Quantcast
Channel: BookHungama
Viewing all articles
Browse latest Browse all 1118

Shwetambara-Shraddha Rajebhosale

$
0
0

श्रद्धाने ह्यावेळी एक वेगळे वातावरण वेगळ्या व्यक्तिरेखा घेऊन कथा लिहिली आहे...भाषेचा बाज सुद्धा बदलला आहे. हे खूप महत्वाचे असते.

श्वेतांबरा – श्रद्धा सचिन राजेभोसले

विसावा मिळावा म्हणून जयदेव घळीत पडला होता.पण मनाचे 'चंक्रमण' चालुच होते." चार दिवसांपुर्वी कस्तुरीच्या बापापुढे झालेल्या ' ज्वलंत' प्रकरणामुळे आपल्यावर आता जबाबदाऱ्या वाढणार आहेत हा विचार सतत त्याच्या डोक्यात घिरट्या घालत होता.त्या दिवशी आपण अगदी बेधडकपणे कस्तुरीचा हात मागायला गेलो होतो महादेव भटाकडे.कशाही स्थितीत स्वतःचा धीर खचू न देता माझ्या सारखा अनाथ त्यांच्या पुढे बोलता झालेला...."

जयदेव अशा विचारात गढून गेला होता अन् एवढ्यात कस्तुरी तिथे अवचित प्रकटली.जणू शिशिरातली आम्रमंजिरी.जणू वसंतातली वायुलहरी.जयदेव लवंडला होता तो एकदम उठून बसला.एक गहिरा कटाक्ष .गालावर चिरी पडेल इतक्या बेताचे एक भावपुर्ण स्मित.अन् बाकी सगळे मौन. कस्तुरीची आपादमस्तक स्थिर मूर्ती जयदेवने पाहिली.जि-या झेंडूच्या एकावर एक दोन वेण्या तिने माळल्या होत्या.कस्तुरीचे नाक- डोळे रेखीव म्हणता आले नसते.तिचा घाटही प्रमाणबद्ध आहे असे म्हणणे ही कठीण होते.तिची साडी-चोळीसुध्दा जाडीभरडीच होती. पण तिचे मादक यौवन हे सगळे दोष पोटात घालून तिच्या अंगप्रत्यंगातून निथळत होते.तोच एक तिच्या कायेला व्यापून उरणारा सर्वोत्कृष्ट अलंकार ठरला होता.तिच्या सावळ्या गालावर गुलाबी कांतीने अशी काही रंगसंगती साधली होती की,जसा आभाळाच्या 'निळावंती' वर संध्येचा पुसट रक्तिमा.जणू अनंगाने प्रथम तांबडी शलाका ओढली अन् मग तो रंग हलक्या बोटाने पुसून घेतला.

त्या निर्भर एकांतात, त्या अलक्षित भूभागात,त्या निबिड लताकुंजात कसल्या तरी भावप्रक्षोभाने थरारत अधोमुख होऊन उभी असलेली अन् तर्जनीच्या आरक्त नखाभोवती पदराच्या टोकाचे वेढे देणारी कस्तुरी त्यावेळी जयदेवाला मदनाची असिलता वाटल्यास नवल नव्हते ...तो हरपल्या भानाला सावरत म्हणाला .." कशाला आलीस गं इथे?"

खरंच, कशाला आली होती कस्तुरी तिथे? ती पतंग होऊन पेटत्या दिव्यावर झडप घालायला आली होती का?स्वतःचे पंख पोळून घेऊन धरणीवर घायाळपणे पडायला आली होती का?तिला कोणत्या अशा दुर्दांत शक्तीने पदराला धरून खेचून आणले होते. देवयानी,शर्मिष्ठा,चंद्रसेना या पुराणकाळी कामज्वराने धगधगलेल्या प्रमदा तिच्या हृदयात आज एकाएकी सजिव झाल्या होत्या का?संकेतस्थळी निघालेल्या त्या जुन्या अभिसारिका निदान अंधाराची तरी ओढणी घेत; पण हिने उघड्या अंगाने सुर्याला साक्षी ठेवून पुढे पाऊल टाकले होते.ती निश्चल उभी होती तरी तिच्या श्वसनात वेग आला होता,हे सांगायला ते दोन साक्षीदार पुरेसे होते.

तिची आरक्त कानशिले,निढळावरचे घर्मबिंदू, डोळ्यांतल्या बाहुल्यांवर आवरण घालू पाहणाऱ्या लांब पापण्या,अधराची ती लवलव,या सर्व गोष्टी इतक्या बोलक्या होत्या की,तिने काहीही न सांगता जयदेवाने तिचं मन ओळखले होते.अन् जयदेव बोलता झाला...." कस्तुरे ,अगं गैरसमज झाला तुझा.मी तसल्या प्रवृत्तीचा नाही बरं!..अगं मनापासून प्रेम आहे माझं तुझ्यावर म्हणूनच तर रितसर लग्नासाठी मागणी घातली तुझ्या बाबाकडे.अगं तुझ्या पायावर पांढरे डाग आहेत हे सांगितलं मला बाबांनी तरीही माझ्या निर्णयात काहीच बदल नाही ...अन् माझा लग्नाचा निर्णय बदलेल म्हणून तु आपली काया कुर्वडायला आलीस इथे???

त्याच्या त्या वाक्यांचा परिणाम कस्तुरीवर झाला हे पुढच्याच क्षणी दिसले.तिची मुद्रा एकाएकी पालटली.डोळ्यांच्या कडांवर अश्रूंची झालर चमकू लागली.

तिने आपली अधोदृष्टी वर उचलून जयदेवच्या मुखावर लावली.अन् कातरलेल्या काळजातुन बोलती झाली .."माझ्या ह्याच पांढऱ्या डागामुळे ह्यापूर्वीची स्थळं पुन्हा आलीच नाहीत .तुम्ही स्वतःहून आलात लग्नाचं विचारलंत बाबाला...अन् डागाचं ऐकून निघून आलात...तुम्हाला गावभर शोधलं घळीत बसता विचारात असल्यावर असं कळलं...बाबा लेकीसाठी नकार ऐकून थकलाय माझा....'कराल का लग्न माझ्याशी? त्याकरता काही ही करायची तयारी आहे ' हेच बोलायला इथंवर आले."

जयदेव हसला...अन् म्हणाला." वेडी का खुळी गं...कस्तुरी ,अशी आत्मघाताला प्रवृत्त होऊ नकोस.जन्मभर ज्याचं स्मरण झालं असता शरमेनं मान खाली पडेल ,असे कर्म मी माझ्या होणाऱ्या बायकोला करु देणार नाही .अन् हा पांढरा डाग म्हणशील तर त्यामुळे आजपासुन तुझं नाव जयदेवची श्वेतांबरा असेल...माझ्या साठी तु त्या आभाळाइतकी निरभ्र आहेस...तो शुल्लकसा डाग त्यापुढे दिसतच नाही मला... जा आता तु घरी.महादेव बाबा वाट पहात असतील."

अन् सुर्यास्त जाताना दोन जिवांची काही कुजबुज ऐकून गेला..."जयदेवा,मी चुकले."

"नाही कस्तुरे.चुकत होतीस; पण वेळीच सावरलीस."


Viewing all articles
Browse latest Browse all 1118

Latest Images

Trending Articles



Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>