आठवणीतील गोष्टी - पुष्प ५ वे
पक्षांचे वादळ – राजेंद्र गाडगीळ
सकाळची वेळ, शांत, नीरव वातावरण, सुखद कोवळे उन अन शीतल अशी वाऱ्याची झुळूक. पक्षी निरीक्षणात तल्लीन, क्यामेरा किंगफिशरला टिपण्यात गर्क. अन अचानक एक तुफान उठले, शांत, नीरव वातावरण पक्षांच्या फडफडाटाने, थव्यांनी, अन जीवघेण्या कर्कश किलबिलाटाने भंग पावले. शेतात पक्षांचे वादळ उठले. असे वादळ मी आमच्या पाच वर्षांच्या पक्षीनिरीक्षणात पहिल्यांदाच उनुभवत होतो.
काळेभोर लोंबकळणारे अक्राळविक्राळ ढग, त्यांचा कापरे भरणारा गडगडाट, विजांचा लखलखाट, लोंबकळणाऱ्या विजा, चक्रीवादळ, धुळीचे लोट, उडणारे पन्हळी पत्रे असे रौद्र. थरकाप उडविणारे अनुभव अनेकदा उनुभवले. ढग फुटतो म्हणजे काय ते अनुभवले पण पक्षांचे वादळ कध्धी कध्धी अनुभवले नव्हते ते आज अनुभवले. मी पूर्व -पश्चिमेच्या मध्ये उभो लक्षण पूर्णपणे किंगफिशर कडे, चिमण्या, कावळे ,कोतवाल, मैना, पोपट, ब्राह्मणी मैना, गाय बगळे शेतात अन झाडावर शांतपणे दाणे, किडे, आळ्या, फुल, फळ टिपण्यात गर्क होते, अधूनमधून पावशा या झाडावरून त्या झाडावर जात होता, दोनचार नीलपंख कधी कणसावर तर कधी तारेवर तर कधी झाडत जाऊन बसत होते, कापशी शेतातील विजेच्या खांबावर अगदी टोकाला जाऊन सावजाचे निरीक्षण करण्यात व मधूनच सावजाला पकडण्यात अन बारीक तिरप्या डोळ्यांनी माझ्या कडे लक्ष ठेवण्यात गर्क होता.
जो तो आपल्या कामात गर्क होते. थंड, हिरवे अन आल्हादायक वातावरण, सोनेरी पिवळे उन अन अचानक दक्षिण बाजूने गोंधळ ऐकू आला, जमिनिवरून, झाडावरून पक्षांचे भयभीत थव्यांचे लोट सैभर उडू लागले. विचित्र जीवघेणे चित्कार टाकू लागले. कापशी सारखा दादा पक्षी पळून गेला, कोतवाल दादा कोतवाली सोडून ची..ची करत थव्यांनी उडाले, पोपटांचे थवे मांजरी सदृश्य काहीतरी आवाज काढत उडाले, गाय बगळे प्रचंड फड फड करत जीवाच्या आकांताने उडाले, त्यांनी अस्से पंख पसरले होते हवेत की मी अचंबित झालो. काय झाले म्हणून सर्वत्र पाहू लागलो. असे भयभीत पक्षांचे वादळ उठलेले पाहून नक्की काय झाले याचा अंदाज येत नव्हता. सारा आसमंतात गडबड, पळापळ दाटलेली होती सारे कसे भयचकित वातावरण. मान चारही दिशांना वळवून मी काय झाले असेलबरे अचानक याचा अंदाज घेऊ लागलो. दक्षिणे कडून झब झब नेहमी पेक्षा जाडजूड, पिळदार अन मोठ्या अंगकाठीची घार येत होती. तिच्या येण्यानेच सारे आधीच पळापळ करत होते, घार काही पहिल्यांदाच येताना मी बघत नव्हतो थोडे बहुत पक्षी पळापळ करतांना पहिले आहेत पण असली घबराट अन वादळा सारखे उडणे मी प्रथमच अनुभवत होतो.
एवढ्यात लक्ष गेले ते तारेवर बसलेल्या किंगफिशर उर्फ खंड्या कडे. तो अगदी निश्चल बसलेला होता, मध्येच जमिनीवर येऊन किडे पकडत होता. त्यांने दखल सुद्धा घेतली नाही घारीच्या येण्याची. म्हंटले मानले राव किंगफिशर मधील किंग सार्थक केले, किंग इज ऑलवेज किंग.