आठवणीतील गोष्टी - पुष्प ६ वे
हौसा – सुनीत काकडे
ऊगवतीची किरण कोपीची छत भेदुन काल्याच्या तोंडावर फाकली होती, त्याला कंटाळुन तो पालथा झोपला, पण ऊजेडाने रात्रभर निर्जीव असलेल्या सृष्टीला बोलतं केलं होतं, गाई बैलांच्या हंबरड्यात, पक्ष्यांच्या चिवचिवाटानी ताल धरला होता. कमळीनं चुलखंडावर पाणी ठेवलं आणि काल्या अंथुरानात ऊठुन बसला.
एक वर्षाची हौसा मुटकुळी करून त्याच्या शेजारी झोपली होती, काल्यानी त्याच्या अंगावरची गोधडी हौसेच्या अंगावर पांघरली आणि त्या निरागस कोकराकडे प्रेमाने बघत ऊठला. देवळीत ठेवलेली मिसरीची पुडी ऊचलुन, चुलीसमोर धगीला बसला. शरीरासोबत भुतकाळाला शेकतं तो तीन-चार वर्ष माग सरकला, तीन सालामागं त्याला चोरीच्या खटल्यात सहा महिन्यांची जेल झाली होती, रामजी पाटलाच्या दोन शेळ्या चोरून तालुक्याला नेऊन विकल्या होत्या, पण सगळांच घोळ झाला अडत्यान त्या पाटलाच्या पाव्हन्याला विकल्या आणि काल्याचं पितळं ऊघडं पडलं. ज्या आबाच्या ईलाजासाठी चोरी केली तो पण कायमचा सोडुन गेला. पण जेलात भेटलेल नाव 'काल्या' मात्र कायमच चिटकलं. जेलातुन आल्यावर कैकांचे ऊंबरे झिजवुन पण काम भेटना, पाला पाचोळा खालला पण परत चोरी केली नाही. मुसा मुसलमानाचं वावर मुंबईवरून आलेल्या रहीमशेठंन विकत घेतलं, वावराच्या बांधावर असलेल्या पिंपळावर हडळं असल्याच गाववाले बोलायचे, आठ पंधरा दिवसात कोणी ना कोणी तिच्यासाठी गावरान कोंबड फासाटायचं त्यामुळे वावरात कोणी वस्तीला थांबत नव्हतं, काल्या न जोखीम पत्कारली आनी पोटा पाण्याला लागला.
मायनं चार गावच्या पावन्याला हाताशी धरून मारूतीच्या पारावर दोनाचे चार हात केलं. वर्षाच्या आत पोट पानी पिकलं आणि हौशी जन्माला आली. कालच ती पहिल्यांदा ऊभी राहील्याचं कमळीनं सांगीतल आणि काल्या जाम खुष झाल जेलातुन सुटुन आल्यावर पन ईतका आनंद त्याला झाला नव्हता. पानी चांगलच गरम झाल होत, विसन घेऊन त्यान अंघोळ ऊरकली आणि ठेवनीतली कापड घालुन तयार झाला. संदुकीतुन नोटांच पुडकं काढुन मोजल्या आणि पैरनीच्या खिशात ठेवल्या. कमळीनं ईचारल्यावर गावात काम हाय सांगुन रस्त्याला लागला. झपाझप पावलं टाकीत तो बाबुलाल भाईच्या दुकानात शिरला.
गावचा एकच सोनाराचं दुकान असल्यामुळं बाबुलाल भाईंच दुकान झोकात चाललयं, सगळ्या दुकानात आरशे आणि लाईट लावले होते, त्या लाईटीसाठी बाबुलालनं एक ईंजीन पण घेतलं होतं. सकाळी गर्दी कमी असल्यामुळं बाबुलाल टिवी पाहत बसला होता. काल्याला पाहील्यावर थोड्यावेळ टिवी समोर रेंगाळुन त्यान विचारल,
'क्या लोंगे कालीया शेठ'.
काल्या त्या वाक्यान बुजला आणि म्हणाला
'मै काय का शेठ, चांदीच्या पट्ट्या घ्यायला आलोय'.
शेठ हसून म्हणाला 'वैनी साहेबांच्या मापाच्या का?'
काल्या दिलखुलास हसला आणि म्हणाला,
'शेठ पोरीसाठी दाखवा, कालच ऊभी राहायला लागलीए'.
कानांवर हलक्या आवाजात टिवी वरची 'बेटी बचाओ, देश बढाओ' ची जाहीरात चालु होती, पण काल्या पैंजनाच्या आवाजात हरवून गेलेला होता....