काय अप्रतिम गोष्ट आहे मोहना कारखानीस ह्यांची...व्वा!
माणूसKey – मोहना कारखानीस
देवळात महादेवाच्या पिंडीवर ओतल्या जाणाऱ्या पांढराशुभ्र दुधाच्या घट्ट धारेकडे मनी आधाश्यासारखे बघत होती. सगळ्या जीवित प्राण्याप्रमाणे तिलाही तिची भूक ह्या तिन्हीसांजेला सतावीत होती . देवळातील सांज आरती संपली आणि एकेक भक्त मंडळी प्रसाद घेऊन बाहेर पडू लागली.
हं, आता मला मिळेल पेढा किंवा लाडू. मनी मिश्यांवरून जीभ फिरवीत म्हणाली. तिची तीन चिल्लीपिल्ली तिच्या घरात तिची वाट बघत होती. दोनच दिवसाची बाळे तिची. अजून डोळेही न उघडलेली. पण मनीला लागली भूक आणि त्यासाठी तिला तिच्या बाळांना सोडून यावेच लागले या देवळात. रस्ता ओलांडला की झाले! एरवी या देवळात दूध, पेढा, लाडू यांची चंगळ असे. पण आज काय झाले होते कुणास ठाऊक?. प्रत्येक जण येऊन दुधाची पिशवी फोडून जात होता देवळातील काळ्याभोर पिंडीवर, पण मनीकडे मात्र कुणीच ढुंकून पाहत नव्हता.
मनी, वाट बघून बघून थकली. कळवळली. परत जायला निघाली. तेव्हढ्यात एक आजीबाई दिसली तिला. तिच्या हातात चांगले दोन-तीन पेढे दिसत होते. मनी आशेने तिच्यापाशी गेली. पायात घोटाळली.
"म्याऊ म्याऊ, मला देतेस का ग तो पेढा?" मनीच्या तोंडातून लाळ टपकली.
पण कसले काय! आजीबाईंनी तिला अशी काय लाथ मारली की मनी कळवळत, केकाटत लांब पळाली आणि ती जी जाऊन धडकली ती एका धिप्पाड माणसावर. कसल्या तरी घाणेरड्या वासाने तिला त्या माणसाची शिसारीच आली.
शी, काय घाणेरडा माणूस आहे? त्या देवळातली माणसे कशी छान, शुभ्र, स्वच्छ कपडे घालून येतात. रांगेत, हात जोडून डोळे मिटून उभी राहतात. याला तर धड उभेही राहता येत नव्हते. मनीने सावरून त्याच्याकडे बघितले. याचे तर हातही जोडलेले दिसत नव्हते.
"अले अले कोण ती? आमची मनीमाऊ काय" वाकून तिला उचलून घेत तो माणूस म्हणाला. मनीने सुटण्यासाठी धडपड केली. त्याचे डोळे लाल होते खरे पण प्रेमळ, स्वच्छ दिसले. मनीला आश्चर्यच वाटले. "काय हवे तुला? भूक लागलीये? " तो थोडस बोबडं बोलत होता वाटतं. आता मनी त्याच्याकडे निरखून पाहू लागली. त्याच्या प्रेमळ स्पर्शाने त्याच्या शरीराचा घाणेरडेपणा तिला जाणवेनासा झाला. त्याने खिशात हात घालून एक अख्खा कप केक काढून खाली ठेवला. मनीने टुणकन उडी मारून केकच्या मऊसर भागावर झपाटा मारला. तिच्या या अनपेक्षित हालचालीने आधीच लडखडत असलेल्या त्या माणसाचा किंचित तोल गेला. "अगं, जरा हळू हळू", तो प्रेमाने तिच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाला. मनी सुखावून केकचे तुकडे लपकलपक करून खाऊ लागली .
तिला आता त्याच्या अंगाचा घाणेरडा वास अजिबात जाणवत नव्हता.
जाणवत होता तो फक्त माणुसकीचा सहवास.