवसांचा एकांत मी फक्त त्यांच्यासाठी विनातक्रार स्विकारलाय...तू मला त्यांच्या पासून दूर करू नकोस. मला माईंशी प्रामाणीक असू दे...त्यांच्यावर झालेल्या अन्यायाच हे मी माझ्या वतीने केलेल परीमार्जन आहे."
ती अवाक होऊन बाई वहीनींच लॉजीक ऐकत होती..तिला सुचेना.आणि खोडता पण येईना त्याना.ती नतमस्तक झाली.माईंची झालेली अवहेलना समजून घेणार्या आणि त्याना आपल्या परीने त्याना न्याय देणार्या बाई वहीनी आता तिच्या नजरेत खूपच उंच झाल्या . ती उठली....बाई वहीनीना वाकून नमस्कार केला.आज पुर्ण आदर त्या नमस्कारात होता.नियम म्हणून तो नमस्कार नव्हता. शांतपणे बाहेर आली...
प्रायश्चीत्त करून घेतले.घरात आली
आणि आपल्या चार दिवसांची आता ती वाट पहायला लागली.