काही जीव शापित असतात...भळभळती जखम घेऊन तेलाची भिक मागित फिरतात...पण......
शापित-भाग्यश्री भोसेकर बीडकर
अर्धवट जळालेल्या सिगारेटचं थोटुक तिने विझवलं. सभोवार नजर फिरवली.
समोरच्या भिंतीवरचे दोन अप्रतिम पोर्टेटस, सोफ्यावर पडलेल्या कपड्यांचा अस्ताव्यस्त पसारा, त्याच्या बाजूला बेडरूमकडे जाणारी दरवाजाची चौकट, बेडरूमची उघडी असणारी खिडकी, त्या खिडकीतून येणाऱ्या हवेमुळे उडणारे पडदे, त्यांचा फडफड असा आवाज, बेडरूमच्या बाजूला प्रशस्त डायनिंग ऐरिया, त्या डायनिंग टेबलवर हौशेने सजवलेली फुलं जी आता सुकली आहेत पार. डायनिंग ऐरिया मधून दिसणारा अथांग समुद्र.. समुद्राच्या गाजेचा ऐकू येणारा हलका आवाज. त्यानंतर आटोपशीर किचन तिथल्या सिंकमध्ये पडलेले चहा कॉफीचे ओशट कप/मग.
तिने या सगळ्याकडे पहात एक सुन्न उसासा सोडला. उठली..तिचं आवडतं कलेक्शन उघडलं.. व्हिस्की...ग्लासात भरली..ऑन द रॉक्स...ग्रामोफोनवर आवडती गझल लावली. ग्लास ओठाला लावला..एका दमात रिचवला.
तिला अचानक पार्टीमधलं संगीत ऐकू येऊ लागलं. सगळीकडे झगमगाट, छानछोकी कपडे, हसण, बोलणं सारं काही बेगडी..चेहऱ्यावरच्या मेकअपच्या थराइतकंच. काहींच्या नजरेत अनोळखी भाव, तर काहींच्या नजरेत तुसडे भाव तर काहींच्या नजरेत असूया देखील..तिच्या नजरेने हे सारं काही टिपलं आणि इतक्यात 'उत्कृष्ट नवोदित अभिनेत्री' म्हणून तिचं नाव पुकारण्यात आलं. टाळ्यांचा कडकडाट झाला, लोकांमधली कुजबुज वाढली. स्टेजवर जाताना एका प्रतिष्ठित अभिनेत्रीने अभिनंदनासाठी हात पुढे केला आणि तिला मिठीत घेत ती अभिनेत्री म्हणाली "हा तुझा पहिला आणि शेवटचा पुरस्कार. पाहू किती काळ टिकतेयस" आणि पुन्हा तेच बेगडी हास्य.
मग ती यशाच्या एकेक पायऱ्या चढत गेली. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलं नाही. जिंकायची सवय झाली तिला जणू. फिल्मी दुनियेत तिला मानमरातब मिळाला, तिच्या शब्दांची पत वाढली. यशाची झिंग चढत गेली, पैशाच्या धुराची वलय डोळ्यासमोर जमा होऊ लागली त्या पालिकडंच वास्तव जग मग अंधुक झालं, दिसेनास झालं. मग हळूहळू वक्तशिरपणाची, शिस्तीची जागा उद्धटपणाने घेतली..जुने दिवस ती सोयीस्करपणे विसरून गेली. पण या चंदेरी दुनियेला रोज नवेपणाचा शाप आहे हे देखील ती विसरून गेली. कुठे कोणी काही चांगलं काम करताना दिसलं की हिच्या मनात खुट्ट व्हायचं. स्वतःच्या क्षमतेवरचा विश्वास पार ढळला होताच पण तिच्या मनात सूड आणि असूये शिवाय दुसरे विचार यायचे नाहीत. सहकाऱ्यांच कौतुक करताना ही तोंडात मिठाची गुळणी धरून असायची. एका पुरस्कार समारंभात एका नवोदित अभिनेत्रीला पुरस्कार जाहिर झाल्यावर ही तिला अभिनंदन करताना म्हंटली "हा तुझा पहिला आणि शेवटचा पुरस्कार. पाहू किती काळ टिकतेयस"....
सदसदविवेकबुद्धीची जागा असूयेने घेतल्यावर त्या आगीत होरपळण निश्चित होतं आणि हळूहळू ही लोकांच्या विस्मरणात गेली.
तिने दुसरा ग्लास भरला. तोही ओठाला लावला. पाणी प्याव इतक्या सहजतेने प्यायली. तिला आता डोळ्यांसमोर एकेक माणसं एकेक आकृती दिसू लागली. अभिनंदन करणारी एक आकृती, "हा तुझा पहिला आणि शेवटचा पुरस्कार.." असं म्हणणारी एक आकृती, तिची या चंदेरी दुनियेतली जागा बळकवणारी एक आकृती, तिच्या अंगाला लोचट स्पर्श करणारी आकृती, तिच्या अप्रतिम सौदर्याचं कौतु्क करणारी एक आकृती ,तिच्या स्वतःमधली एक विकृत आकृती....ह्या सगळ्या आकृत्या तिच्यासमोर थयथयाट करायला लागल्या, तिच्याकडे बोट करून अक्राळविक्राळ हसू लागल्या, तिला खिजवू लागल्या. तिला शांतता हवी होती. तिने कानावर हात ठेवले, डोळे गच्च मिटले. ती जोरात ओरडली. ग्लास दूर फेकला...खळळ काचेचा आवाज आला.
तिने टेबलच्या खणात काहीतरी चाचपडलं. तिच्या हाताला काहीतरी लागलं. विष!!! विष जे तिला शांतता देणार होत, तिचा एकटेपणा घालवणार होत, तिच्या सुखद आठवणी जपून वाईट दिवस विस्मृतीत घालवणार होतं. तिने ते उघडून त्यातले दोन-पाच थेंब एका ग्लासात टाकले. ग्रामोफोनचा आवाज वाढवला. शेवटचा प्याला भरला...आणि घटघट पिऊन डोळे मिटले...शांतपणे... कायमचे.