Quantcast
Channel: BookHungama
Viewing all articles
Browse latest Browse all 1118

आयसोलेशन -अंजली कारंजकर

$
0
0

मला ह्या कथेवर प्रतिक्रिया हव्या आहेत...कॉमेंटस मध्ये...काय जाणवलं तुम्हाला? एका वाक्यात...मी वाट पाहतो आहे...

विक्रम

आयसोलेशन -अंजली कारंजकर

२६ नंबर वॉर्डची सेकंड शिफ्टची ड्युटी संपून नाईट शिफ्टच्या सिस्टरला चार्ज देताना सगळ्या सूचना देऊन झाल्यावर सिनिअर सिस्टर जायला वळली आणि पुन्हा आत आली, बेड नंबर ३४ आज दुपारी शुद्धीवर आल्यापासून खूप अस्वस्थ आहे त्याने रात्रीचे जेवण घेतले नाही त्याला मेडिसिन सोबत दूध आठवणीने दे, हे सांगायचे राहून गेले होते.

हॉस्पिटलच्या मुख्य इमारतीपासून फर्लांगभर दूर असलेल्या २६ नंबर वॉर्डची नाईट ड्युटी म्हणजे उत्तरध्रुवावर असल्यासारखे होते. एकीकडे रस्त्यावर पडलेल्या अभ्राकाच्या चमचमणाऱ्या चकाकत्या भिंगऱ्या आणि मिट्ट काळोख.. रस्त्यावर विव्हळत रडणारी कुत्र्यांची टोळकी आणि वाघळांची चित्कारत चाललेली फडफड. फोर्मल्डीहाइडच्या उग्र दर्पाने गुदमरलेला वॉर्ड त्यात पेशंटच्या विव्हळण्याची भर पडलेली. काळोखाला गडद करणारे खिडक्यांचे काळे पडदे आणि भिंतीवरच्या घड्याळाची अविरत टिकटिक वॉर्डच्या पोकळीत भरून असलेली. सिस्टरने वॉर्डचे मुख्य दार लावून घेत बाहेरची आणि आतली अनिश्चित तडफड वेगळी करण्याचा प्रयास केला आणि मिळालेल्या श्वासांसोबत एका रात्रीच्या आश्वासनाची खात्री देत ती एकएक बेडवर जात चार्ट नुसार रात्रीच्या औषधांचा डोस देऊ लागली. बेडनंबर ३४ ला जबरदस्तीने दुधाचा पेला रिकामा करायला सांगत तिने गोळ्या त्याच्या तोंडात सोडत पाण्याचा पेला समोर धरला .

नंतर एकएक दिवा बंद करत मंद प्रकाशाचा पिवळा दिवा लावत ती टेबल जवळ येऊन बसली. एकवार पूर्ण वॉर्डवर नजर टाकली. पिवळ्या प्रकाशात बेडखाली, फोर्मालीन भरलेल्या बंद बाटल्यात,अम्प्युट करून ठेवलेले अवयव हलत होते.पंचनामा झालेल्या बाटल्यां उद्या सकाळी वॉर्डबॉयला सांगून इन्सीनेरेशनला पाठवायला लागतील हे आठवणीत ठेवले. बेड नंबर ३४ कडे पुन्हा एक कटाक्ष टाकत सिस्टरने नोंदीच्या रजिस्टरमध्ये एन्ट्री करायला सुरुवात केली. सगळ्या अनिश्चिततेत फक्त येणारा दिवस काय तो निश्चित आहे त्यासाठी या नोंदी हव्याच- हिमोग्राम, बायोकेमिस्टरी रिपार्टस, ब्लडप्रेशर,किडनी फंक्शन, ड्रग सेन्सिटीव्हीटी टेस्ट, सगळे त्या त्या रकान्यात टिपणे चालू होते. बेडनंबर ३४ – हिमोग्राम.....

ती एन्ट्री करतच होती तेव्हड्यात त्याचा आवाज आला “सिस्टर ,,सिस्टर ...” ती लगबगीने त्याच्या जवळ गेली , त्याने केस गच्च मुठीत धरून ठेवले होते, काही दुखतेय का? तिने विचारले. त्याने नाही म्हणत हात हलवला. मग?? तिने विचारले

“सिस्टर तळपाय खाजवतो आहे हो मघापासून, मी खाजवला पण ही खाज जातच नाहीय.” गोंधळात पडलेल्या सिस्टरने त्याच्या डाव्या पायाच्या तळव्यावर हात फिरवला .

तो कळवळत म्हणाला नाही हो हा नाही उजवा पाय ,उजवा तळवा !!

त्याच्याकडे केवीलवाणे बघत ती म्हणाली थांब काही औषध देते आणि ती वळली, सिडेशन वाढवायला हवे होते .

पलंगाखाली फोर्मालीन भरलेल्या मोठ्या बंद बाटलीत तरंगत हलणाऱ्या त्याच्या उजव्या पायाच्या तळव्याकडे तिचे लक्ष गेले आणि ती शहारली.


Viewing all articles
Browse latest Browse all 1118

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>